You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनसेचे मुस्लीम पदाधिकारी म्हणतात, 'माझ्या पक्षात जातीपातीला थारा नाही असं राजसाहेब म्हणाले होते म्हणून आम्ही आलो होतो'
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
"जर मशिदीवरील भोंगे काढले जाणार नसतील तर लाऊडस्पीकरवर तुम्ही हनुमान चालिसा म्हणा," असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनसेतील काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवत राजीनामे दिले.
त्यांच्यापैकीच एक आहे माजिद शेख.
शेख हे पुण्याच्या घोरपडे पेठमधल्या मोहमीनपुरा भागात राहतात. ते मनसेचे पुण्यातले माजी शाखा अध्यक्ष आहेत.
"राज ठाकरेंच्या भाषणाने प्रभावित होऊन मी 2009 साली मनसेत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे, ब्ल्यू प्रिंट, बेरोजगारी असे विषय घेऊन राज ठाकरे सगळ्यांच्या समोर आले होते.
"मी आधी कुठल्याच राजकीय पक्षात नव्हतो पण राज ठाकरे यांनी हाती घेतलेल्या विषयांमुळे मी म्हणत मनसे साठी काम करू लागलो. गुढीपाडव्याच्या भाषणावेळी मला हीच अपेक्षा होती की भ्रष्टाचार बेरोजगारी आणि महाराष्ट्राच विकासाचा मुद्दा राज ठाकरे मांडतील पण ते भाषण वेगळ्याच दिशेने गेलं, जे ज्यायला नको होतं. त्यामुळे आम्ही ज्या समाजात राहतो तिथे काय सांगणार? समाजाच्या विरोधात जाणं आम्हाला शक्य नाही. यासाठी मी मनसे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि पदाचा राजीनामा दिला," माजिद शेख सांगतात.
पुण्यातील मनसेचे माजी शाखा अध्यक्ष माजिद शेख सांगत होते. राज्य ठाकरेंच्या भाषणाने मनसेमधले अनेक मुस्लीम पदाधिकारी दुखावले गेले आहेत.
त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना यांना भेटण्याची आतापर्यंत दोन-तीन वेळा भेटण्याची संधी मिळाली आहे. त्या दोन-तीन भेटीही त्यांच्यासाठी अविस्मरणीय असल्याचं माजिद शेख सांगत होते.
"माझ्या पक्षात जातीपातीला थारा नाही, जे पक्षात जातपात आणतील त्यांना पक्षात ठेवणार नाही."
राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान त्यांच्या तोंडून आलेलं हे वाक्य अजूनही लक्षात असल्याचेही माजिद शेख सांगतात.
निवडणुकीत याची किंमत मोजावी लागणार?
माजिद शेख यांच्यासोबतच मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांनीही जिल्हाध्यक्षांकडे राजीनामा सोपवला आहे.
मनसे नगरसेवक वसंत मोरे या राजीनाम्याबाबत बोलताना म्हणाले, "माझ्या आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या मतदारसंघात मुस्लिम मतदार जास्त आहेत. त्याचा निवडणूकीवर परिणाम होऊ शकतो. मी माझ्या प्रभागात शांतता राहावी यासाठी प्रयत्न करणार आहे. पण राज ठाकरे हे काय बोलले आहेत. ते कोणाला समजलेच नाही. त्यांचा प्रार्थनेला विरोध नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे. "
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर भव्य मेळावा घेतला. त्या सभेमध्ये बोलताना, राज ठाकरे यांनी मशिदीवर चे भोंगे खाली उतरवावेच लागतील असं सांगितलं. त्याचबरोबर हे भोंगे काढले नाहीत तर त्याच्यासमोर स्पिकरवर हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावण्याचे एकप्रकारे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
"मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्याही प्रार्थनेला दूर होत नाही तर आम्हाला त्रास देऊ नका मशिदीवरील भोंगे खाली पुत्र 22 लागते नाही तर आजच सांगतो आत्ताच सांगतो या मशिदीच्या माहेर भाऊ मी लागतील त्याच्यासमोर होऊन त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायचा. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होते का? तेव्हा व्हायच्या ना प्रार्थना... मग आता कशाला पाहीजे लाऊडस्पीकर?"
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर मनसे पक्षातील अनेक मुस्लिम पदाधिकारी नाराज आहेत. या नाराजीतून माजिद शेख यांनी शाखा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या वक्तव्यानंतर नाराज होऊन दिला गेलेला मनसे पक्षातला हा पहीला राजीनामा होता. पण त्यानंतर राजीनाम्याचं सत्र सुरू झालेलं आहे. पुण्यातील पदाधिकारी, शाखाप्रमुख वाहतूक सेनेचे पदाधिकारीही राजीनामा देत आहेत.
राज ठाकरे म्हणाले होते, "2019ची विधानसभा निवडणूक आठवा. भाजप आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. निकाल लागल्यानंतर शिवसेनेला खासकरून उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला की मुख्यमंत्रीपदासाठी अडीच अडीच वर्षं ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाहीत तुम्ही. महाराष्ट्रभरच्या सभांमध्ये बोलला नाहीत.
"मुख्यमंत्री फडणवीस होतील असं पंतप्रधान बोलले तेव्हा तुम्ही व्यासपीठावर होतात, तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडकतंय, तेव्हा अडीच वर्षांची टूम काढली. एकांतात बोलले होते, मग बाहेर का नाही बोलले? जी गोष्ट सगळ्या लोकांसमोर येणार आहे ती चार भिंतीत का केलीत.
"एक दिवस सकाळी उठून पाहिलं तर जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले. लग्न कोणासोबत? तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवतोय. ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं ते शरद पवार आणि काँग्रेससोबत जायला नव्हतं केलं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणती शिक्षा देणार?"
राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार?
राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मनसेतील अनेक मुस्लिम पदाधिकारी नाराज असल्याची माहिती आहे. याबाबत बोलण्यासाठी बीबीसी मराठीने काही मुस्लिम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण अनेकांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी संपर्क केला असता, "राज ठाकरे सगळ्या प्रतिक्रियांवर लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट करतील," असं ते म्हणाले.
या विषयावर मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले राज ठाकरे जे म्हणाले त्याबाबत काही लोकांचा गैरसमज झाला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)