You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत शिवसेनेत एकटे पडले आहेत का?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या काही संपत्तीवर ईडीने 4 एप्रिलला टाच आणली. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीने राऊत यांच्यावर ही कारवाई केली. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
स्वतः संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त ईडीच्या कारवाईबाबत बोलण्यासाठी शिवसेनेचा एकही नेता समोर येऊन बोललेला दिसला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन गाऱ्हाणं मांडलं.
ही कारवाई चुकीची असल्याचंही ते म्हणाले. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या कारवाईनंतर आतापर्यंत तरी शांत राहणं पसंत केल्याचं दिसतंय.
महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्रिमंडळातले शिवसेनेचे मंत्री किंवा आमदारांनी भाजपला आक्रमकपणे उत्तर देणारं कोणतही भाष्य केलं नाही.
सत्ता स्थापनेमध्ये राऊत यांचा मोठा वाटा तरीही...?
महाविकास आघाडी सरकार स्थापनेत संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जी रस्सीखेच सुरू होती त्यामध्ये संजय राऊत हे सातत्याने मुख्यमंत्री 'शिवसेनेचाच होणार' हे सांगत होते आणि भाजपला प्रत्युत्तर देत होते.
त्यादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटे अचानक शपथविधी पार पडला. तेव्हा राजकीय वर्तुळात संभ्रम अवस्था होती. पण संजय राऊत हे 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार' या दाव्यावर ठाम होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.
या सत्ता स्थापनेवेळी धमक्या आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं, "महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करा. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या मला दिल्या."
त्याचबरोबर कारवाईबाबत बोलताना राऊत म्हणतात, "मी अशा कारवाईला घाबरत नाही. माझं राहतं घर आणि स्वकष्टाने मिळविलेल्या जमिनीवर ईडीने जप्तीची कारवाई केल्याने भाजपला उकळ्या फुटतायेत. माझ्या संपत्तीचा 1 रूपया जरी अवैध असेल तर ती संपत्ती भाजपला दान करेन. महाराष्ट्रातही लवकरच कारवाईचे सत्र पाहायला मिळेल."
यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांना पुण्यात पत्रकारांनी राऊत यांच्या कारवाईबाबत विचारलं असता, ते म्हणाले, "हे लोकशाहीचं नव्हे, दबावशाहीचं वातावरण आहे. केंद्रीय यंत्रणांची कारवाई राजकीय हेतूनं सुरू आहे. राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईत सूडबुद्धी स्पष्ट दिसत आहे."
राष्ट्रवादी धावून आली मग शिवसेनेच्या नेत्यांचं मौन का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मोदींची भेट घेतली आणि संजय राऊत यांच्या कारवाईबाबत चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामधले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ही कारवाई सूडबुद्धीने असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. पण शिवसेनेच्या इतर मंत्र्यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. शरद पवार बोलले पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन का बाळगलं?
लोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान याविषयी विश्लेषण करताना सांगतात, "जे शिवसेनेचे इतर मंत्री किंवा नेते आहेत त्यांच्यावरही ईडीची टांगती तलवार आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे मोठे नेते किंवा म्होरके म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यांच्यावर जर कारवाई होऊ शकते तर आमच्यावरही कारवाईचा फास आवळू शकतो ही भिती सेना नेत्यांमध्ये आहे.
"त्यामुळे जे नेते या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारपासून बाहेर आहेत त्यांनी याबाबत वक्तव्य केलेलं दिसून येत. मुख्यमंत्र्यांनी या सर्व वादापासून दूर राहण्याची रणनीती शिवसेनेची असू शकते. त्यामुळे संजय राऊत एकटे पडले आहेत असं वाटत नाहीत. पण त्यांच्यावरच्या कारवाईने शिवसेनेच्या इतर नेत्यांमधली भिती वाढली आहे. "
शरद पवार बोलल्यानंतर इतर नेते काय बोलणार?
जेष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, "शिवसेनेचे इतर नेते हे फार आक्रमकपणे प्रतिक्रीया देताना तसेही दिसत नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे मास्टर माईंड शरद पवार आणि आदित्य ठाकरे बोलल्यानंतर इतर नेते काय बोलणार? हा प्रश्न येतोच.
"त्यामुळे संजय राऊत यांच्यावर शिवसेनेचे महाराष्ट्रातले मंत्री किंवा इतर नेते बोलत नसतील तरीही भक्कम पाठींबा मिळतोय हे नाकारता येणार नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)