दिल्लीचे शिल्पकार एडविन ल्युटेन्स आणि 'ल्युटेन्स दिल्ली' याबद्दल जाणून घ्या..

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

चार-पाच वर्षांपूर्वी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मांचा दिल्लीतला बंगला चर्चेत आला होता. या बंगल्याची किंमत 80 कोटींहून अधिक होती.

केवळ किमतीमुळे हा बंगला चर्चेत नव्हता, तर ज्या भागात त्यांनी बंगला खरेदी केला होता, ते चर्चेचं कारण ठरलं होतं. कारण तो भाग होता ल्युटेन्स दिल्ली.

आजूबाजूला मंत्री-खासदारांची निवासस्थानं आणि स्वातंत्र्यांच्या आसपास उद्योगजगतात बडी कुटुंबं असलेल्यांची खासगी निवासस्थानं.

तसंच, या भागात भारताचे राष्ट्रपती नि त्यांचं निवासस्थान राष्ट्रपती भवन आहे, पंतप्रधान नि त्यांचं कार्यालय अर्थात पीएमओ आहे, देशाच्या लोकशाहीचं मंदिर म्हटलं जाणारं ससंद भवन आहे, सर्व मंत्रालयांच्या इमारती, सर्व देशांचे दूतावास यांसह राजकीयदृष्ट्या शक्तिशाली म्हणावं ते सर्व या भागात आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर भारतातले 'व्हूज हू' या भागात राहतात.

आणि या सर्व शक्तिशाली गोष्टी असलेल्या भागाला 'ल्युटेन्स दिल्ली' म्हणतात.

जगातील सर्वांत श्रीमंत जागांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या भागाला ज्याच्या नावानं ओळखलं जातं, तो ल्युटेन्स होता तरी कोण? त्याच्याबद्दलच आपण आज, म्हणजे त्याच्या जन्मदिनाचं निमित्त साधून जाणून घेऊ.

ल्युटेन्स म्हणजे एडविन लँड्सीर ल्युटेन्स. जागतिक कीर्तीचा वास्तूशिल्पतज्ज्ञ. इतका की, जेव्हा जेव्हा या जगात वास्तूशिल्पकल्पेची चर्चा होत राहील, अभ्यास होत राहील, वास्तूशिल्पांच्या इतिहास नि भविष्याचं चिंतन होत राहील, तेव्हा तेव्हा ल्युटेन्सच्या वास्तूशिल्प शैलीचा उल्लेख होत राहील आणि तोही आदरानं.

असा कोण होता, हा ल्युटेन्स? कुठे जन्मला, कुठे शेवटचा श्वास घेतला, कुठली शिल्पं त्यानं त्याच्या सृजनशील कलागुणांनी घडवली? शिल्पांपलीकडे त्याचं काय आयुष्य होतं? आणि तुम्हा-आम्हाला पडलेला प्रश्न म्हणजे, भारताशी त्याचा नेमका संबंध काय?

तर त्याच्याबद्दल माहिती मिळवताना, तीन गोष्टी भारताशी थेट संबंधित सापडल्या.

एक - भारतातील व्हाईसरॉय हाऊस म्हणजे आताचं 'राष्ट्रपती भवन' ल्युटेन्सनं बांधलं.

दोन - भारताचे व्हाईसरॉय राहिलेल्या लॉर्ड लिटन यांची मुलगी एमिली ही त्याची पत्नी.

तीन - ल्युटेन्सची मुलगी मेरी ही तत्वज्ज्ञ जे. कृष्णमूर्तींची चरित्रकार.

अशा एका-एका वाक्यात भारताशी संबंधित तीन गोष्टी सांगितल्या असल्या, तरी ल्युटेन्स त्यापलीकडे होते. वास्तूशिल्पकलेत स्वत:ची शैली निर्माण करणारे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या आयुष्याचा पट पाहिल्यावर, विशेषत: त्यांनी बांधलेल्या वास्तूंची यादी पाहिल्यावर आपल्याला ते अधिक ठळकपणे लक्षात येतं.

चला तर मग त्यांच्या या वास्तूशिल्पांच्या दुनियेत थोडं शिरू. त्यासाठी ल्युटेन्स यांचा जीवनपट आणि कार्यपट समांतरपणे पाहू, खरंतर तसाच तो येईल. कारण त्यांचं कार्य आणि जीवन हे काही वेगळं राहिलं नाही.

एडविन ल्युटेन्स यांचा जन्म 29 मार्च 1869 रोजी जन्म झाला. चार्ल्स आणि मेरी ल्युटेन्स या दाम्पत्याच्या 13 अपत्यांपैकी एडविन दहावे. लंडन हे एडविन ल्युटेन्स यांचं जन्मस्थळ.

नेड हे एडिवनचं घरातलं नाव. लहानपणी संधिवाताच्या तापाचा आजार जडल्यानं एडविन शाळेची पायरी चढू शकले नव्हते. पण ते इतर 12 भावंडांच्या तुलनेत आईशी अधिक जवळ राहिले. मोठ्या भावांकडून त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले.

पण या आजाराकडे एडविन सकारात्मकतेनं पाहायचे. ब्रिटीश लेखक ऑस्बर्ट सिट्वेल यांच्याशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, "माझ्यात जे काही बरे गुण असतील ते आजारामुळेच आहेत. कारण या काळात मी विचार करू शकले. त्यात आजारामुळे खेळण्यासही परवानगी नव्हती. मग पायांनी खेळण्याऐवजी डोळ्यांनी निरीक्षणं करण्यात अधिक वेळ घालवत असे. त्याचा पुढे फायदाच झाला."

नाही असं नाही, त्यांनी शिक्षणाचा थोडाफार प्रयत्न केला. पण तो प्रयत्नच ठरला. कारण 1885 साली त्यांनी केन्सिंग्टन स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. मात्र, तिथं फारसं काही शिकण्यासारखं आहे, असं एडविन ल्युटेन्सना वाटलं नाही. परिणामी त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

मग प्रसिद्ध वास्तुकार सर अर्नेस्ट जॉर्ज यांच्या कार्यालयात काम करू लागले. वास्तुकलेविषयी एडविन ल्युटेन्स यांना इथेच अधिक शिकता आलं. यात कार्यलयात ल्युटेन्स यांची हर्बर्ट बेकर यांच्याशी भेट झाली.

पुढे नवी दिल्ली 'घडवताना' ल्युटेन्स यांच्यासोबत हेच हर्बर्ट बेकर सोबत होते. पण वादानंतर या दोघांची मैत्री संपुष्यात आली. त्यावर थोडक्यात माहिती पुढे घेऊच. पण नवी दिल्लीतल्या प्रसिद्ध वास्तूंमध्ये या बेकर यांचंही ल्युटेन्सइतकंच योगदान आहे, हे इथं नमूद करायला हवं.

ल्युटेन्स यांनी वयाच्या 18 व्या वर्षी उद्यानवास्तुशिल्पज्ज्ञ गर्ट्रड जेकील यांचं खेड्यातील घर बांधलं. स्वतंत्रपणे एखादी वास्तू उभारण्याचं ल्युटेन्स यांचं हे पहिलं काम. इथल्या अनुभवाच्या आधारे आणि जेकील यांच्या मार्गदर्शनामुळे ल्युटेन्स यांच्या वास्तूरचनेच्या शैलीला वेगळं वळण लाभल्याचं मानलं जातं.

'ल्युटेन्स यांची सुरुवातीची वास्तुशैली प्रचलित कलात्मक पद्धतीची होती. पण पुढे जेकील हे उद्यानतज्ज्ञ अभिकल्पक यांच्या साथीने त्यांनी व्यवसाय सुरू केल्यावर त्यांच्या शैलीत परंपरागत पद्धतीचा समावेश झाला,' असं सुनील पोतनीसांनी लोकसत्तामधील आपल्या स्तंभलेखात म्हटलंय.

पुढे याच धर्तीवर त्यांनी काही छोटेखानी टुमदार बंगले बांधले. हे बंगले 'निओ-जॉर्जियन' या ब्रिटिश शैलीत होते.

ल्युटेन्स यांच्या सुरुवातीच्या वास्तुरचनांमध्ये सेंट जूड हॅम्पस्टेड गार्डन सबर्ब, कॅसल ड्रोगो, ब्रिटॉनिक हाऊस टॅव्हीस्टॉक स्क्वेअर लंडन, मेल्स येथील वॉर मेमोरियल, लंडनचे टॉवर हिल मेमोरियल, ट्रिनिटी स्क्वेअर, साऊथ बकिंगहॅमशायरमधील नॅशडॉम, हॅम्प्टन ब्रीज या विशेष नावाजल्या गेलेल्या वास्तूंचा समावेश आहे.

'लोकसत्ता'साठी लिहिलेल्या लेखात सुनीत पोतनीस लिहितात की, 'इग्लंडमधील लिव्हरपूल येथील एका रोमन कॅथलिक कॅथ्रेडलच्या त्यांच्या अभिकल्पिकी कामामुळे एडविन ल्युटेन्सचे नाव साऱ्या युरोपात श्रेष्ठ वास्तुरचनाकार म्हणून प्रसिद्ध झाले. या काळात त्यांची नव्याने स्थापन झालेल्या रॉयल फाइन आर्ट कमिशनचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली.'

पण पुढे ब्रिटिशांनी भारताची नवी राजधानी म्हणून दिल्ली शहराची घोषणा केली. ही घोषणा 1911 साली झाली.

नव्या दिल्लीच्या नगररचनेची जबाबदारी एडविन ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर यांच्याकडे सोपवण्यात आली.

ल्युटेन्स यांनी दिल्लीत बांधलेली सर्वांत प्रसिद्ध इमारत म्हणजे आताचं राष्ट्रपती भवन. तेव्हा या इमारतीचं नाव व्हाईसरॉय हाऊस होतं. ब्रिटीश सत्तेत भारताचा व्हाईसरॉय या इमारतीत राहत असे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींचं हे निवासस्थान झालं.

130 हेक्टरवरील राष्ट्रपती भवनाचं बांधकाम 1929 साली पूर्ण झालं. या इमारतीची पूर्ण वास्तूरचना एडविन ल्युटेन्स यांच्या वास्तूकलेतील सृजनशीलतेचा उत्तम नमुना मानला जातो.

मराठी विश्वकोशात विजय दीक्षितांनी दिलेल्या माहितीनुसार, 'व्हाईसरॉय हाऊस (आताचे राष्ट्रपती भवन) भारतीय वास्तुकला, साहित्य, इतिहास अशा अनेक क्षेत्रांचा अभ्यास केला. त्याचा परिणाम त्या वास्तुरचनेवर दिसून येतो. बौद्ध वास्तुशैलीच्या वैशिष्ट्यांचा आधार घेऊन स्थानिक वास्तुसाहित्याद्वारे ल्युटेन्श यांनी ही अतिशय भारदस्त वास्तुनिर्मिती केली आहे. स्तंभ, घुमट, कमानी इत्यादी अनेक घटकांच्या रचनेतील भारतीयत्व नजरेत भरणारे आहे.'

दिल्लीतल्या बडोदा हाऊस, पटियाला हाऊस, हैदराबाद हाऊस इत्यादी इमारतींचे आराखडेही ल्युटेन्स यांनी तयार केली आहेत.

हर्बर्ट बेकर यांच्यासोबत ल्युटेन्स यांनी 'इंडिया गेट'ची निर्मिती केली. ल्युटेन्स यांनी जगभरात अनेक ठिकाणी पहिल्या महायुद्धातील सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ वॉर मेमोरियल बांधले. त्यातलंच एक भारतात बांधले, ते सध्या इंडिया गेट नावानं प्रसिद्ध आहे.

राष्ट्रपती भवनापासून सुरू झालेला राजपथ, ज्याचं मूळ नाव किंग्जवे होतं, वॉर मेमोरियलपर्यंत म्हणजेच इंडिया गेटपर्यंत बांधण्यात आलं. पहिल्या महायुद्धात मृत्युमुखी पडलेल्या 70 हजार सैनिकांच्या आठणीत हे स्मारक बांधण्यात आलं होतं. 1931 साली या स्मारकाचं उद्घाटन झालं.

तशीच आणखी एक आवर्जून उल्लेख करण्यायोग्य वास्तू म्हणजे भारातचं संसद भवन. आता भारत सरकारकडून सेंट्रल व्हिस्टाच्या नावाखाली नवीन संसद बांधण्यात येत आहे. मात्र, सध्या वर्तुळाकार संसद भवन ल्युटेन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी बांधलं आहे.

आजच्या संसद भवनाचं ब्रिटिश काळात नाव सेंट्रल लजिस्लेटिव्ह असेंब्ली असं होतं.

1912-13 साली या संसद भवनाचा आराखडा तयार करण्यात आला आणि 1921 ते 1927 या काळात बांधकाम पूर्ण करण्यात आला.1927 साली उद्घाटन झालं.

अशोकचक्राप्रमाणे वर्तुळाकार रचना असलेल्या या इमारतीत सेंट्रल हॉल या मध्यवर्ती दालनाशिवाय लोकसभा, राज्यसभा, ग्रंथालय ही दालने आहेत. संसद भवनाला 144 स्तंभ आहेत.

याच भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भारतीय सत्तांतर समारंभ पार पडला होता. म्हणजेच, ब्रिटिशांनी भारतीयांच्या हतात सत्ता सोपवली.

दिल्लीतल्या त्यांच्या कामामुळे ल्युटेन्स यांची प्रसिद्धी जागतिक पातळीवरील वास्तूशिल्पतज्ज्ञ म्हणून झाली.

वास्तूशिल्पकला क्षेत्रातील ल्युटेन्स यांच्या या कामगिरीचं इंग्लंड सरकारसह जगभरात गौरव करण्यात आला. त्यांना 'सर' ही पदवी इंग्लंड सरकारकडून बहाल करण्यात आली.

हे झालं त्यांच्या कलात्मकतेबद्दल. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, 1897 साली एडविन ल्युटेन्स यांनी एमिली यांच्याशी लग्न केलं. एमिली या भारताचे माजी व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांची मुलगी होय.

एडविन आणि एमिली यांना पाच मुलं झाली.

मेरी ही ल्युटेन्स दाम्पत्याची मुलगी पुढे लेखिका बनली. भारतीय वंशाचे तत्वज्ज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचं चरित्र मेरी यांनी लिहिलं. एडविन ल्युटेन्स यांच्या पत्नी एमिली या सुद्धा जे. कृष्णमूर्तींच्या तत्वज्ज्ञाच्या अनुयायी बनल्या होत्या.

आयुष्याच्या अखेरच्या काळात म्हणजे 1938 ते 1944 या दरम्यान ल्युटेन्स यांनी रॉयल अकॅडेमीचं अध्यक्षपद भूषवलं.

आधीच कर्करोगाशी झुंजत असताना, त्यांना न्युमोनियानंही गाठलं. या दोन्ही आजारांशी संघर्ष करत असतानाच, 1 जानेवारी 1944 रोजी एडविन ल्युटेन्स यांनी जन्मभूतीच म्हणजे लंडनमध्येच शेवटचा श्वास घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)