You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेधा पाटकर - मी त्यांना आव्हान देते म्हणून ते माझी बदनामी करतात
- Author, रॉक्सी गागडेकर छारा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
17 वर्षांपूर्वीच्या एका व्यवहारामुळे नर्मदा नवनिर्माण अभियान NGO वर अंमलबजावणी संचालनालयाचं लक्ष्य आहे. ईडीने मेधा पाटकर यांच्या विरोधात FIR दाखल केलाय.
20 विविध देशांमधून नर्मदा नवनिर्माण अभियान संस्थेच्या खात्यात जवळपास 1.02 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या संस्थेच्या ट्रस्टींपैकी एक आहेत.
द पायोनियरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका बातमीनुसार 20 विविध देशांमधून पाटकर यांच्या संस्थेच्या बँक खात्यात रु. 1,19,25,880 ट्रान्सफर करण्यात आले. या 20 खात्यांमध्ये प्रत्येकी रु. 5,96,294 ट्रान्सफर करण्यात आल्याचं या बातमीत म्हटलंय. याच व्यवहारांची ईडी चौकशी करत असल्याचं समजतंय.
बीबीसी गुजरातीने याबद्दल मेधा पाटकरांशी संवाद साधला. आपण आणि आपला गट सरकारला विविध पातळ्यांवर आव्हान देत असल्याने सरकार आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्या आपली भूमिका सांगताना म्हणाल्या.
बीबीसी गुजरातीशी बोलताना मेधा पाटकरांनी सांगितलं, "मिळालेल्या सगळ्या निधीचा वापर गरजेनुसार करण्यात आलेला आहे. आम्ही निर्वासितांचं पुनर्वसन, आरोग्य आणि रोजगारासारख्या विविध क्षेत्रांमध्ये काम करतो. हे काम सतत सुरू असतं."
ईडीने त्यांच्या तक्रारीत उल्लेख केलेले आर्थिक व्यवहार हे 17 वर्षं जुने असल्याचंही त्यांनी सांगितलं. "आम्ही सगळे अहवाल सादर केले असून ऑडिटही करण्यात आलेलं आहे. नर्मदा नवनिर्माण अभियान NGOचं दरवर्षी नियमितपणे ऑडिट केलं जातं त्यामुळे याविषयी कसली चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही. हे सगळे आरोप खोटे आहेत," मेधा पाटकर म्हणाल्या.
आपण आणि आपल्या संस्थेला शांत करण्यासाठी बदनामीचा हा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
नर्मदा बचाव आंदोलनामध्ये पाटकरांची भूमिका महत्त्वाची आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून वाहणाऱ्या नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या विविध धरणांविरोधातल्या या मोहिमेत आदिवासी, शेतकरी, पर्यावरणवादी आणि मानवहक्क कार्यकर्ते सहभागी आहेत.
नर्मदा बचाव आंदोलन काय आहे?
नर्मदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या विविध धरण प्रकल्पांमुळे हजारोंचं विस्थापन होणार होतं. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या अनेकांच्या आयुष्यावर याचा परिणाम होणार होता. यांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठीच्या या गटाच्या मोहीमेचं नेतृत्त्वं मेधा पाटकर आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांनी केलं.
2011 साली या मोहिमेसाठी बॉलिवुड अभिनेता आमीर खाननेही मेधा पाटकर यांना पाठिंबा दिला होता. निसर्ग जपणं हा या मोहिमेचा एकमेव हेतू होता, असं गुजरातमधले पर्यावरण कार्यकर्ते आणि नर्मदा बचाव आंदोलनात पाटकर यांच्यासोबत असणाऱ्या रोहित प्रजापती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
"या धरणांमुळे समुद्रपातळीत वाढ होईल असा इशारा आपण तेव्हा दिला होता आणि आता तसंच घडलं असून भरूच शहरात जिथे नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळते तिथे समुद्र आत आला आहे," असं प्रजापती सांगतात.
पाटकरांचं गुजरातशी नातं
गुजरातेतल्या नर्मदा खोऱ्यामध्ये आदिवासींसाठी राबवलेल्या मोहिमेमुळे मेधा पाटकर गुजरातमध्ये वादग्रस्त ठरल्याचं अनेकांना वाटतं.
पाटकरांनी उचललेली पावलं सत्तेतल्या भाजपला न आवडणारी असल्याचं सामाजिक कार्यकर्ते सांगतात.
2002 मध्ये मेधा पाटकर इतर सामाजिक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. गुजरातमधल्या गोध्रा दंगलींनंतर त्या स्थानिकांना भेटून त्यांच्याशी बोलत होत्या. हल्ल्याच्या या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)