You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हरभजन सिंगची वादग्रस्त कारकीर्द: श्रीसंतला थोबाडीत, मंकीगेट आणि फॉरवर्डेड पोस्टसाठी माफी
अव्वल फिरकीपटू हरभजन सिंग यांना आम आदमी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी देण्याचं निश्चित केली आहे. पंजाबमध्ये बहुमत प्राप्त केल्यानंतर आपने राज्यसभेतही स्थान मिळवलं आहे.
भगवंत सिंग मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या काही तासातच आपच्या सूत्रांनी राज्यसभेत पाठवण्यात येत असलेल्या नावावर चर्चा झाल्याचे सांगितलं.
41 वर्षीय ऑफ-स्पिनर हरभजनची भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना होते. त्याने 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 ट्वेन्टी-2 सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे 417, 269 आणि 25 विकेट्स पटकावल्या आहेत.
2001 मध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत विक्रमी 32 विकेट्स मिळवणं ही हरभजनच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. याच मालिकेत हरभजनने हॅट्रट्रिक घेतली होती. कसोटी क्रिकेटमध्ये भारताततर्फे पहिलीवहिली हॅट्ट्रिक घेण्याचा मान हरभजनच्या नावावर आहे.
1998 मध्ये शारजा येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या हरभजनने मार्च 2016मध्ये संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध भारताकडून अखेरचा सामना खेळला.
महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2007 आयसीसी ट्वेन्टी20 स्पर्धेचं तर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचं जेतेपद पटकावलं होतं. हरभजन या विश्वविजेत्या संघाचा भाग आहे.
आयपीएल स्पर्धेत हरभजन चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून खेळला आहे.
1. श्रीसंतला थोबाडीत
हरभजन आणि वादविवाद यांचं नातं आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान, मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हरभजनने किंग्ज इलेव्हन पंजाबतर्फे खेळणाऱ्या श्रीसंतला श्रीमुखात भडकावल्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं.
या सामन्यापर्यंत हरभजन सिंगच्या नेतृत्वात मुंबईने तीन लढती गमावल्या होत्या. पंजाबकडून खेळणाऱ्या श्रीसंतने हरभजनला बाद झाल्यावर चिडवलं. पंजाबने ती लढत जिंकली. याच रागात हरभजनने श्रीसंतच्या श्रीमुखात भडकावली होती. श्रीसंत रडतानाचा व्हीडिओ समोर आला होता.
पंजाब संघाने यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली. सामनाधिकारी फरुख इंजिनियर यांच्यासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. कलम 4.2 चा भंग केल्याप्रकरणी हरभजन दोषी ठरला. उर्वरित हंगामासाठी हरभजनवर बंदी घालण्यात आली. शिस्तभंगाच्या कारवाईप्रकरणी बंदी घालण्यात आल्याने हरभजनला हंगामासाठीच्या मानधनाला मुकावं लागलं.
2. मंकीगेट प्रकरण
2008 ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अँड्यू सायमंड्सशी झालेला वाद तर मंकीगेट नावाने प्रसिद्ध आहे. सिडनी कसोटीदरम्यान हरभजनने वर्णभेदी टिप्पणी केल्याचा आरोप अँड्यू सायमंड्सने केला होता.
या आरोपानंतर हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. भारताने दौरा अर्धवट सोडण्याची धमकी दिली. यानंतर हरभजनवरील बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला. हरभजनने आपल्याला मंकी म्हटल्याचं सायमंड्सने सांगितलं होतं. या वादात हरभजनविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघ असं चित्र पाहायला मिळालं.
सामनाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत सचिन तेंडुलकरने हरभजनच्या बाजूने साक्ष दिली होती. सचिनने दिलेली साक्ष हरभजनसाठी महत्त्वपूर्ण ठरली. यानंतर हरभजनला निर्दोष सोडण्यात आलं. त्यावेळी नेमकं काय झालं होतं हे हरभजनने नंतर सांगितलं होतं. मला इंग्रजी येत नाही, मी माँ की असं म्हटलं होतं. सायमंड्सला तो उच्चार मंकी असा वाटला असं हरभजन म्हणाला.
3. मोहम्मद आमिरशी ट्विटरवरून पंगा
2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या लढतीनंतर हरभजन सिंग आणि मोहम्मद आमिर यांच्यात ट्वीटरयुद्ध रंगलं. पाकिस्तानने त्या लढतीत भारतावर दणदणीत विजय मिळवला होता.
त्यासंदर्भात ट्वीट करताना आमिरने हरभजनला उद्देशून म्हटलं की, घरातला टीव्ही तर नाही फोडलास ना? असं विचारलं. यावरून संतापलेल्या हरभजनने तिखट शब्दात त्याला प्रत्युत्तर दिलं. हरभजनने आमिरला स्पॉटफिक्सिंग प्रकरणाची आठवण करून दिली.
2010मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यामध्ये जाणून बुजून नो बॉल टाकून स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप मोहम्मद आमिरवर ठेवण्यात आला होता. तो आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर 5 वर्षं क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती.
हरभजनने आमिरला उद्देशून लिहिलं की- "मोहम्मद आमिर आहे कोण? लॉर्ड्समध्ये एवढा मोठा नो बॉल कसा पडला होता? आपल्या सगळ्यांना माहितीये तिथे काय घडलं होतं. त्यानं काय केलं होतं. मी जास्त चिखलात शिरलो तर शिंतोडे माझ्याच अंगावर उडणार आहेत. मी त्याच्यावर बोलावं ही आमिरची लायकीच नाही. मला त्याच्याविषयी जास्त बोलायचं नाहीये. त्यानं जागतिक क्रिकेटवर काळा डाग लावला आहे"
"ज्या व्यक्तीने क्रिकेटला विकलं, देशाला विकलं, आपला इमान विकला, जो हे सगळं विकून लॉर्ड्समध्ये नो बॉल टाकून पैसे कमवायच्या प्रयत्नात होता, त्याच्यासमोर मी काही बोलणं ही माझी चूक होती. त्याची तेवढी पात्रता नाही.
"तू कोण आहेस मध्ये या चर्चेत पडणारा? तू काय आहेस हे तू लॉर्ड्सवर दाखवून दिलं आहेस. फार बोलू नकोस. तू देशाला विकलंस आणि तिथले पत्रकार तुला पाठिंबा देतात. आमच्या आयुष्यापासून दूर होऊन जा."
4. इन्स्टाग्राम पोस्टप्रकरणी माफी
हरभजन सिंगची एक इन्स्टाग्राम पोस्ट वादात सापडली होती. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मारल्या गेलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांचा फोटोवर शहीद लिहून त्यांना श्रद्धांजली देण्यात आली. हरभजनची ही पोस्ट सोशल मीडियावर ट्रेण्ड व्हायला सुरुवात झाली.
हरभजन त्याच्या माफीनाम्यात म्हणाला, 'मी हे स्पष्ट करू इच्छितो, की तो व्हॉट्सअपवर आलेला फॉरवर्डेड मेसेज होता. याची पडताळणी न करता मी सोशल मीडियावर पोस्ट केलं. या पोस्टशी तसंच त्याच्या विचारांशी आणि त्या फोटोमध्ये असलेल्या लोकांबाबत माझी सहमती नाही. मी एक शीख आहे, जो भारतासाठी लढेल देशाविरुद्ध नाही.
देशवासियांच्या भावना दुखावल्याबद्दल मी माफी मागतो. देशविरोधी कृत्य करणाऱ्या कोणत्याही संघटनेचं मी समर्थन करत नाही. मी देशासाठी 20 वर्ष घाम गाळला आहे, भारताविरुद्धच्या कोणत्याही गोष्टीचं मी कधीही समर्थन करणार नाही.
हरभजननं अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टारच्या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ऑपरेशन ब्लू स्टारच्या कारवाईला 37 वर्ष पूर्ण झाली आहेत.
या निमित्तानं हरभजननं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये हरभजननं एक फोटो अपलोड केला होता. हरभजनने दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांना 'शहीद'चा दर्जा दिला होता.
5. पगडी काढण्यावरून वाद
रॉयल स्टॅग या मद्यविक्री कंपनीच्या जाहिरातीत हरभजन सिंग विनापगडी दिसला होता. पगडी उतरवल्याप्रकरणी शीख समाजाने हरभजनवर जोरदार टीका केली होती. मद्यविक्री करणाऱ्या कंपनीच्या जाहिरातीत सहभागी झाल्याप्रकरणीही हरभजनवर प्रचंड टीका झाली होती.
रॉयल स्टॅग कंपनीने शीख समाजाच्या भावना लक्षात घेत ही जाहिरात हटवली. हरभजनने यासंदर्भात माफीही मागितली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)