श्रीधर पाटणकरांवर कारवाई : राक्षसी हुकूमशाहीची नांदी, आम्ही लढू स्वातंत्र्यासाठी - संजय राऊत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकरांच्या मालमत्तेवर ईडीनं कारवाई केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून भाजपविरोधात संतप्त प्रतिक्रिया येत आहेत, तर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय.

श्रीधर पाटणकरांवरील कारवाईनंतर कुठल्या नेत्यानं काय म्हटलं, हे आपण पाहूया.

या कारवाईनंतर सर्वात पहिली प्रतिक्रिया आली ती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची. संजय राऊत यांनी या कारवाईला 'हुकूमशाहीची नांदी' असं म्हटलं.

संजय राऊत म्हणाले, "ही कारवाई फक्त राजकीय दबाव, सूडबुद्धी, कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता, सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि आम्ही तुम्हाला झुकवू शकतो, नमवू शकतो केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून हे राजकीय विरोधकांना दाखवण्यासाठीची आहे. अशा प्रकारच्या कारवाया केवळ महाराष्ट्रातच नाहीत, तर जेथे जेथे भाजपची सत्ता नाही अशा प्रत्येक राज्यात कारवायांना उत आलाय."

"निवडणूक हरल्यावर ज्यानं पराभव केला, त्यांच्यावर केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे," असं म्हणत संजय राऊत पुढे म्हणाले, "आजच्या घडीला न्यायालयं सुद्धा दबावात आहे. हुकूमशाहीची ही खतरनाक सुरूवात आहे. चार राज्यात जिंकलात म्हणजे देशाचे मालक बनला नाहीत. आम्हाला तुरुंगात टाकणार असला, तर आम्ही तुरुंगात जायलाही तयार आहोत. आम्ही पुन्हा एकदा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला तयार आहोत."

यावेळी संजय राऊतांना श्रीधर पाटणकरांना विचारलं असता, ते म्हणाले, "श्रीधर माधव पाटणकर हे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यांचं नातं केवळ उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरेंपर्यंत मर्यादित नाहीय, ते आमच्या सर्वांचे नातेवाईक आहेत. ईडीनं केलेल्या कारवाईची माहिती आताच मिळाली."

या राजकीय बदल्याच्या भावनेतून कारवाया होतायेत, याची किंमत कधी ना कधी तुम्हाला द्यावी लागेल, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी भाजपला दिला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "भाजपनं मोदींच्या माध्यमातून खोटी आश्वासनं देशाला दिली होती, त्या आश्वासनांची पूर्तता भाजप करू शकत नाही, दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत, गरिबांच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू शकत नाही, शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देऊ शकत नाही, डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढवू शकत नाही, या सगळ्यामुळे जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर, कुटुंबावर सूडबुद्धीनं कारवाई भाजप करतेय. हे जनतेलाही आता कळतंय."

हे सूडाचं, द्वेषाचं, असूयेचं राजकारण - जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, "सरकार अस्थिर करण्याचा जो प्रयत्न आहे आणि ते अशा माध्यमातून करणं, हे सूडाचं, द्वेषाचं, असूयेचं राजकारण आहे. विरोधीपक्ष म्हणून सरकार अस्थिर करणं हा त्यांचा धर्म आहे, त्यांचं काम आहे. त्यात काही गैर नाही. पण अशा पद्धतीनं करणं चुकीचं आहे, असं माझं म्हणणं आहे."

आव्हाड पुढे म्हणाले, "तुम्ही आम्हाला जेवढे डिवचाल, तेवढे आम्ही जास्त जवळ येऊ. तुम्ही डिवचाल म्हणून आम्ही कोसळून पडू, असं शक्य नसतं. हा जगाचा नियम आहे. तुम्ही मुंगीच्या वारूळाला टिचकी मारून पाहा, पटकन सगळ्या मुंग्या जवळ येतात. त्याच्यामुळे हा सिंड्रोम असतो. आता त्यांची ही मानसिकता असेल की घरात घुसून सरकार पाडू, तर महाराष्ट्राच्या जनतेला हे उघड्या डोळ्यांनी दिसते ना, की काय चाललंय. महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाहीय. त्यांना दिसतंय की, सूडाचं नि आसूयेचं राजकारण सुरू आहे ते. आता पाहुणे जर सगळ्यांच्याच घरी जायला लागले, तर महाविकास आघाडीतर्फे पोहे-चिवड्याची सोय करून ठेवली पाहिजे."

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - नितेश राणे

भाजपचे आमदार नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केलीय.

नितेश राणे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत अशाप्रकारचा छापा पडत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. कारण ईडी जर छापा टाकून संपत्ती जप्त करत असेल, तर सरळ सरळ भ्रष्टाचार आहे आणि ते मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत. मग मुख्यमंत्री कशासाठी थांबले आहेत? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा."

"श्रीधर पाटणकरांपर्यंतच तो पैसा पोहोचलेला नाही. तो भुयारी गटार मातोश्रीपर्यंत जातं. ते उत्तर आता मातोश्रीनं द्यावं. मुखमंत्र्यांचे थेट नातेवाईक आहेत, अजून किती थेट हवं? आता मुख्यमंत्र्यांनी घरात लपून राहण्यापेक्षा उत्तर द्यावं," असंही नितेश राणे म्हणाले.

नितेश राणेंच्या या मागणीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, "नैतिकतेच्या व्याख्या आता शोधाव्या लागतील."

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही ट्वीट करून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, "उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांनी शेल कंपन्यांचा वापर केल्याचा ठपका ठेवत मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीनं त्यांची संपत्ती जप्त केली आहे. घोटालेबाजों को छोडेगा नहीं.."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)