सलमान खान : हिंदी सिनेमे दक्षिण भारतात का चालत नाहीत?

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

"RRR मधलं रामचरणचं काम मला खूप आवडलं. हे लोक जेव्हा इतकं चांगल काम करतात, तेव्हा मला छान वाटतं. पण एक गोष्ट कळत नाही, त्यांचे चित्रपट आपल्याकडे चालतात, मात्र आपले सिनेमे त्यांच्याकडे का चालत नाहीत?"

अभिनेता सलमान खान याला हा प्रश्न पडला आहे.

IIFA Awards 2022 संबंधीची पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. यावेळी सलमान खानला RRRचं यश, दाक्षिणात्य सिनेमाची वाढती क्रेझ याबद्दल प्रश्न विचारण्यात आलं. ऑस्कर सोहळ्यात अभिनेता विल स्मिथ आणि सूत्रसंचालक ख्रिस रॉक यांच्यात झालेल्या वादाबद्दलही विचारलं.

या सर्व प्रश्नांवर सलमान खाननं काय म्हटलं?

आपले चित्रपट दक्षिण भारतात का चालत नाहीत?

सलमान खान आणि तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी हे लवकरच एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

सलमाननं म्हटलं, "चिरंजीवी सोबत काम करण्याचा माझा अनुभव खूप चांगला होता. आम्ही एकमेकांना खूप काळापासून ओळखतोय. तो माझा चांगला मित्र आहे आणि त्यांचा मुलगाही माझा मित्र आहे.

रामचरणचं RRR मधलं कामही मला खूप आवडलं. हे लोक जेव्हा इतकं चांगल काम करतात, तेव्हा मला छान वाटतं. पण एक गोष्ट कळत नाही, त्यांचे चित्रपट आपल्याकडे चालतात, मात्र आपले सिनेमे त्यांच्याकडे का चालत नाहीत?"

'ते हिरोइझमवर विश्वास ठेवतात, पण आपण...'

दक्षिणेतील सिनेमे आता पॅन इंडिया रिलीज होत आहेत आणि थिएटरमध्ये हिट पण होत आहेत.

या चित्रपटांच्या यशाबद्दल बोलताना सलमान खाननं म्हटलं की, "मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो- साउथ इंडियन इंडस्ट्री हिरोइझमवर विश्वास ठेवतो. जेव्हा आपण थिएटरमधून बाहेर येतो, तेव्हा 'अरे, काय हिरो होता' असं म्हणतोच ना.

आपण (हिंदी चित्रपटसृष्टी) असे हिरो नाही तयार करत. मी आता कुठे हे करतोय. लार्जर दॅन लाइफ हिरो बनविण्याचा प्रयत्न करतोय. पण लोक आता 'कूल' झाले आहेत. त्यांना 'रिअल लाइफ' हिरो हवे आहेत. हिरोसोबत इमोशनल कनेक्ट व्हायला हवा. सलीम-जावेदकडूनच हा फॉर्मेट आला आहे, त्यांनी तो वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलाय."

साउथ इंडियन इंडस्ट्रीनं आपल्या स्क्रीप्ट घ्यायला हव्या

"दक्षिण भारतात माझी फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे आणि मी आता चिरू बाबूंसोबत (चिरंजीवी) काम करतोय. तिकडे वेगळ्याच पद्धतीचे सिनेमे बनतात. तिथले लेखक खूप मेहनत घेतात आणि दिग्दर्शकही खूप चांगला विचार करतात. ते 'कॉन्सेप्ट फिल्म्स' बनवतात.

"माझ्या 'दबंग'वर पवन कल्याणनं चित्रपट बनवला. आता अशी वेळ यायला हवी की, साउथ इंडियन सिनेमानं आपल्या स्क्रिप्ट घेऊन चित्रपट बनवायला हवेत," असं सलमान खाननं म्हटलं.

आपल्याकडे काही लोक कफ परेड आणि अंधेरीदरम्यानच भारत आहे असं समजतात. पण मला वाटतंय तिथून बाहेर पडलं की खरा भारत सुरू होतो. चित्रपटातूनही ते दिसायला हवं.

कमरेखालचा विनोद योग्यच नाही

94व्या ऑस्कर सोहळ्यांत विल स्मिथ आणि सूत्रसंचालक ख्रिस रॉक यांच्या दरम्यान झालेला वाद चर्चेत आहे.

पत्नी जेडा पिंकेट स्मिथवर ख्रिस रॉकनं केलेल्या विनोदावर विल स्मिथ इतका संतापला की, त्यानं स्टेजवर जाऊन ख्रिसच्या कानाखाली वाजवली. या घटनेवर हॉलिवूड काय किंवा बॉलिवूडमधल्या सेलिब्रिटीही व्यक्त होत आहेत.

अभिनेता सलमान खाननं म्हटलं की, एखाद्या शोचं सूत्रसंचालन करताना तुम्ही संवेदनशील असायला हवं. विनोद नेहमी सकस असावा, कमरेखालचा विनोद कधीच योग्य नाही.

बीबीसी हिंदीशी बोलताना सलमाननं म्हटलं की, तुम्ही संवेदनशील असणं आवश्यक आहे. मी 'दस का दम' होस्ट केला आहे, स्टारगिल्ड अवॉर्ड होस्ट केले आहेत आणि बिग बॉसही होस्ट केला आहे.

"बिग बॉसबद्दल सांगायचं झाल्यास मी तेव्हाच बोलतो जेव्हा कोणी कोणाचा अपमान करतो, धमकी देतो. त्याचवेळी मी स्पर्धकांवर नाराजी व्यक्त करतो. जे लोक शो पाहतात आणि ज्यांच्यासोबत शोमध्ये चुकीचं वर्तन होत आहे त्यांच्यासाठी मला हस्तक्षेप करावा लागतो. कधीकधी तर बिग बॉसमध्ये पडद्याच्या मागे इतक्या घडामोडी होतात की, मला प्रतिक्रिया द्यावीच लागते."

'बिग बॉसचा होस्ट आहे, त्यांचा वडील किंवा भाऊ नाही'

सलमान खाननं पुढे म्हटलं, "टीव्हीवर सगळंच दाखवता येत नाही. शिवीगाळ, असभ्य भाषा दाखवता येत नाही. त्यामुळे कधीकधी स्पर्धकांना मी जे बोलतो, ते ओव्हररिअक्ट केल्यासारखं वाटू शकतं. पण असं नाहीये. पण एखादी व्यक्ती अगदीच मर्यादा सोडून वागायला लागते, तेव्हा मी तिला समजावतो... एकदा, दोनदा. पण जर त्या व्यक्तीचं वागणं नाहीच सुधारलं तर मी ते करतो जे करणं आवश्यक आहे.

मी बिग बॉसचा होस्ट आहे, त्यांचा वडील किंवा भाऊ नाहीये. त्यांच्या कुटुंबीयांपैकीही नाहीये. त्यांच्या शाळेचा प्रिन्सिपलही नाहीये. त्यामुळे एका मर्यादेनंतर माझा संयम सुटलाय असं वाटू शकतं. पण मी तेच करतो, जे करायला हवं आणि नंतर पुढच्या एपिसोडमध्ये मी नॉर्मलही होतो. तिथे कोणाशी वैयक्तिक वाईटपणा घ्यायचा नसतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)