You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत : 'देशाच्या स्वातंत्र्याचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. देशाच्या स्वातंत्र्याचा नवा लढा सुरू, आम्ही बलिदान द्यायला तयार - संजय राऊत
देशाच्या स्वातंत्र्याचा नवा लढा सुरू आता सुरू झाला असून त्यासाठी बलिदान देण्यासही आम्ही तयार आहोत, असं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बुधवारी (6 एप्रिल) भेट घेतली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विविध मुद्दे माध्यमांसमोर मांडले. याप्रसंगी त्याठिकाणी उपस्थित असलेले संजय राऊत यांनीही आपलं मत व्यक्त केलं.
ते म्हणाले, "देशभावनेशी खेळून भावनिक ब्लॅकमेलिंग करत INS विक्रांतच्या नावावर कोट्यवधी रुपये गोळा करणं हा भयंकर अपराध आहे. INS विक्रांतने अनेक बलिदान पाहिले आहेत.
"INS विक्रांतच्या संदर्भातील घोटाळा जो बोफोर्स, राफेल या घोटाळ्यांपेक्षाही मोठा आहे. प्रश्न पैशाचा नसून राष्ट्र भावनेचा आहे. भाजपचे राज्यातील विरोधी पक्षनेते या घोटाळ्याचं समर्थन करत होते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे," अशा शब्दांत राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
2. मोदी जनतेला 1 रुपया देतात, 10 रुपये खिशातून काढतात - दिग्विजय सिंह
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला 1 रुपया देतात आणि त्यांच्या खिशातून 10 रुपये काढतात, अशी टीका मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे लोकांना चुलीवर स्वयंपाक करण्यास भाग पडलं आहे. ही परिस्थिती श्रीलंकेसारखीच आहे, असा दावा सिंह यांनी केला.
मोदींच्या कार्यकाळात भारतावरील कर्ज प्रचंड वाढलं. पण त्यावर कुणी आक्षेप घेतला तर हिंदू धर्म धोक्यात आहे, अशी भीती पसरवली जाते, देशद्रोही असल्याचे आरोप होतात, असंही सिंह यांनी यावेळी म्हटलं. ही बातमी नवभारत टाईम्सने दिली.
3. CRPC दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर
'गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक, 2022' संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं आहे.
बुधवारी गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडलं होतं. इथंही ते मंजूर करण्यात आलं आहे.
या विधेयकानुसार, गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींचे बायोमेट्रिक ठसे घेण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.
गृहमंत्री अमित शाह यावेळी म्हणाले, "या विधेयकाची गरज आहे, कारण आपल्या देशात निम्म्याहून अधिक गंभीर प्रकरणांमध्ये पुराव्या अभावी गुन्हेगार सुटतात. या कायद्यानंतर पोलिसांना त्यांचा तपास आणि पुरावे अधिक पक्के करण्यास मदत होईल." ही बातमी एबीपी लाईव्हने दिली.
4. दारूच्या दुकानांवर महापुरुष, गड-किल्ल्यांची नावे नको, मुंबई महापालिकेचे आदेश
मद्यविक्री किंवा पुरवठा करणाऱ्या दुकानांना महान व्यक्तींची अथवा गड-किल्ल्यांची नावे देऊ नयेत, असे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत. महापालिकेने नुकतेच यासंदर्भातील नियम जारी केले.
या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित दुकान किंवा आस्थापना मालकांवर महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 अंतर्गत न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
तसंच, दुकानांच्या नामफलकावर प्रथमदर्शनी अर्थात सुरुवातीला मराठी भाषेत देवनागरी लिपीत नाव लिहिणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेत देखील नाव लिहिले जाणार असेल, तर त्या भाषेच्या तुलनेत मराठीतील नाव हे मोठ्या अक्षरातच असले पाहिजे, असा आदेशही महापालिकेने दिला. ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. मुस्लीम बांधवांच्या अंगालाही हात लावू देणार नाही - सुजात आंबेडकर
राज्यातील मुस्लीम बांधवांची जबाबदारी आता आमची आहे. त्यांच्या अंगालाही हात लावू देणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केलं आहे.
मशिदीवरील भोंगे न उतरवल्यास समोर दुप्पट आवाजात स्पीकर लावा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना सुजात आंबेडकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
"अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना हनुमान चालिसा लावा, असं सांगण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला," असा प्रश्न सुजात यांनी राज ठाकरे यांना केला आहे.
तसंच तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीम दंगलीवर उभा करू नका, असंही ते म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)