नाणारऐवजी बारसूला प्रकल्पाचा प्रस्ताव, राज्य आणि केंद्रांत पर्यायी स्थळाबाबत चर्चा सुरू #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. नाणारऐवजी बारसूचा प्रस्ताव
रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्यामुळे बारगळल्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात 13 हजार एकरवर उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारीमध्येच पत्राद्वारे पाठवल्याचे समजते.
त्यामुळे आता हा प्रकल्प रत्नागिरीतच होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला होता. प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेने नाणार प्रकल्प जाणार, अशी आग्रही भूमिका घेतल्याने निवडणुकीत युतीसाठी भाजपने नाणारचा आग्रह सोडला होता.
लोकांचा विरोध नसेल अशा ठिकाणी प्रकल्प हलवण्याबाबतचे विधान कोकण दौऱ्यावर असलेले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केले. त्यानंतर बारसू-धोपेश्वर परिसरातच हा प्रकल्प उभारावा, अशी मागणी करत स्थानिकांनी आदित्य ठाकरे यांची भेटही घेतली.
नाणारला पर्यायी प्रकल्पस्थळ निश्चितीबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात चर्चा सुरू असून केंद्र सरकार, गुंतवणूकदार तेलकंपन्या आणि राज्य सरकारमध्ये सहमती झाल्यावर त्याबाबत निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळातील उच्चपदस्थांनी दिली.
2. अनिल देशमुख यांच्या कुटुंबावर एकूण 110 धाडी पडल्या- शरद पवार
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत 110 धाडी टाकल्या आहेत. एकाच व्यक्तीविरोधात आणि त्याच्या कुटुंबीयांवर इतक्या धाडी पडण्याचा प्रकार आजपर्यंत तुम्ही बघितला आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी उपस्थित केला. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, facebook
अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांवर ईडीने 50, सीबीआयने 40 आणि प्राप्तीकर खात्याने आतापर्यंत 20 धाडी टाकल्याचा उल्लेखही पवार यांनी केला. तसेच ममता बॅनर्जी यांच्या सल्ल्यानुसार आता विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईविरोधात एकत्र बसून रणनीती ठरवतील, असेही त्यांनी सांगितले. ते मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
3. तुरुंगातील कैद्यांना वैयक्तिक कर्ज
कारागृहातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांनी केलेल्या कामाकरता मिळणाऱ्या बंदीवेतनातून 'दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँके'मधून 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज 7% इतक्या व्याज दराने उपलब्ध करून देण्याची योजना पुण्यातल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर राबवण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
कारागृहातील बंद्यांच्या जीवनमानात सुधारणा आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने गरजेकरता त्यांना कुटुंबीयांसाठी कर्जरूपाने रक्कम उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. देशामध्ये अशाप्रकारच्या खावटी कर्जाची ही नाविन्यपूर्ण योजना म्हणून पहिलीच योजना असणार आहे. 'झी24 तास'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बंद्याची/कैद्याची कर्ज मर्यादा, शिक्षेचा कालावधी, त्यामधून त्याला मिळू शकणारी संभाव्य सूट, वय, वार्षिक कामाचे अंदाजित दिवस, प्रति दिवसाचं किमान उत्पन्न यानुसार प्रस्तुत कर्जसुविधा ठरविली जाईल. अशा प्रकारच्या कर्जाला जामीनदारांची आवश्यकता असणार नाही. सदर कर्ज हे संबंधित बंद्याला विनातारणी व केवळ व्यक्तीगत हमीवर देण्यात येईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या कर्जाच्या रकमेचा उपयोग संबंधित स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी अथवा आपल्या वकीलांची फी देण्यासाठी अथवा इतर कायदेशीर बाबींसाठीच करेल याची दक्षता व जबाबदारी सर्वस्वीपणे कैद्यास कर्ज देण्याऱ्या बँकेची असेल. तसंच बँकेकडून कर्जाच्या परतफेडीमधून वसूल करण्यात येणाऱ्या रकमेच्या 1% इतका वार्षिक निधी कैद्यांच्या 'कल्याण निधी'ला देण्यात येणार आहे.
कारागृहामध्ये अनेक बंदी दीर्घमुदतीची शिक्षा भोगत असतात. यातील बहुसंख्य बंदी हे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती असल्याने अशा बंद्यांना दीर्घकाळ तुरूंगात रहावं लागल्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब हवालदिल होऊन कुटुंबीयांमध्ये औदासिन्य, नैराश्य, अपराधीपणाची जाणीव निर्माण होऊ शकते.
4. तरुणांच्या हाती सूत्रं देणं काँग्रेसला महागात पडलं- सुशीलकुमार शिंदे
'तरुणांना पूर्ण नेतृत्व दिलं गेलं, तिथं आमची गफलत झाली, असं मला वाटतं. मात्र अशी मी पक्षावर थेट टीका करू शकणार नाही. आम्ही 10 वर्षांची सत्ता भोगल्याने आम्ही अॅक्टिव्ह नव्हतो. त्यामुळे संघटना बांधणी झाली नाही. एकट्या राहुल गांधीना दोष देणे शक्य नाही, पक्षात खळखळतं पाणी असलं पाहिजे. लोकांना बदल हवा होता," असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी नवजोतसिंग सिद्धू यांच्यावर ही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "नवज्योतसिंग सिद्धू हा काय राजकीय माणूस नाही, खेळात जसे प्रयत्न केले, तसे प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांसोबत जमवून घेतले नाही.''
सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "सध्या जात, धर्मावर सर्व राजकारण सुरू आहे. हे जास्त काळ चालणार नाही, सगळं बदलेल. लोक भाजपचा तिरस्कार करतील. देशाची आर्थिक स्थिती, उद्योग धंदे कमी होत आहेत. केवळ आकडे फुगवून चालणार नाही. काँग्रेसकडे हे भाजप पेक्षा वेगळं आहेत."
5. कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळणार बक्षीस, राज्य सरकारचं पाऊल
दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बक्षीस मिळणार आहे. मुंबईवर हल्ला झाल्यानंतर 14 वर्षांनी राज्य सरकारने हे पाऊल उचललं आहे.
अजमल कसाबला धाडसाने पकडणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2020 मध्ये घेतला होता. या निर्णयाची आता अंमलबजावणी होणार आहे. 'लोकमत'ने ही बातमी दिली आहे.

26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाबसह इतर नऊ दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. यात आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर अजमल कसाब याला पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिवंत पकडलं होतं.
या घटनेनंतर तब्बल 12 वर्षांनी म्हणजे 2020 साली कसाबला पकडणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व टीमला वन स्टेप प्रमोशन वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
वन स्टेप प्रमोशन वेतन म्हणजे हे पोलीस ज्या पदावर आहेत त्यांना त्यांच्या वरील पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना जेवढा पगार असेल तेवढा पगार मिळणार आहे. राज्य सरकारकडून 15 जणांना हे बक्षीस मिळणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकारी दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








