राज ठाकरेंनी 'यू टर्न' का घेतला? मनसे नेते संदीप देशपांडे सांगतात...

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

'ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी चुकले असं आम्हाला वाटलं त्याठिकाणी आम्ही टीका करायची ताकद ठेवली आणि ज्याठिकाणी ते बरोबर आहेत असं आम्हाला वाटलं त्याठिकाणी कौतुकसुद्धा राज ठाकरेंनी केलं. याला 'यू टर्न' का म्हणायचं? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

शनिवारी शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. हे भाषण चर्चेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (3 एप्रिल) राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर केलेलं भाषण हे भाजप प्रेरित असल्याची टीका एकीकडे विरोधक करत असतानाच नितीन गडकरी- राज ठाकरेंच्या भेटीमुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप एकत्र येणार का ही चर्चाही सुरू झाली.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीचा हा संपादित अंश.

आता गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या सभेत राज ठाकरेंनी मोठा 'यू टर्न' घेतलेला बघायला मिळाला. असं म्हटलं जातंय की, ईडीची नोटीस आली त्यामुळे किंवा राजकीय समीकरणं बदलली त्यामुळे हा 'यू टर्न' घेतलाय. हे नेमकं कशामुळे झालंय?

संदीप देशपांडे : मुळात आपण 'यू टर्न' कशाला म्हणायचं? समोरचा माणूस ज्यापद्धतीने आपल्याबरोबर वागतोय त्या पद्धतीने आपली रिअॅक्शन येणार. जर त्याने चांगलं काम केलं तर चांगलं म्हणणार, जर त्याने वाईट काम केलं तर वाईट म्हणणार. त्यामुळे याला 'यू टर्न' का म्हणायचं?

मुद्दा येतो तो धरसोड वृत्तीचा. म्हणजे 2011 साली राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच कौतुक केलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये मोदी पंतप्रधान झाले. 2015-16 ला त्यांनी म्हटलं की माझी चूक झाली, खूप चुकीच्या माणसाच्या हातात देश गेला आणि मग 2019ला 'लाव रे तो व्हिडिओ' ही कन्सेप्ट समोर आणली. त्याची खूप चर्चा झाली. त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा काँग्रेस, राष्ट्रवादीला झाला. आता जे भाषण झालं त्यात मोदी आणि योगी हे राज ठाकरेंना अचानक जवळचे वाटायला लागले, तर याला 'यू टर्न' म्हणावं का?

संदीप देशपांडे : महाराष्ट्राचं राजकारण बघितलं, पवार साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा प्रश्न कोणी विचारत नाही. 1980च्या आसपास पुलोदचा प्रयोग केला. यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पुलोदची स्थापना केली. त्यानंतर 1990च्या दरम्यान हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाकला. पुन्हा 1999 मध्ये सोनिया गांधींच्या परकीय नागरिकत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा बाहेर पडले आणि राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि निवडणूक संपल्यानंतर त्याच सोनिया गांधींशी हातमिळवणी केली. 2015मध्ये भाजपने न मागता भाजपला पाठिंबा देणारा पक्ष कोण होता? राष्टवादी... 2019मध्ये हीच राष्ट्रवादी २ दिवसांपुरतं का होईना भाजप बरोबर गेली आणि सरकार स्थापन केलं. ते सरकार स्थापन होतं ना होतं तोच चार दिवसांनी तीच राष्ट्रवादी शिवसेनेबरोबर गेली आणि शिवसेनेच्या मांडीवर बसली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. यू टर्न आणि कोलांट्या उड्या म्हणतात ते याला.

आता राहिला आमचा प्रश्न, तर ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी चुकले असं आम्हाला वाटलं त्याठिकाणी आम्ही टीका करायची ताकद ठेवली आणि ज्याठिकाणी ते बरोबर आहेत असं आम्हाला वाटलं त्याठिकाणी कौतुकसुद्धा राज ठाकरेंनी केलं. तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युती करून मतं मागितली आणि त्याच भारतीय पक्षाची साथ सोडलीत आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात तर तुमच्यावर टीका करायची नाही तर काय तुमची आरती ओवाळायची?

आणि ज्या पद्धतीच्या हिंदुत्वाचा विचार राज ठाकरेंनी या सभेत मांडला, हा विचार सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. आणि तो पुढे नेण्याचं काम राज ठाकरे करत आहेत. समजा तो विचार जर शिवसेनेने सोडला असेल, तर मला असं वाटत ती शिवसेनेची बौद्धिक दिवाळखोरी आहे.

जसं राष्ट्रवादी वेगवेगळ्या पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसली तसं मनसे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसणार का?

संदीप देशपांडे : 2006 साली आमचा पक्ष स्थापन झाला शेवटची निवडणूक 2019 साली झाली. आमची कोणत्या पक्षासोबत युती होती का? तुम्हीच सांगा... 2006 ते 2019 पर्यंत मनसेने कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नाही. त्यामुळे आम्ही कोणाबरोबर होतो, नव्हतो हा प्रश्नच उद्भवत नाही. जशी शिवसेना राष्ट्रवादीची 'ढ' टीम म्हणून काम करते, तसं मनसे कोणाची 'बी' टीम म्हणून काम करत नाही. आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी काम करतो. मग यात आमचा एक आमदार जरी निवडून आला तरी आम्हाला फरक नाही पडत. आम्ही कोणाचं लांगूलचालन केलेलं नाही किंवा आम्ही कोलांट्या उड्याही मारलेल्या नाहीत.

सध्यातरी आमचं युतीच काही नाही. ना भाजपकडून आम्हाला तसा काही प्रस्ताव आलाय, ना आम्ही तसा काही प्रस्ताव भाजपला दिलाय.

आदित्य ठाकरे म्हणालेत की मनसे भाजपची 'सी' टीम आहे. आधी मी यांना 'टाईमपास टोळी' म्हणायचो याचाही त्यांनी उल्लेख केलाय

संदीप देशपांडे : मुळात असं आहे की, शिवसेना राष्ट्रवादीची 'ढ' टीम आहे. 'बी' टीम, 'सी' टीम ठीक आहे, 'ढ' टीम म्हणजे ज्यांना वरचा मजला नाहीये. बरं आमची टाईमपास टोळी आहे, तर मग तुमची वीरपन्न टोळी आहे का? जी महानगरपालिकेला लुटायचं काम करते आहे. आता ईडीला हिशोब द्यायचाय महानगरपालिकेमध्ये खालेल्या हजारो कोटींचा हिशोब द्यायचाय.

50 कोटींची घड्याळं घेतली आहेत. दोन कोटी रुपये वाटलेले आहेत. हा सगळं हिशोब विचारणार आहे ईडी. त्यामुळे आमच्यावर बोलण्याआधी आदित्य ठाकरेंनी यावर विचार करावा. त्यांना जास्त फायदा होईल.

राज ठाकरेंच्या भाषणात उत्तरप्रदेशचा उल्लेख आला. तिथे चांगल्या पद्धतीने विकास होतोय, असं म्हटलं. मनसे आता उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर मागे पडणार की त्या मुद्द्यावर मनसे कायम असेल?

संदीप देशपांडे : राज साहेबांचं प्रत्येक भाषण तुम्ही ऐकलं असेल तर किंवा उत्तर भारत पंचायतीमधील राज ठाकरेंचं भाषण तुम्ही ऐकलं असेल तर आपापल्या राज्यांचा विकास झाला पाहिजे अशी मनसेची भूमिका असते. तुमच्या राज्यांचा विकास झाला तिकडे उद्योगधंदे आले, तिकडच्या लोकांना तिकडेच नोकऱ्या मिळाल्या तर कोणी महाराष्ट्रात येणार नाही. हीच गोष्ट ते आजही बोलतात.

जर योगींनी तिथे विकास केला असेल तर लोक इथं येणार नाहीत, हेच त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. याच्याव्यतिरिक्त समजा कुठे विकास नाही झाला आणि त्याचा बोजा जर महाराष्ट्रावर पडत असेल तर आमची भूमिका जी आहे ती आहे. त्याच्यात कुठलाही बदल नाही.

गृहमंत्र्यांनी वक्तव्य केलं आहे की जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. त्यावर तुमचं काय म्हणणं आहे?

संदीप देशपांडे : मुळात हे कारवाई कोणावर करणार? कायदा काय सांगतो? सन्माननीय उच्च न्यायालयाने काय आदेश दिलेत? न्यायालयाचे आदेश आहेत की, कुठेही भोंगा वाजला नाही पाहिजे. त्याच्या आवाजावर मर्यादा पाहिजे. पण या कायद्याचं पालन करण्याची क्षमता या महाविकास आघाडी सरकारमध्ये आहे का? पहिले त्याचं पालन करा, मग आमच्यावर कारवाई करा. आमची इथेच बसलोय कुठे जाणार आहोत.

आज नाशिकमध्येसुद्धा एकेठिकाणी हनुमान चाळीस लावण्यात आली. ज्या पद्धतीने स्पष्टपणे सांगण्यात आलं की, भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावा त्यामुळे अशी धार्मिक तेढ निर्माण होईल असं तुम्हाला वाटत नाही का ?

संदीप देशपांडे : मशिदीवरचे भोंगे उतरले तर तेढ निर्माण व्हायचा प्रश्नच नाही. अडचण काय आहे की सकाळी पहाटे पाचला जेव्हा लोक झोपलेले असतात तेव्हा लोकांना त्रास होतो. कोणी अभ्यास करत असतात, कोणी वयोवृद्ध असतात. या सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होतो आणि तो त्रास होऊ नये असे उच्च न्यायालयाचे आदेश असताना त्या आदेशाची अंमलबजावणी गृहमंत्रालय करणार आहे का, हा प्रश्न आपल्या माध्यमातून आपण त्यांना विचारला पाहिजे.

कारवाईला घाबरण्याचं काही कारण नाही. अशा खूप केसेस आम्ही अंगावर घेतल्यात. मुळात कायद्याची अमलबजावणी करण्याची क्षमता ठाकरे सरकारमध्ये आहे का? आणि हनुमान चाळीस म्हटल्यामुळे जर ठाकरे सरकार जे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे आमच्यावर कारवाई करणार असतील तर त्यांचं स्वागत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)