उत्तर प्रदेश निवडणूक : हिंदुत्वाची लाट आहे का?

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी
उत्तर प्रदेशमध्ये फिरतांना एक वाक्य सतत कानावर पडत राहतं. ते गाण्यात असतं, शेजारी उभं असलेल्याच्या मोबाईलच्या रिंगटोनवर असतं, प्रचाराच्या गाडीत वाजतं, भिंतीवर लिहिलेलं असतं, मंदिरांबाहेर रंगवलेलं असतं आणि जर चहाच्या टपरीवर कोणाला विचारलं 'क्या चल रहा इस बार इलेक्सन मे?' तर त्यातला एखादा तरी डायलॉगसारखं हे वाक्य टाकतोच.
'जो राम को लाए है, हम उसको लाएंगे'. संदर्भ स्पष्ट आहे, इशारा अयोध्येतल्या राम मंदिरकडे आहे आणि सत्ताधारी भाजपाच्या बाजूचा आहे. पण काय याचा अर्थ उत्तरेत हिंदुत्वाची लाट आहे का?
यंदाची उत्तर प्रदेशची निवडणूक आणि याअगोदरच्या सगळ्या निवडणुका, यांच्यातला सगळ्यांत मोठा फरक आहे, तो म्हणजे, या निवडणुकीअगोदर अयोध्येतल्या राममंदिराचा तोडगा निघाला आहे आणि काम सुरु झालं आहे. देशासोबतच मुख्यत्वानं उत्तर प्रदेशच्या राजकारणाचे 'राममंदिरपूर्व' आणि 'राममंदिरोत्तर' असे दोन भाग करता येतील.
नव्वदच्या दशकात शिरता शिरता सुरु झालेल्या रामजन्मभूमी आंदोलन आणि बाबरी प्रकरणानं इथं राजकारण कसं बदललं हे सगळ्यांनी पाहिलं आहे. आता वादाचा निकाल लागल्यावर पहिल्यांदाच परिक्षा होते आहे ज्यात समजेल इथल्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा पट मंदिरानंतर कसा बदलला आहे.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
राममंदिर या एकाच मुद्द्यावरुन उत्तर प्रदेशात या निवडणुकीत हिंदुत्वाची लाट यंदा आहे किंवा नाही हे ठरवता येणार नाही.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची प्रतिमा हाही त्यातला एक महत्वाचा भाग आहे. 2017 मध्ये जेव्हा भाजपाची लाट आली होती आणि त्यांना पहिल्यांदा तेव्हा बहुमत मिळालं होतं, तेव्हा चेहरा नरेंद्र मोदींचा होता.
त्यानंतर संन्यासी असणाऱ्या आदित्यनाथांकडे उत्तर प्रदेशची सूत्रं गेली. आदित्यनाथ हे अधिक आक्रमक हिंदुत्ववादी आहेत असं म्हटलं जातं.
निवडणुकीच्या प्रचारातली त्यांची वक्तव्यं पाहिली आणि त्याअगोदरचे वाद पाहिले तरीही ते समजतं. पण यानं धार्मिक ध्रुवीकरण उत्तर प्रदेशात होतंय का? त्याचा फायदा कोणाला होईल?
उत्तर प्रदेश हा धर्म आणि जात यांच्या क्लिष्ट राजकारणाचा प्रदेश आहे. विकासाचे, शेतीचे, आर्थिक प्रश्नाचे कितीही गांभीर्य असले तरीही निवडणुकीची गणितं हे दोन घटक ठरवतात हे उत्तर प्रदेशचं राजकीय वास्तव आहे.
त्याची जटिलता जरा सोपी करुन सांगायची तर जेव्हा इथं जातींच्या जोडाजोडीचं राजकारण होतं तेव्हा समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी या प्रादेशिक पक्षांना फायदा होतो. म्हणजे जातआधारित ध्रुवीकरणाचा.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
पण जेव्हा या विविध जाती हिंदू म्हणून एकत्र मतदान करतात तेव्हा फायदा भाजपाला होतो. म्हणजे धार्मिक ध्रुवीकरणाचा. त्यामुळे निवडणुकीत एक प्रश्न सगळे शोधत असतात: ध्रुवीकरण होतंय का? आणि ते धर्मावर होतंय की जातीवर?
नव्वदचं दशक : धर्म आणि जात यांची घुसळण सुरु
या निवडणुकीत धर्म आणि जात यांचं कोणतं मिश्रण घडून येतं आहे किंवा यापैकी कोण्या एकाच घटकावर ध्रुवीकरण होतं आहे, हे शोधण्याअगोदर उत्तर प्रदेशात या दोघांची घुसळण कधी सुरु झाली हे अगदी थोडक्यात समजून घेणं आवश्यक असेल.
हे सगळं नव्वदच्या दशकाच्या तोंडावर घडून आलं. त्याअगोदरच काही वर्षांपासून राम जन्मभूमीचा प्रश्न चर्चेत आला होता. जनसंघाच्या स्वरुपातून 1980 मध्ये 'भारतीय जनता पार्टी' स्थापन झाली.
लालकृष्ण आडवाणींच्या नेतृत्वात भाजपानं स्वत:ला विश्व हिंदू परिषदेच्या रामजन्मभूमी आंदोलनाशी जोडून घेतलं. देशात हिंदुत्वाचं वारं वाहू लागलं होतं. त्याला 'कमंडल'चं राजकारण म्हटलं गेलं.
तेव्हाच दिल्लीच्या राजकारणातही मोठ्या हालचाली घडल्या. राजीव गांधींच्या नेतृत्वातला कॉंग्रेस पक्ष सत्तेतून पायउतार होऊन व्ही. पी. सिंग पंतप्रधान झाले.
उत्तर प्रदेशातून आलेल्या सिंगांनी 'कंमडल'च्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी ओबीसी आरक्षण देणारा 'मंडल' आयोगाचा अहवाल लागू करण्याचा निर्णय घेतला गेला. मोठ्या संख्येनं असलेल्या इतर मागासवर्गीय जातींना त्यानं मोठं अवकाश मिळालं.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
उत्तरेतलं राजकारण त्यानं ढवळून निघालं. यालाच 'मंडल-कमंडल'चं राजकारण म्हटलं जातं. इथं आजच्याही उत्तर प्रदेशच्या राजकारणाची मुळं आहेत.
एकीकडे मंदिराच्या मुद्यावर हिंदूंचा श्रद्धेवर आधारलेला अभिमान आणि दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर आधारलेल्या सामाजिक न्यायाच्या मागणीतून जागी झालेली इतर मागासवर्गियांची अधिकाराची भावना यावर राजकारण विभागलं गेलं.
पहिल्या मुद्द्याचा परिणाम मुस्लिमांवर होणं आणि दुसऱ्याचा सवर्ण, मागासवर्गीय जाती यांच्यावर होणं स्वाभाविक होतं. अशा तुकड्यांमध्ये उत्तर प्रदेशचं राजकारण वाटलं जाणं सुरु झालं आणि लवकरच स्थिरही झालं.
भाजपाला उत्तर प्रदेशची दारं खुली झाली पण त्यांना कल्याणसिंगांसारखा ओबीसी चेहरा सुरुवातीला पुढे आणावा लागला. मुलायमसिंह ओबीसींवर मोठे झाले आणि सोबत मुस्लिमांचीही मतं त्यांच्याकडे वळवते झाले.
सत्तरहून अधिक मागास जाती असलेल्या उत्तर प्रदेशात काशीराम यांच्या राजकारणाला सुपिक जमिन मिळाली आणि बसपा मोठी होत गेली.
हे सगळे गट जे पूर्वी एकसंध कॉंग्रेसकडे होते, ते असे विखुरल्याने कॉंग्रेस इथे रसातळाला गेली. (1995 नंतर थेट आता 2022 मध्ये पहिल्यांदाच कॉंग्रेस उत्तर प्रदेशात चारशेहून अधिक, म्हणजे जवळजवळ सगळ्या, जागा लढते आहे.)

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
त्यामुळे नव्वदच्या पुढचं राजकारण आपण पाहिलं, सरकारं कशी बनली हे पाहिलं, तर विविध राजकीय युतींच्या आड अनेकविध जातींची बेरीज-वजाबाकी झाली आणी कधी मुलायम तर कधी मायावती सत्तेवर येत जात राहिले. 'हिंदू' भावनेवर भाजपालाही जेव्हा मधेच सत्ता मिळाली, त्यांनाही असा जातींचा आधार घ्यावा लागला.
म्हणजे उत्तर प्रदेशात झालेल्या जातीय ध्रुवीकरणाचा फायदा प्रादेशिक पक्षांना झाला. जेवढं हे 'सोशल इंजिनिअरिंग' अधिक बळकट तेवढी सत्ता बळकट. 2007 मध्ये मायावतींना पूर्ण बहुमत मिळालं आणि 2012 मध्ये अखिलेश यादव यांना.
2014 मध्ये राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदींचा उदय झाला. त्यात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा होता. शेवटी दिल्लीच्या तख्ताची वाट लखनऊमधूनच जाते. पण त्यानंतर उत्तर प्रदेशात काही वेगळं झालं. सोपं विश्लेषण हे असेल की जातींपेक्षा 'हिंदू' या ओळखीवर अधिक मतदान झालं. पण लखनऊमध्ये ज्येष्ठ पत्रकार राजेद्र द्विवेदी आम्हाला भेटतात. ते महत्वाचं निरिक्षण सांगतात, "इथं जात आणि धर्म यांच्यात जेव्हा टक्कर होते तेव्हा बहुमत मिळत नाही."

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
"पण, 2014 मध्ये जेव्हा मोदी आले तेव्हा त्यांनी जात आणि धर्म या दोघांचंही मिश्रण केलं. हिंदुत्व हा त्यांच्या अजेंडा होताच, पण इथं मागासांमध्ये 79 जाती आहेत, त्यांना त्यांनी एकत्र बांधलं. त्यासाठी मुलायमसिंग आणि त्यांच्यासोबत असणारे यादव यांच्याविरुद्ध त्यांनी एक मोहिमच उघडली. त्यामुळं अतिमागास आणि सवर्ण अशा जातींना सोबत घेतल्यानं त्यांना 2014, 2017 आणि 2019 या तीनही वेळेस उत्तर प्रदेशात यश मिळालं."
"पण 2017 पासून 2022 पर्यंत जो फॉर्म्युला मोदींनी वापरला होता धर्म आणि जातींच्या मिश्रणाचा, तो भाजपानं स्वत:च तोडला. योगी आदित्यनाथांना मुख्यमंत्री बनवलं आणि जातींशिवाय धर्माला सर्वाधिक महत्व दिलं.
म्हणजे हिंदुत्वाच्या अजेंड्याला. योगी तर सगळ्या देशभर प्रचार करतात. गुन्हे असणाऱ्या मुस्लिम नेत्यांवर कारवाई केली. पण दुसरीकडे यावेळेस अखिलेश यादवांनी तो मोदींचा फॉर्म्युला वापरला. यादवांनाच महत्त्व न देता इतर जातींनाही महत्त्व दिलं. ज्या छोट्या जातींनी भाजपाला मतदान केलं होतं, त्यांना जोडून घेतलं," राजेंद्र द्विवेदी पुढे सांगतात.
त्यामुळेच योगी आदित्यनाथांच्या येण्यानंतर हिंदुत्वाची आणि जातींची, दोन्ही प्रकारच्या ध्रुवीकरणाची गणितं बदलली आहेत. त्यातलं कोणतं गणित यावेळेस उत्तर प्रदेशच्या भूमीवर मतदारांमध्ये घडून येतं आहे, त्यात लखनऊच्या सिंहासनाचा अधिकार कोणाकडे याचं उत्तर दडलं आहे.
जो राम को लाए है...
ही गणितं बदलली आहेत की तशीच आहेत आणि त्यातलं कोणतं यंदाच्या निवडणुकीत सोडवलं जाणार आहे, हे जाणून घेण्यासाठी अयोध्येपेक्षा संदर्भयोग्य जागा कोणती असावी? उत्तर प्रदेशचा आणि पर्यायानं देशाचा राजकीय पोत बदलण्याची सुरुवात अयोध्येपासून झाली.
तेव्हाच्या आणि आताच्या अयोध्येत आता खूप फरक आहे. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे मंदिर-मशीद हा वाद संपला आहे आणि दोन्ही समुदायांना सर्वोच्च न्यायालयानं जागा दिल्या आहे. राममंदिराच्या उभारणीचं कामही सुरु झालं आहे.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
अयोध्येचा शरयूतीर आता नवीन घाटांवर गर्दी पाहतो आहे. शरयूच्या मुख्य प्रवाहापासून पाणी आत घेत 'राम की पौडी'वर आता नव्यानं बांधकाम झालं आहे. काठावरच्या जुन्या इमारतींना, मंदिरांना रंग दिला गेलाय, सुशोभिकरण झालंय.
रात्री रोषणाई होते. रोज एखाद्या जत्रेसारखं वातावरण असतं. रस्ते मोठे होताहेत. जुन्या गल्ल्यांना, दुकानांना उठवून मोठं केलं जातं आहे.
मंदिराच्या आधारानं अनेक वर्षं व्यवसाय करणाऱ्या या दुकानदारांची नाराजीही अयोध्येत पावलापावलावर ऐकू येते. पण नव्या होणाऱ्या मंदिराकडे जाणारा रस्ता प्रशस्त 90 फूटी करण्याच्या कल्पनेनं अयोध्या भारावली आहे.
हॉटेल्सची संख्या वाढली आहे. गर्दी दिवसागणिक वाढते आहे. अयोध्येच्या धार्मिक, राजकीय प्रतिकासोबतच भैतिक विकासाचं चित्रंही उभं केलं जातं आहे.
फिरतांना पार्श्वसंगीतासारखं दुकानांतून, प्रचाराच्या गाण्यातून सतत ऐकू येत राहतं, 'जो राम को लाए है... कुठेकुठे मोठे बोर्डही लावले गेलेत.
"राम आणि राष्ट्र तुम्ही वेगळे काढू शकत नाही. कारण आपली राष्ट्राची संकल्पना ही रामाशी जोडली गेली आहे. रामाला जर बाजूला काढलं तर आपलं काहीच उरत नाही," साध्वी मांडवी अनुचारी सांगतात.
त्या अयोध्येतल्या नझरबाग भागात 'अंजली गुंफा' या त्यांच्या आश्रमात भेटतात. अनेक साधू तिथं आहेत. 'रामचरितमानस'चा पाठ चालू आहे. साध्वी त्यांच्या राजकीय मतांबाबत स्पष्ट आहेत.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
"आमची जबाबदारी आहे की आम्ही जर रामाचे उपासक आहोत तर आम्ही राष्ट्राचीही चिंता करावी. आम्हाला वाटतं की उत्तर प्रदेशमध्ये एक समर्थ सरकार यावं आणि योगी आदित्यनाथांच्या कामानं, राष्ट्रनिष्ठेनं आम्ही सगळे प्रभावित आहोत," साध्वी सांगतात.
त्या सरळ बाजू घेतात. उत्तरेच्या या भागात असणारे साधू, साध्वी, महंत, आश्रम यांचा त्यांच्या अनुयायांवर, जे मतदारही असतात, त्यांच्यावर प्रभाव असतो.
साध्वी अनुचारी आम्हाला भेटल्यावर जवळच्याच आंबेडकर नगर भागात काही दिवसांसाठी आख्यानासाठी जाणार होत्या. तुमची राजकीय मतं, मतदान याबद्दल तुम्ही अनुयायांशी बोलता का, असं विचारल्यावर म्हणतात, "आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो."
पण मग धर्मसत्ता-राजसत्ता यांचं वेगळं असणं, धर्मावर होणार ध्रुवीकरण, येणारा द्वेष, या निवडणुकीत आदित्यनाथांची आक्रमक होत चाललेली भाषा याबद्दल त्यांना विचारतो त्यावर त्या म्हणतात, "जेव्हा राष्ट्राचा, धर्माचा प्रश्न येतो तेव्हा साधुपण हातातली माळ सोडून बाहेर पडतो. जेव्हा रावणाचा आतंकवाद वाढला तेव्हा विश्वामित्रांना चिंता वाटली की हा देश कसा वाचणार? म्हणजे जेव्हा राष्ट्राचा प्रश्न येतो तेव्हा साधुसंत हे सुद्धा माळ सोडून शस्त्र हाती घेतात."

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
हिंदुराष्ट्रवाद ही सद्यकालीन भारतातली राजकीय थीम आहे. अयोध्या त्यातलं हे प्रतिक आहे. पण श्रद्धाळू सामान्य हे त्याचा तसाच विचार करतात का?
हे नक्की आहे की अयोध्येचं श्रेय हा भाजपचा निवडणुकीतला एक आधार आहे. अयोध्या हा कायम भाजपाचा गडही राहिलेला आहे.
साध्वींच्या आश्रमातून बाहेर पडून पुढे फिरतांना आम्हाला पुरुषोत्तमाचारी भेटतात. त्यांचं इथंच शंभर वर्षं जुनं वैकुंठ मंडप हे मंदिर आहे. इथंही विद्यार्थी वेदाध्ययन करतात. पुरुषोत्तमाचारींचं मत वेगळं आहे.
"अयोध्या म्हणजे फक्त हिंदू थोडेच आहेत? इथं मुस्लिम आहेत, इतर जातींचे भरपूर आहेत. सगळेच सारखा विचार करत नाहीत. काही संत महंत फक्त एका बाजूनं विचार करतात. कारण हा भाजपाचा गड आहे. तो पडला तर जगात नाक कापलं जाईल असं त्यांना वाटतं, पण बाकीच्यांसाठी आर्थिक प्रश्न जास्त महत्वाचे आहेत," ते सांगतात.
ते आम्हाला त्यांच्या मंदिरात घेऊन जातात. शतकापूर्वीची ही इमारत. जाणवतं की त्यात एक गूढ आहे.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
पुरुषोत्तमाचारींच्या मते केवळ हिंदुत्व यंदा इथे चालणार नाही आणि अयोध्येची निवडणूक नेहमीसारखी भाजपाला सोपी नाही.
"राममंदिराचा मुद्दा भाजपा करु पाहतं आहे, पण तो तसा होत नाही आहे. लोक म्हणतात की हा तर न्यायालयाचा निर्णय आहे. तुम्ही केवळ आंदोलन केलंत, पण निर्णय तर एवढ्या वर्षांच्या न्यायालयाच्या निकालातनंच आला ना?," ते म्हणतात.
पण भाजपाकडून जो 'राम को लाए है' चा प्रचार सुरु आहे, त्याचं काय? "कोई भगवान को लाएगा? देव तर इथेच होते. तुम्ही केवळ मंदिराची योजना केलीत. रामाला तुम्ही आणलं असं कसं कोणी म्हणू शकतं?" पुरुषोत्तमाचारी थोडा आवाज चढवून विचारतात.
हाच प्रश्न अजून एक जण अशाच चढ्या आवाजात विचारतात. "अरे राम को आए हुए कितना जमाना बीत गया. आप खुद आए है पचास-साठ साल पहले. इन्सान जब भी परेशानी मे होता है भगवान को याद करता है, राम को याद करता है. और आप राम को लाओगे?" हा आवाज असतो सय्यद मुहम्मद असिफ यांचा.
अयोध्येयल्या 'सुग्रीव किला' जवळ असिफ यांचं घर आहे. त्यांच्या कुटुंबाला इथे येऊन काही शतकं झाली आहेत. त्यांच्यासारखी अशी अनेक कुटुंबं आहेत जी इथं सहअस्तिवानं राहतात. वाद नंतर आला.
जेव्हा बाबरी मशीद पाडल्यानंतर हिंसा उसळली, त्यात असिफ यांच्या कुटुंबाचंही नुकसान झालं. आता ते आणि त्यांचे भाऊ शेजारीच एक शाळा चालवतात. तिथे दोन्ही धर्मांतली मुलं शिकतात.
ते म्हणतात अयोध्या आता बरीच पुढे निघून आली आहे. निवाडा सगळ्यांनीच मान्य केला आहे. मुस्लिम भाजपाला मत देतच नाही हेही एक मिथक असल्याचंही ते सांगतात. पण रामाचा मुद्दा असा प्रचारात येतो त्यानं ते व्यथित होतात. त्यावरच बराच वेळ बोलतात.
"एवढे मोठे जर तुम्ही आहात की तुम्ही रामाला आणू शकता, तर मग तुमचे दोन्ही हात वर करुन हवेत फिरवा आणि एका झटक्यात हिंदुस्थान सोन्याचा करुन टाका. सगळी बेरोजगारी संपवून टाका. लोकांना नोकऱ्याही द्या. सगळ्यांना खूष करा आणि मग कायमचं राज्य इथं करत बसा," असिफ एका प्रकारच्या उद्वेगानं म्हणतात.
अयोध्येतला वादच जरी सगळ्यांना बाहेर दिसत असला तरीही इथल्या हिंदू-मुस्लिम सहअस्तित्वाची उदाहरणं अनोखी आहेत. फिरतांना आम्ही एका फुलांच्या बागेजवळ येतो. अगदी शहराच्या मध्यातच ही बाग आहे.
देशी गुलाब लावला गेलाय, शेवंती आहे, थोडा झेंडू आहे. ही बाग अनीस महंमद यांची आहे. त्यांच्या गेल्या पाच पिढ्या अयोध्येत फुलांची शेती करतात आणि कनकभवन पासून हनुमानगढीपर्यंत अयोध्येतल्या अनेक मंदिरांमध्ये त्यांच्या बागेतली फुलं जातात. लॉकडाऊनमध्ये रोज ती रामलल्ला मंदिरामध्येही जात होती.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
"चुनाव के भाषण आप देख रहे हो क्या?" मी विचारतो. ते 'हो' म्हणतात. सध्या ध्रुवीकरणाकडे जाणारी जिन्ना, पाकिस्तान, आतंकवादी, सायकल बम अशी विधानं होतात त्याबद्दल काय वाटतं त्यांना? "काय होणार? असेच सगळे वेगवेगळे होणार. बटवांरा. कट्टरतावादी हे सगळं करताहेत. हे कट्टर लोक दोन्हीकडे आहेत," अनीस शांतपणे सांगतात.
धर्म आणि जात यांच्यामध्ये दोलायमान अवस्थेत इकडनं तिकडं होणारी मतं अयोध्येत पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात.
जर गड असणाऱ्या अयोध्येत हे असं तर प्रदेशात इतरत्र काय चित्र असेल? ज्या भागांमध्ये आम्ही फिरतो तिथं अजून कुंपणावर असलेले अनेक जण दिसतात. त्यांना शेवटच्या क्षणी एका बाजूला नेणारा घटक कोणता असेल? धर्म, जात की आर्थिक प्रश्न.
भावना निर्णयाक ठरतेच असं नाही, पण उत्तर प्रदेशमध्ये ती सतत जाणवते मात्र. शरयूघाटावर भगवी वस्त्रं परिधान केलेले, मोठी पांढरी दाढी असलेले स्वामी शिवरामानंद गप्पांमध्ये बोलायला लागतात. ते घाटावरच्याच एका वेदपाठशाळेत शिकवतात. मी विचारतो, "तुम्ही मतदान करता का?" "करतो, दर वेळेस न चुकता करतो," ते सांगतात. पुढे बोलायलाही लागतात.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
"मुलायमसिंग, अखिलेश यांना कोणी कोणी मोठं केलं होतं? आम्हीच केलं होतं. बडे भाव से बनाये थे उनको. ते लोक आम्हीच होतो. पण त्यांच्यात आता काहीच भाव उरलेला नाही. नुसतं जात जात करत राहिले. त्यांच्या काळात सगळीकडे नुसते यादव भरले. दुसऱ्या कोणत्या जातीला घेतलंत? मायावती आल्या तर ठाकूर आणि ब्राम्हण यांनी काही म्हटलं तर त्यांच्यावर कारवाई केली. हेच सगळं चालू राहिलं."
"पण सगळेच हे करत नाहीत?," मी उलट विचारतो.
"कुठं सगळे करतात? भाजपा तर करत नाही. योगी मोदी सरकारमध्ये हे झालं असेल तर सांगा मला," शिवरामानंदांचा प्रतिप्रश्न.
मी योगींनी ते ज्या ठाकूर समाजातून येतात त्याबद्दल बोललल्याचं सांगतो, पण ते ऐकून घेत नाहीत. पण शिवरामानंद उत्तर प्रदेशचं राजकारण त्यांच्या छोट्या उत्तरात सांगून टाकतात. धर्म मोठा होऊन जातींना कवेत घेतो, ही एक थीम आणि जाती जोडण्याची दुसरी थीम.
काशी अभी बाकी है...
अयोध्येनंतर उत्तरेच्या आणि देशाच्याच हिंदुत्वाच्या राजकारतल्या ऑप्टिक्सचं दुसरं ठिकाण वाराणसी, म्हणजेच बनारस, म्हणजेच काशी. त्यामुळे आमचा पुढचा मुक्काम वाराणसी. विश्वनाथाची, विद्वानांची, विद्यापीठांची, साडी विणणाऱ्या 'बुनकर' कारागिरांची काशी.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
हिंदू संस्कृतीतल्या वाराणसीच्या या महत्वामुळेच जेव्हा नरेंद्र मोदींनी जेव्हा २०१४ मध्ये पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी वाराणसी निवडलं. यावेळेसही तेच इथले खासदार आहेत. त्यामुळेच जेव्हा यंदाच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत हिंदुत्वाचा रोख काय आहे याचा अदमास घेण्यासाठी आम्ही फिरतो, तेव्हा वाराणसीत येणं आवश्यक ठरतं.
जशी अयोध्या बदलते आहे तशी वाराणसीही बदलते आहे. छोट्या छोट्या अनंत गल्ल्यांचं हे पुराणकालीन शहर, आता मोठ्या रस्त्यांचं होतं आहे.
रस्ते प्रशस्त झाले आहेत. दर्शनी भाग एकाच रंगाच रंगवला आहे. असंख्य मंदिरांच्या रांगेत गंगातीरावर काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचं चाललेलं भव्य काम वेगळं दिसतं आहे. धार्मिक आणि भौतिक प्रतिकांचा मेळ घालण्याच्या भाजपाच्या राजकारणाचं वाराणसी एक मॉडेल बनतं आहे.
या मॉडेलमध्ये काही आवाज समाधानाचे आहेत, काही असमाधानाचे. रस्त्याकडेला थंडाई पीत थांबा आणि बोलायला लागा तर कोणी या बदलत चाललेल्या रुपाबद्दल खूष आहे तर कोणाचं घर गेलंय, दुकान गेलंय, ते नाखूष आहेत.
काशीतले आवाज मिश्र आहेत. इथं हिंदुत्वाच्या मुद्द्यापेक्षा स्थानिक उमेदवारांच्या कामावरच निवडणुकीची चर्चा होते, ऐकू येते.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
तुलसीदासांचं रामचरितमानसचं हस्तलिखित जिथं आहे त्या तुलसी घाटावर आम्ही प्राध्यापक विश्वंभरनाथ मिश्रांना भेटतो.
मिश्रा हा काशीतला एक विद्वान आवाज आहेत. ते इथल्या प्रसिद्ध संकटमोचन मंदिराचे मुख्य महंत आहेत आणि स्वत: 'आयआयटी'न आहेत.
'आयआयटी' बनारसच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागाचे ते प्रमुख आहेत. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड त्यांच्या बोलण्यात आणि लिखाणात होत असते.
बदलणाऱ्या बनारसमुळं ते नाराज आहेत. "काशी ही कधी भौतिक विकासाबद्दल ओळखली गेली नाही. ती ओळखली गेली इथल्या विद्वानांमुळे. इथल्या शास्त्र, कला, संगीत, अध्यात्म यांच्या संगमामुळे, इथल्या व्हाईब्समुळे. पण इथे त्यासाठी काय होतं आहे? मला वाटतं या शहराची संस्कृती हळूहळू लोप पावते आहे.
इमारतींचा विकासच पाहायचा असता तर आम्ही गुरुग्रामला जाऊ ना, काशीला का पाहू?" ते विचारतात. पहिली निवडणूक लढवण्याअगोदर नरेंद्र मोदी तेव्हा मिश्रांशी येऊन सल्लामसलत करुन गेले होते.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
मिश्रांच्या मते हिंदुत्वाचा नव्हे तर बेरोजगारीचा, नोकऱ्यांचा, शिक्षणाचा मुद्दा वाराणसी आणि पूर्वांचलच्या पट्ट्यात महत्वाचा आहे.
"पहिल्यांदा तुम्ही खुल्या मनानं बाजूला पाहा तरी, मग तुम्हाला हे नजरेला पडेल. पण तुम्ही जर उंदराएवढं छोटं मन करुन बसलात तर काय होणार? हिंदुत्वाचाच प्रश्न असेल तर तो कोणी राजकीय पक्ष का चालवेल? आमच्याकडे वैदिक विद्वान आहेत, शंकराचार्य आहेत, त्यांना आम्ही विचारु. हे राजकीय लोक आम्हाला धर्म-कर्म काय शिकवणार?" मिश्रा रागानं विचारतात.
मिश्रांच्या तुलसीघाटावरुन निघून घाटाघाटानं आम्ही पुढे दशाश्वमेघ घाटाजवळ येतो. जवळच्या एका मंदिरात मोठ्यानं भजन चाललेलं आहे. गर्दी आहे. रामनामाचा जागर मध्येच सोबतीनं होतो आहे. ते संपल्यावर ओळखपाळख होते आणि गप्पा लगेचच राजकारणावर येतात.
या आणि अशा प्रत्येक गप्पांवरुन एक समजतं की धर्म आणि श्रद्धा आता पुरत्या राजकारणात मिसळल्या आहेत. त्यांना राजकारणापासून दूर ठेवा अशा प्रकारचा विचार आता फारशी सहमती मिळवत नाही.
"बनारस, काशी हा कायम कमळाचा गड राहिला आहे. आता त्या गडात घुसून बेघर करणं हे कोणाला वाटत असेल तर मला तर ते काही समजत नाही. इतकं काम, एवढी व्यवस्था केल्यावरही लोकांना धृतराष्ट्र बनायचं असेल तर आमचं हे दुर्भाग्य आहे," महावीरप्रसाद वाजपेयी म्हणतात.
ते धर्मोपदेशक आहेत आणि इथल्या ब्राम्हण सभेचे अधिकारीही आहेत. त्यांच्या शेजारी बसलेले असतात महंत अवधकिशोरदास. मलाही बोलायचं आहे असं खुणावतात. "भाजपा ही एकमेव धर्मसापेक्ष पार्टी आहे आणि बाकी सगळे आहेत ते धर्मनिरपेक्ष आहेत. त्यामुळं धर्माची रक्षा करण्यासाठी आम्ही सगळे त्यांचाबरोबर आहोत," ते सांगतात.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
यावरुन उत्तर प्रदेशचा एक विचारप्रवाह ध्यानात यावा. जवळच असणाऱ्या दशाश्वमेघ घाटावर संध्याकाळच्या गंगाआरतीसाठी आम्ही जातो. आता तो मोठा रोजचा इव्हेंट बनला आहे.
हजारो लोक त्यासाठी जमतात. श्रद्धा त्यांना इथे काशीला घेऊन आली आहे, पण ते मतदारही आहेत. त्यांची श्रद्धा आणि मत ते कसं वेगळी करतात हेही कोडं आहे.
घाटावरच्या आरतीनंतर तिथंच शिवम गुप्ता भेटतात. तरुण पत्रकार आहेत आणि गंगा आरतीच्या संयोजनातही असतात. "जेवढं हिंदुत्व अगोदर चाललं तेवढं यावेळेस नाही चालणार. पूर्वांचलच्या विकासावरुन बरंच असमाधान आहे. 'नमामि गंगे'चंच घ्या. अजूनही कित्येक ठिकाणी गंगा अशुद्ध आहे. लोक धर्माकडे जाणार नाहीत यावेळेस," शिवम सांगतात.
"पण मोदी स्वत: इथनं निवडून येतात. ते शेवटच्या टप्प्यात इथं येऊन थांबणारही आहेत काही दिवस," मी म्हणतो. "ते येतील, हिंदुत्वाचाही मुद्दा येईल, पण ते २०२४ ला, आता २०२२ आम्ही वेगळं करु, " शिवम त्यावर म्हणतात.

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
हिंदुत्वाचा मुद्दा राजकारणात येतो तेव्हा त्याचा परिणाम मुस्लिम मतदारांवर होतो, हे नेहमीच पाहिलं जातं. ध्रुवीकरण तिकडंही होतं.
उत्तर प्रदेशमध्ये अगोदर कॉंग्रेसचं आणि नंतर समाजवादी पक्षाचं राजकारण मुस्लिमांच्या मतांवर चाललं.
यावेळेस जेव्हा पाकिस्तान, जिन्ना, आतंकवादी, सायकल बम हे सगळं उत्तर प्रदेशच्या प्रचारात येत गेलं. त्याच्या स्वर वाढत गेला. ते कमी होतं म्हणून कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाचे पडसादही इथल्या निवडणुकीत उमटले.
असदुद्दिन ओवेसींची भाषणं इथे चर्चेचा मुद्दा ठरली. त्यामुळे उत्तर प्रदेशात हिंदुत्व चालणार का प्रश्नाची आरशातली बाजू मुस्लिम काय करणार अशी असते.
वाराणसीत मोठी मुस्लिम लोकसंख्या आहे. त्यातले बहुतेक कारागिर आहे, म्हणजे 'बुनकर'. इथल्या ज्या प्रसिद्ध बनारसी साड्या आहेत, त्या घडवणारे बहुतांशी मुस्लिम आहेत.
अयोध्येत विश्वनाथाच्या मंदिराजवळ असणाऱ्या 'ग्यानवापी' मशीदीचे विश्वस्त एस. एम. यासीन आम्हाला भेटतात. या मशीदीविषयीही उलतसुलट चर्चा होत असते. पण मुस्लिम समुदाय यंदाच्या निवडणुकीत काय करणार?

फोटो स्रोत, SharadBadhe/BBC
"यांनी खूप प्रोव्होकेट करण्याचा प्रयत्न केला, पण ते झालं नाही. बनारसमध्येही सुरुवातीला असे प्रयत्न केले गेले आणि शक्य आहे शेवटच्या टप्प्यात निवडणूक येईपर्यंत अजून असे प्रयत्न होतील. पण तरीही मुस्लिम यंदा शांतपणे त्यांना हवं तसं मतदान करतील. काशीत मंदिर आणि कॉरिडॉर झाल्यानंतर तर सगळे शांत आहेत, काहीही चिंता नाही," यासीन आम्हाला सांगतात.
काशीतल्या गंगेनं, अयोध्येच्या शरयूनं आणि लखनऊच्या गोमतीनं अनेक स्थितंतरं शतकानुशतकं पाहिली आहेत. कित्येक त्यांच्या प्रवाहासोबत वाहून गेली आहेत. बदल त्या प्रवाहांनी घडवले आहेत. त्यांच्या कालरेषेवर ही निवडणूक काहीच नाही.
पण सद्यकालीन आणि नजीकच्या राष्ट्रीय राजकारणासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. हिंदुत्व किंवा धर्माचा समावेश असलेलं राजकारण चालेल का, त्याचं स्वरुप कसं असेल हे या निवडणुकीवरुन ठरेल आणि 2024 च्या निवडणुकीवरही त्याचे परिणाम होतील.
वरवर कोणतीही लाट दिसत नसली तरीही अंत:प्रवाह किती जोरात आहे आणि तो कोणाचा आहे हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं तूर्तास इतकंच म्हणता येईल उत्तर प्रदेश 'वरुन' शांत आहे.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









