You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
MIM : जेव्हा मुस्लीम लीगच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर बनला होता...
1972-73 साली शिवसेनेनं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (रा. सू गवई गट) सोबत मुंबई महापालिका निवडणूक लढवली. मात्र, महापौर करण्यास शिवसेनेला काही जागा कमी पडत होत्या.
यावेळी शिवसेनेनं मुस्लीम लीगचा पाठिंबा घेतला आणि शिवसेना नेते सुधीर जोशी हे मुंबईचे महापौर झाले.
'मुस्लीम लीगच्या पाठिंब्यावरच सुधीर जोशी मुंबईच महापौर बनले होते, असं म्हटल्यास वावगं ठरू नये,' असं बाळ ठाकरे अँड राइज ऑफ शिवसेना पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार वैभव पुरंदरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.
त्यानंतर 1979 साली शिवसेना आणि मुस्लीम लीगचे नेते एकाच व्यासपीठावर दिसले होते.
या दोन्ही पक्षांची जवळकी अगदीच अल्पायुषी ठरली. मात्र, शिवसेनेच्या इतिहासातील महत्वाची घडामोडी म्हणूनच या युतीकडे पाहिलं गेलं. कारण पुढे नव्वदच्या दशकात जेव्हा शिवसेनेनं हिंदुत्वाचं राजकारण करण्यास सुरुवात केली, तेव्हा विरोधकांकडून सेनेच्या मुस्लीम लीगसोबतच्या युतीच्या घटनेची आठवण करून दिली जात असे.
मस्तान तलाव पटांगणातली सेना-मुस्लीम लीगची सभा
या युतीची एक सभा मुंबईच्या नागपाड्यातील मस्तान तलाव पटांगणात झाली होती. हा सर्व परिसर भगव्या आणि हिरव्या झेंड्यांनी बहरला होता.
योगेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या 'शिवसेना : समज-गैरसमज' या पुस्तकात या सभेचा वृत्तांत दिला आहे.
नेबरहूड हॉलपासून मस्तान तलाव पटांगणातील व्यासपीठापर्यंत मुस्लीम तरुणांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वागत केलं होतं. 'शिवसेना जिंदाबाद', 'मुस्लीम लीग जिंदाबाद', 'बाळासाहेब जिंदाबाद' अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमला होता.
मस्तान तलाव पटांगणातील व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुस्लीम लीगचे गुलाम मेहमूद बनातवाला यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसंच, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, ठाण्याचे नगराध्यक्ष सतीश प्रधान, दत्ताजी साळवी, झैदी, जिलानी, साबीर शेख, छनग भुजबळ, दत्ता नलावडे ही नेतेमंडळीही व्यासपीठावर उपस्थित होती.
या व्यासपीठावरून बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं भाषण त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता.
बाळासाहेब भाषणात म्हणाले होते, "यापुढे शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकसाथ लढा उभारतील. आमची ही दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूने किंवा देवाणघेवाणीतून झालेली नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता कुठे निवडणूक नाही की काही नाही. ना आगे ना पिछे! कोणाच्या मतांचा विचार करायचा तर तसंही नाही.
आजच्या या जुलूसमध्ये मी सामील झालो. शिवतीर्थावर शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी सर्व जातीजमातीमधील बांधवांना आवाहन केलं होतं. धर्माच्या नावाखाली कोणीतरी भडकवतो. डोक्यात शांतता ठेवून आणि एक दिलाने काम कर. जातपात विसरून जा."
शिवसेनेच्या काही निवडक भूमिका
1966 सालच्या ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेनं पक्ष स्थापनेनंतर शिवाजी पार्कात पहिली सभा आयोजित केली होती. या सभेला काँग्रेसचे नेते रामराव आदिक उपस्थित होते.
1968 साली शिवसेनेनं पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक लढली. यावेळी सेनेनं मधू दंडवतेंच्या प्रजा समाजवादी पक्षासोबत युती केली होती.
1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीला शिवसेनेनं समर्थन दिलं होतं.
1977 साली शिवसेनेनं काँग्रेसच्या मुरली देवरा यांना मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी पाठिंबा दिला होता.
1980 साली काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंना श्रीवर्धन (रायगड) मतदारसंघात शिवसेनेनं पाठिंबा दिला होता.
काँग्रेसपुरस्कृत प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जींना राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. प्रतिभा पाटील यांना मराठी म्हणून, तर प्रणव मुखर्जी सेनेच्या पाठिंब्यासाठी थेट 'मातोश्री'वर जाऊन बाळासाहेब ठाकरेंना भेटले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)