You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंना दिलीप वळसे पाटलांचं गृहमंत्रिपद पाहिजे का?
- Author, स्नेहल माने
- Role, बीबीसी मराठीसाठी
सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या चौकशा सुरू आहेत. ईडीचं धाडसत्र सुरू आहे आणि अशातच राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. यात चर्चा रंगली आहे ती गृहमंत्रिपदाच्या अदलाबदलीची.
शुक्रवारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी दोन वेळा वर्षा बंगल्यावर पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये तासाभरापासून चर्चा सुरू असतानाच भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक गौप्यस्फोट केला.
शिवसेना गृहमंत्रालयाच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा असताना मुनगंटीवार यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदाची अदलाबदली केली जाऊ शकते, राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक आहे. तशी चर्चा मी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ऐकली, असं म्हटलंय.
त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यातील पहिली बैठक पार पडल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता स्वत: स्पष्ट केलं आहे की, माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. माझे सहकारी उत्तम काम करत आहेत आणि गृहमंत्री देखील उत्तम काम करत आहेत. हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत, या विरोधी पक्षाकडून पसरवल्या जात आहेत त्या निरर्थक आहेत."
पण 31 मार्च रोजी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राने, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाविरोधात मवाळ भूमिका घेत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं वृत्त दिलं होत.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार,'शिवसेना भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना राष्ट्रवादी मात्र मवाळ भूमिका घेत असल्याचं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना सांगितलं आहे. एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीतील सदस्यांना टार्गेट करत असताना राष्ट्रवादी मवाळ भूमिकेत असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी भाजपाला आव्हान देण्याची वेळ आली तेव्हा राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याच्या काही घटनाही सांगितल्या आहेत.'
एका वरिष्ठ शिवसेना नेत्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं, 'फक्त आम्हीच लढा देत आहोत. फक्त शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादीच्या वतीनेही आम्हीच लढत आहोत. शिवसैनिक फ्रंटफूटवर जाऊन लढत असताना राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर दिसत आहे. ज्याप्रमाणे त्यांना भाजपाविरोधात भूमिका घेतली पाहिजे तशी घेताना ते दिसत नाहीत.'
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर इंडियन एक्प्रेसशी बोलताना सांगितलं की "शिवसेनेला भाजपा आणि केंद्रीय यंत्रणांचा सामना करण्यासाठी पोलीस आपल्या बाजूला हवे आहेत आणि तिथेच मुळात हा वाद सुरु आहे. कारण गृहखातं राष्ट्रवादीकडे आहे. आम्ही भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना काही शिवसेना नेत्यांना आमच्याकडे गृहखातं असल्याने अजून आक्रमक भूमिका घ्यावी असं वाटत आहे."
दरम्यान उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांची भेट व्हायच्या आधी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या हस्तक्षेपाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हटलं की, "महाराष्ट्राच्या पोलिसांना व्यवस्थित काही सूचना मिळाल्या आणि मार्गदर्शन मिळालं तरी काम होऊ शकेल. गृह खात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी या विषयावर आपली चर्चा झाली. ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा घुसताहेत महाराष्ट्रात, हे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या गृह खात्यावरचं आक्रमण आहे. महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणा ज्यांच्या आखत्यारित आहे, त्यांनी यावर गांर्भीयाने लक्ष दिलं पाहिजे."
त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि संजय राऊत यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर दिलीप वळसे-पाटील उत्तर गृहमंत्री असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांकडेच गृहखात्याचा इतिहास
आता जरी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं असलं तरी, सत्तेच्या वाट्यात प्रत्येक सत्ताधारी पक्षाला गृह खातं आपल्याकडे असावं असचं वाटतं.
यासाठी 1960 पासूनचा महाराष्ट्राचा इतिहास बघता गृहमंत्रालय हे नेहमीच मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येणार खातं होतं. म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी हा पायंडा पाडला होता. दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी मात्र आपल्या काळात गृहखातं पी. के. सावंत यांच्याकडे दिलं.
पुढे वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आपल्या पहिल्या टर्म मध्ये सत्ता संतुलन राखण्यासाठी गृहमंत्रिपद बाळासाहेब देसाई यांच्याकडे दिलं. पण काही काळाने ते काढून घेतलं आणि स्वतःकडेच गृह खात्याचा कारभार घेतला.
त्यांच्या नंतर शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री असताना ते 1977 साल उजाडेपर्यंत तरी गृहमंत्रालय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितचं यायचं.
पण 17 एप्रिल 1977 ला काँग्रेसचे वसंतदादा पाटील जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी ही प्रथा मोडीत निघाली आणि काँग्रेसच्याच शरद पवारांकडे गृहखात आलं. तेही फक्त एका वर्षाच्या कालावधीसाठी. त्यानंतर रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेसच्या युतीच्या काळात इंदिरा काँग्रेसचे उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे हेच गृहमंत्री झाले.
पण हेच नंतर पुलोदचा प्रयोग करत शरद पवार 1978 मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून ते 1995 मध्ये युतीचं सरकार येईपर्यंत मुख्यमंत्रीच गृहमंत्रालयाचा कारभार बघायचे.
पण 1995 च्या भाजप आणि शिवसेना युती सरकारमध्ये शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे गृहमंत्री झाले. त्यानंतर ही युती आघाडीच्या काळात एका पक्षाचा मुख्यमंत्री तर मित्र पक्षाचा गृहमंत्री अशी प्रथा सुरू झाली. म्हणजे 1999 ते 2003 पर्यंत काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचे छगन भुजबळ गृहखात्याचा कारभार सांभाळत होते.
त्यानंतर 27 डिसेंबर 2003 ते 19 ऑक्टोबर 2004 या कालावधीत सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील गृहमंत्री होते.
तदनंतर 2004 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून सत्तेत आली तेव्हा मुख्यमंत्रिपद विलासराव देशमुख यांच्याकडे तर राष्ट्रवादीच्या आर. आर. पाटलांकडे गृहमंत्रिपद होतं.
पण 26 नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या दोघांनाही आपली पदं सोडावी लागली. 2008 ते 2009 या कालावधीत काँग्रेसचे अशोक चव्हाण मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील गृहमंत्री होते. 2010 ते 2014 या कालावधीत काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे आर. आर. पाटील गृहमंत्री होते. त्यानंतर 2014 मध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेनेचं सरकार सत्तेवर आलं तेव्हा गृहमंत्रालाय हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतच होत.
नंतर 2019 मध्ये महाविकास आघाडी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्ष सत्तेत आले. यात गृहमंत्रालाय राष्ट्रवादीकडे तर मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे आलं.
सत्ता राबवण्यासाठी गृहखातं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. परिमाणी सत्तेत आलेल्या प्रत्येक पक्षाला या खात्यावर त्यांचा वरचष्मा पाहिजे असतो.
सत्तेच्या वाट्यात प्रत्येकाला गृह खातं का पाहिजे असंत?
या प्रश्नाचं उत्तर आम्ही काही राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,
"मुख्यमंत्री जरी तुमच्या पक्षाचा नसला तरी गृह खात्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर वचक ठेऊ शकता. राजकीय भाडणांवेळ त्याचा उपयोग होतो. शरद पवार यांनी स्वतः गृहखातं सांभाळलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्यातील सर्व खाचखळगे माहिती आहेत. त्यामुळे काँग्रेसबरोबरच्या सत्तेत आणि आताच्या सत्तेत पवारांनी गृहखातं त्यांच्या पक्षाकडेच ठेवलं आहे."
दबावतंत्र आणि स्थानिक निवडणुकांमध्ये या खात्याचा उपयोग होत असल्याचं दिसून आलं आहे, असं सूर्यवंशी पुढे सांगतात.
गृहखातं हे एक प्रकारे काटेरी मुकूट असल्याचं सांगत त्याचा योग्य उपयोग झाला तर पक्षाला त्याचा फायदा होतो असं सूर्यवंशी सांगतात. त्यासाठी ते आर. आर. पाटील यांचं उदाहरण देतात. आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांचा फायदा राष्ट्रवादीला निवडणुकांमध्ये झाल्याची आठवण ते करून देतात.
सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना सूर्यवंशी सांगतात,
"जर आता फडणवीस पेन ड्रईव्ह घेऊन येत असतील किंवा वेगवेगळे गोपनीय रिपोर्ट आणत असतील तर तुम्ही आधीच्याच पद्धतीने त्यांच्याशी लढू शकत नाहीत. त्यात तुम्हाला बदल करावाच लागेल. अशातच भाजपला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं शिवसेनेला वाटतं. ज्या पद्धतीने आयकर, ईडी, सीबीआय विभाग कारवाई करत आहे तशी आपण का करू शकत नाही, असा सवाल शिवसेनेच्या लोकांना पडला आहे. त्यातून एक नाराजी तयार झाली आहे."
शिवसेना गृहमंत्रिपदासाठी आग्रही आहे का? या प्रश्नावर लोकमत डिजिटल न्यूजचे संपादक आशिष जाधव बीबीसीशी बोलताना सांगतात,
"दोन मार्चला, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना एक प्रश्न विचारला गेला, मागच्या सरकारच्या प्रकरणाचं काय? तेव्हा अजित पवारांचं उत्तर होत की, मागच्या सरकारमधील घोटाळेबाजांवर कारवाई होईल आणि त्यानंतर छगन भुजबळ यांच्या रामटेक बंगल्यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचं स्नेहभोजन पार पडलं. तिथं आमच्याकडे १६२ आमदार आहेत असं सांगितलं गेलं. या स्नेहभोजनाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मागच्या सरकारमधील प्रकरणांची चौकशी पूर्ण होत आलेली आहे आणि आता तुम्हाला कारवाई दिसेल. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात आपल्याला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असा सूर दिसला."
"त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्या तशा कॅबिनेटच्या बैठकांमध्ये, केरळमध्ये ज्यापद्धतीने ईडीच्या अधिकाऱ्यांना डांबून ठेवलं गेलं, तेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीनी ईडीच्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांना समन्स बजावलं, तशी कारवाई आपल्याकडे व्हावी हा विचार बोलून दाखवला गेला.
"पण सगळ्यात मोठा ट्रिगर पॉईंट ठरला तो म्हणजे, देवेंद्र फडणवीसांना चौकशीसाठी नोटीस बजावली गेली तेव्हा अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, 'फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत. साहजिकच त्यांना सवलत देताना पोलीस त्यांच्या घरी जातील.' ही घटना मुख्यमंत्र्यांना रुचलेला नाहीये. आणि त्यामुळे असं झालं असण्याची शक्यता आहे की, शिवसेनेला जर का कारवायाच करायच्या आहेत तर गृहखातं तुमच्याकडे घ्या. आणि त्यामुळेच शिवसेना गृहमंत्री पदासाठी आग्रही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पण शरद पवारांचं राजकारण बघता राष्ट्रवादी आपलं गृहखातं शिवसेनेला इतक्या सहजासहजी सोडणार नाही, असं आशिष जाधव यांना वाटतं.
"गृहखातं हे पैसे मिळवून देणारं खातं आहे. तसंच हे खातं दुसऱ्या क्रमांकाचं खातं असल्याने याला महत्त्व प्राप्त झालं आहे. म्हणून हे सत्तेतल्या प्रत्येक पक्षाला पाहिजे असतं," असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं.
"सध्या महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्यामध्ये हस्तक्षेप करण्यात येतोय, म्हणून शिवसेनेचा गृहमंत्रिपदासाठी आग्रह असावा," असं ते सांगतात.
ते पुढे म्हणतात, "नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांनी चंद्रकांत बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध केसेस केल्या. आणि आज त्यांना अटक झाली. आता वकिलांवर, राजकीय नेत्यांवर भाजप दडपण आणतयं. हे माफिया सरकार आहे असं सांगून राज्यातील सरकारची विश्वासार्हता नष्ट करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय. ते रोखणं शिवसेनेला महत्त्वाचं वाटत आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)