IPL 2023: पर्पल कॅप ते नेट बॉलर ते पुनरागमन; मोहित शर्माच्या IPL करिअरमधील चढ-उतार

गेल्या वर्षी गुजरात टायटन्स संघाने जेतेपद पटकावलं तेव्हा मोहित शर्मा नेट बॉलर म्हणून त्या संघाचा भाग होता. यंदाच्या हंगामापूर्वी झालेल्या लिलावात गुजरातने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत मोहितने सातत्याने विकेट्स पटकावल्या आहेत.

शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर2च्या लढतीत मोहित शर्माने 5 विकेट्स घेत मुंबईच्या फलंदाजीचा कणाच मोडला. धोकादायक ठरु पाहणाऱ्या सूर्यकुमार यादवला त्रिफळाचीत करत मोहितने सामन्याचं पारडं गुजरातच्या बाजूने फिरवलं. अवघ्या 14 चेंडूत 10 धावांच्या मोबदल्यात मोहितने 5 विकेट्स घेतल्या.

आयपीएल स्पर्धेत परपल कॅप नावावर केलेला मोहित 2015 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होता.

इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा खेळाडूंना पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा सगळं काही मिळवून देतो. परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या अनेक खेळाडूंना आयपीएलने आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं. अनेकांच्या गुणवत्तेला आयपीएलचं व्यासपीठ मिळालं आणि त्यातूनच टीम इंडियाचा दारंही खुली झाली.

पण सगळ्यांच्या बाबतीत हा आलेख उंचावणारा नाहीये. इथे चढ-उतारही बरेच पाहायला मिळतात. मोहित शर्माच्या बाबतीत असं सांगता येऊ शकेल.

गेल्या हंगामात गुजरात टायटन्स संघाने आयपीएल पदार्पण करून विजेतेपद पटकावलं. या संघात गुजरात टायटन्सने मोहित शर्माला नेट बॉलर म्हणून समाविष्ट केलं होतं.

भारतासाठी खेळलेले तसंच आयपीएलमध्येही अनेक संघांचा अविभाज्य भाग असलेले हे दोघं गुजरातचे नेट बॉलर होते. पण तीन वर्षांनी मोहित शर्माला IPL मध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली. या संधीचा चांगला लाभही त्याने मिळवल्याचं दिसून आलं.

मोहालीच्या आय एस बिंद्रा स्टेडियमवर आज (13 एप्रिल) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये सामना खेळवण्यात आला.

या सामन्यात मोहितने पुनरागमन केलं. गुजरातकडून टिच्चून गोलंदाजी करत मोहितने 4 षटकांत केवळ 18 धावा देत 2 बळीही घेतले.

पंजाबचा डाव संपल्यानंतर समालोचकांनी मोहितशी संवादही साधला. त्यावेळी तो म्हणाला, "मला उत्सुकता होती. पण मी काहीसा चिंताग्रस्तही होतो.

दुखापतीतून सावरल्यानंतर मी बऱ्याच काळानंतर खेळत होतो. मी स्पर्धात्मक क्रिकेट पुन्हा खेळतोय की नाही, हे अनेकांना माहीतही नव्हतं. पण प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी मला बोलावलं. मला संघासोबतच राहण्यास त्यांनी सांगितलं. मला वाटलं घरी राहून काय करेन, त्यापेक्षा संघात राहूया. त्यामुळे मी नेट बॉलर होण्याचं स्वीकारलं. नेट बॉलर असण्यात काहीच वाईट नाही. तुम्हाला इथे खूप काही करता येतं. प्रमुख गोलंदाजांप्रमाणेच भूमिका नेट बॉलर्स बजावतात. मी या भूमिकेचाही आनंद घेतला.

फलंदाजांना सराव व्हावा यासाठी संघातील गोलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाज ताफ्यात समाविष्ट केले जातात. त्यांना नेट बॉलर म्हटलं जातं. नेट बॉलर फलंदाजांसमोर गोलंदाजी करतात. या व्यवस्थेमुळे मुख्य गोलंदाज स्वतंत्रपणे सराव करू शकतात.

सर्वसाधारणपणे युवा गोलंदाजांना नेट बॉलर म्हणून घेतलं जातं. त्यांना मोठ्या खेळाडूंच्या बरोबरीने खेळण्याची, शिकण्याची संधी मिळते. दुखापतीमुळे किंवा कोरोनामुळे संघातील मुख्य गोलंदाज खेळू शकणार नसतील तर नेट बॉलर्सना मुख्य संघात समाविष्ट केलं जातं.

मोहित शर्मा कोण आहे?

33वर्षीय मोहित डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हरियाणासाठी खेळतो. 2012-23 रणजी हंगामात मोहितने 7 सामन्यात 37 विकेट्स घेत छाप उमटवली. या कामगिरीची दखल घेत आयपीएल स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सने मोहितला ताफ्यात समाविष्ट केलं. तीन हंगाम मोहित धोनीच्या नेतृत्वात खेळला. धोनीचा विश्वासू साथीदार असल्याने मोहित बहुतांश सामने खेळला. कामगिरीत सातत्य असल्याने मोहित संघाचा अविभाज्य भाग होता.

2014 मध्ये मोहित 'परपल कॅप' पुरस्काराचा मानकरी ठरला होता. हंगामात सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजांला परपल कॅपने सन्मानित करण्यात येतं. त्या हंगामात मोहितने 16 सामन्यात 19.65च्या सरासरीने 23 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर तीन हंगाम मोहित किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला. पण तो लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. 2019 मध्ये पुन्हा चेन्नईने त्याला संघात समाविष्ट केलं. 2020 हंगामाआधी दिल्ली कॅपिटल्स संघाने मोहितला संघात घेतलं.

2021 हंगामामध्ये मोहित कोणत्याही संघाचा भाग नव्हता. 2022 हंगामासाठी झालेल्या लिलावात मोहित शर्माच्या नावाला कोणत्याही संघाने स्वारस्य दाखवलं नाही.

आयपीएल स्पर्धेत मोहितच्या नावावर 92 विकेट्स आहेत.

वेगाच्या बरोबरीने फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारे स्लोअर वन्स टाकण्यासाठी मोहित प्रसिद्ध आहे.

2015 विश्वचषकात मोहित शर्मा भारतीय संघाचा भाग होता. मोहितने 26 वनडे, 4 ट्वेन्टी20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)