राज ठाकरे : भाजपा आणि 'मनसे'च्या युतीचं घोडं नेमकं कुठं अडलं आहे?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

गुढीपाडव्याच्या राज ठाकरेंच्या भाषणानंतर पुन्हा एकदा 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'च्या भाजपासोबतच्या युतीबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या. या चर्चा काही नवीन नाहीत. जेव्हापासून शिवसेनेनं भाजपासोबतच्या युतीतून काढता पाय घेतला तेव्हापासून भाजपाच्या मित्राची जागा राज ठाकरेंची सेना घेणार असल्याचं बोललं जाऊ लागलं.

दरम्यानच्या काळात ब-याच भेटीगाठी घडल्या. अगोदर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले. राज यांनी आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्याचा प्रत्यय शनिवारच्या (2 एप्रिल) भाषणातही आला.

त्यांनी हे भाषण केलं आणि लगेच दुस-या दिवशी रविवारी (3 एप्रिल) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांना भेटायला घरी गेले. भाजपातले पूर्वीपासून राज यांच्याशी मैत्री असलेले गडकरी हे नेते आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युती होण्याची वेळ आली, असं पुन्हा बोललं जात आहे.

अर्थात, दोन्ही पक्षांकडून या शक्यतेबद्दल अजूनही जपूनच बोललं जात आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करुन अशा युतीचा अद्याप कोणताही प्रस्ताव नसल्याचं जाहीर सांगितलं. "एक तर गोष्ट स्पष्ट आहे की भाजप मनसे युती चा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही भविष्यात काय होईल माहीत नाही पण मनात प्रश्न येतो शिवसेना,राष्ट्रवादी यांनी लोकसाक्षीने व्याभिचार केला तरी यांना प्रश्न विचारायचे नाहीत आणि आमच्या अफवा उठल्या तरी यांना मिरच्या झोंबतात हे फारच झालं," असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांसह भाजपाच्या नेत्यांनी राज यांच्या भाषणाचं कौतुक केलं असलं तरीही युतीबाबत अद्याप 'नॉन-कमिटल' भूमिकाच कायम ठेवली आहे. जोपर्यंत राज ठाकरे त्यांच्या परप्रांतीयांबद्दलच्या धोरणात बदल करत नाहीत तोपर्यंत युती होणं अवघड आहे, अशा आशयाचं विधान केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

शक्यता जरी दाट असली तरीही भाजपा मनसे युतीच्या प्रत्यक्षात येण्यात बरेच अडथळे आहेत. त्यामुळे भेटीगाठींनंतरही त्यांच्या युतीचं घोडं अजूनही अडलं आहे. हे अडथळे कोणते आहेत?

युतीचा फायदा कोणाला होणार? भाजपाला की मनसेला?

हा प्रश्न दोन्ही पक्षांच्या गोटामधून विचारला जातो आहे. जर युती झाली तर त्याच्या आपल्याला फायदा काय असा प्रत्येक पक्षाला पडणार हे स्वाभाविक आहे. दोन्ही पक्षांच्या स्तरावर स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलून आणि कालांतरानं सर्वेक्षणं करुन याचा अंदाज घेतला जातो आहे की जर अशी युती झाली तर त्यांना काय फायदा होईल.

किती मतांचा फायदा आपल्याला होईल हा प्रश्न मुख्यत: भाजपासमोर आहे. ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि जिथं मनसे-भाजपा युती ही निर्णायक ठरु शकते, म्हणजे मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नवी मुंबई या शहरांमध्ये, तिथे भाजपा हा मोठा पक्ष आहे. एक तर ते सत्तेत आहेत किंवा त्यांची नगरसेवकसंख्या मोठी आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतांना, जो त्यांच्या सध्याचा व्होट-शेअर आहे, त्यात वाढ होईल की त्यांच्यामुळे केवळ मनसेचाच फायदा होईल, हा प्रश्न भाजपाला सतावतो आहे.

मनसेमुळे शिवसेनेला तोटा होणं ही तर राजकीय खेळी आहेच, पण सोबतच स्वत:च्या नगरसेवकांची संख्या वाढवणं हेही भाजपासमोरचं उद्दिष्ट आहे.

त्यामुळे मनसेमुळे भाजपाला मतांचा आणि जागांचा किती फायदा होईल हे अद्याप स्पष्ट न झाल्यानं हा नवी युती जाहीर होण्यामधला एक अडथळा ठरत आहे. मुंबईचा विचार केला तर उपनगरांमध्ये भाजपची मोठी ताकद आहे, पण मध्य आणि दक्षिण मुंबईत मनसेची ताकद त्यांना किती फायदा मिळवून देऊ शकते याची गणित मांडली जात आहेत.

दुसरीकडे मनसे या मुद्द्यावर युती होण्यासाठी जास्त अनुकूल आहे. मनसे पदाधिका-यांच्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीतही अशी मतं व्यक्त झाली होती. मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये आपली कमी झालेली मतांची टक्केवारी पुन्हा वाढवण्यात मनसेला फायदा होईल. हे उमजून मनसे आणि राज ठाकरेंच्या भूमिकांमधून भाजपाच्या अधिक जवळ जाण्याचे प्रयत्न दिसत आहेत. पण मतांचं गणित हा अद्याप अडथळा आहे.

उत्तर भारतीयांची मतं

राज ठाकरेंना भेटल्यावर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेलं मत असेल वा आता गडकरींच्या भेटीनंतर रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलेलं मत, त्यातून हेच स्पष्ट होतं की राज ठाकरेंच्या उत्तर भारतीयांबद्दलच्या भूमिकेचा आपल्याला राजकीय तोटा होईल असं भाजपाला वाटतं. त्यामुळे तो अद्यापही या युतीच्या निर्मितीमधला अडथळा आहे.

वास्तविक राज यांनी त्यांची भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्यालाही राज ठाकरे गेले होते. इतकंच नव्हे तर गुढीपाडव्याच्या भाषणात राज यांनी योगी आदित्यनाथांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशातल्या प्रगतीचं कौतुक केलं. पण अद्यापही, विशेषत:मुंबईत, उत्तर भारतीयांच्या मतांचं महत्व लक्षात घेता, भाजपाला अद्यापही अंदाज येत नाही आहे की मनसे सोबत असण्याचा परिणाम या मतांवर कसा होईल.

वास्तविक चर्चा अशीही होती की उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा मनसेची युती लांबणीवर पडत आहे. भाजपाला याचे पडसाद उत्तर प्रदेशात पडायला नको होते. पण हा मुद्दा महाराष्ट्रात आणि मुंबईतही लागू आहे. त्यामुळेच या युतीनं इथल्या मतांवर काही परिणाम होईल का याची चाचपणी केली जाते आहे.

हिंदुत्वाचा वारसदार कोण?

राज ठाकरेंनी घेतलेली स्पष्ट आणि आक्रमक हिंदुत्वाची भूमिका हे भाजपासोबत युतीचे संकेत आहेत असं मानलं जातं आहे. अजानच्या भोंग्यांचा विषय भाजपानं काढला, लगेच तो राज यांच्या भाषणातही आला. शिवसेनेनं कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबतच्या युतीमुळे हिंदुत्व सोडलं आणि ती राजकीय जागा मनसे भरुन काढेल असा त्यामागचा अर्थ आहे.

पण राज यांनी किती हिंदुत्वाची भूमिका घ्यावी याबद्दल भाजपाच्या गोटातंही मतं आहे. देशभरात आणि राज्यातही हिंदुत्वाचा मुद्दा हा आपलाच असल्याचं भाजपा सांगते. नरेंद्र मोदींची प्रतिमाही तशी आहे. 'हिंदुहृदयसम्राट' ही बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा असल्यानं ते हयात असतांना भाजपाला महाराष्ट्र आणि मुंबईत हिंदुत्वाचा मुद्दा पूर्णपणे आपल्या हाती घेता आला नाही. त्याचा फायदा शिवसेनेला झाला. पण आता स्थिती वेगळी आहे आणि उद्धव हे जरी 'हिंदुत्व आम्ही सोडलं नाही' असं सांगत असले, तरीही ते आक्रमक हिंदुत्व नाही. ती जागा भाजपानं घेतली आहे.

अशा वेळेस राज यांना ती जागा आक्रमकपणे घेऊ देणं हे भाजपाला परवडणारं नाही. मनसेच्या गोटातून 'नवे हिंदुहृदयसम्राट' असं सोशल मीडियावर म्हटलं जातं. राज यांचं वक्तृत्वही प्रभावी आहेच. पण हा हिंदुत्वाची पोलिटिकल स्पेस अशी सहज राज यांना सोडून द्यायची हा प्रश्न विचारणारा एक मतप्रवाह भाजपात आहे.

युती झाली तर त्याचा काय परिणाम होईल असाही तो प्रश्न आहे. त्यामुळे जरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती होऊ शकते, तरी तो युतीतली एक आडकाठीही ठरु शकतो असं म्हटलं जातं.

युती होण्यात काय अडचणी आहेत?

"मला ही युती अद्याप न होण्याची दोन कारणं वाटतात. एक म्हणजे भाजपाला वाटतंय की त्यांचा उत्तर भारतीय मतदार दुखावू शकतो. त्यांनी हे मान्य केलं असेल की राज हे हिंदुत्ववादी झाले आहेत. पण उत्तर भारतीयांबद्दल भूमिका अजून स्पष्ट नाही. त्याचा कोटा होईल," राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात.

ते पुढं म्हणतात, "दुसरं मला असं वाटतं की टॅक्टिकल अलायन्सवर भर असेल. म्हणजे आता युती करून काही जागा सोडल्या तर तिथे पुढे काही होऊ शकत नाही. भाजपाची ताकद तिथं तयार होणार नाही. मनसेला जागा कायम दिल्या असं होईल. सेनेसोबतची युती तुटली तेव्हा त्यांना असं वाटलं होतं. म्हणूनही ही युती होत नाही आहे."

राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर याबद्दल बोलताना म्हणतात की, एक म्हणजे भाजपाला मनसेनं शिवसेनेची मतं खाल्लेली हवी आहेत. जे भाजपाकडे येणार नाही आणि सेनेबद्दलही नाराज आहेत ते मनसेकडे जावेत अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी युती करायची गरज नाही.

"शिवाय कोणत्याही ठाकरेंच्या इगोसोबत किती फरफटत जायचं हा विचार भाजपा करते आहे. दोन ठाकरेंसोबत त्यांनी अनुभव घेतला आहे. आता ते परत तसं करतील असं वाटत नाही. आणि जरी राज यांनी आता भूमिका बदलली असली तरीही काहीच काळापूर्वी त्यांनी मोदींवर टीका केली होती हे लोकही विसरले नसतील. अजून एक मुद्दा म्हणजे 'शत प्रतिशत भाजपा' असं असणाऱ्या पक्षात या युतीसाठी दिल्लीतून परवानगी मिळेल असं वाटत नाही," असंही नानिवडेकर यांनी म्हटलं.

या आणि अशा अनेक मुद्द्यांवर सध्या भाजपा-मनसेची युती अडथळा शर्यत खेळते आहे. एक चर्चा अशीही आहे की निवडणपूर्व युती न होता दोघांमध्ये अंतर्गत रणनीती ठरुन निवडणुका लढवल्या जातील. वेगवेगळ्या जागांवर ताकदीनुसार एकमेकांना मदत केली जाईल. मग निकालानंतर युती करायची किंवा नाही हे ठरवलं जाईल. त्यामुळे राज यांचं भाषण आणि त्यानंतरचा भेटींचा सिलसिला याचं कवित्व जरी जोरात असलं तरीही ही युती प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक वळणं पार करायची आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)