विकास करवंदे : वयाच्या 80व्या वर्षी देखील ते सिंहगड चढतात, हिमालयात 16 ट्रेक केलेत, आणखी करायची इच्छा आहे

80 वर्षं वय असलेले पुण्याचे विकास करवंदे आठवड्यातून दोन वेळा म्हणजे गुरूवारी आणि रविवारी सिंहगडचा ट्रेक करतात. त्यांचा उत्साह इतका दांडगा आहे की थंडी असो, पावसाळा, कडक हिवाळा असो की उन्हाळा त्यांच्या सिंहगडच्या स्वारीचे दिवस सहसा चुकत नाहीत.
पुण्यातल्याच नाहीतर महाराष्ट्रातील अनेक गिर्यारोहक म्हणजेच ट्रेकर्ससाठी सिंहगड हा आवडीचा ट्रेक असतो.
समुद्रसपाटीपासून 1 हजार 316 मीटर तर पायथ्यापासून 701मीटर उंचीवर असणारा सिंहगड किल्ला इतिहासात कुंधाना, कोंढाणा, बक्षिंदाबक्ष या नावानेही ओळखला जात असे.
शिवाजी महाराजांच्या पायदळाचे सेनापती तानाजी मालुसरे यांनी मुघलांकडून हा किल्ला परत मिळवला, पण तेव्हा झालेल्या तुंबळ युद्धात तानाजी मरण पावले. तानाजी मालुसरेंच्या बलिदानानंतर या किल्ल्याचं नाव सिंहगड झाल्याचं इतिहासकार सांगतात.
असा हा सिंहगड इतिहासप्रेमींसोबतच निसर्गप्रेमी आणि साहसी ट्रेकर्सनाही खुणावतो. सिंहगड चढून विक्रम करणाऱ्या अवलियांची महाराष्ट्रात कमी नाही. दोन वर्षांपूर्वी साहस म्हणून आशिष कसोदेकर हा तरुण सलग 16 वेळा सिंहगड चढून उतरला. त्यासाठी त्याला 32 तास 30 मिनिटं लागले.

पण 80 वर्षांचे विकास करवंदे सव्वा तासात गड चढतात आणि तेवढ्याच वेळात उतरतात. गेली 28 वर्षं ते सिंहगडचा ट्रेक करतात. गेल्या 28 वर्षांमध्ये 1500 वेळा सिंहगड चढल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एकदा तर त्यांनी एकाच दिवसात पाच वेळा सिंहगड सर केला.
टाचेचं दुखणं गायब कसं झालं?
विकास करवंदे यांच्यासाठी हा ट्रेक म्हणजे केवळ साहस नाही तर आनंदासाठीचा प्रवास आहे.
विकास करवंदे 17 वर्षांचे असताना त्यांच्यावर किडनी स्टोनची शस्त्रक्रिया झाली. त्याआधी ते नियमितपणे क्रिकेटची आवड जोपासत होते. पण किडनीच्या शस्त्रक्रियेनंतर इच्छा असूनही कोणत्या स्पोर्ट्समध्ये त्यांना सहभागी होता येत नव्हतं.
अनेकजण त्यांना भिती घालायचे की प्रकृतीला जपण्यासाठी खेळ टाळा. पण त्यांनी खेळाची साथ सोडली नाही. स्विमिंग आणि रनिंग इमाने इतबारे सुरू ठेवलं.
पायाची टाचदुखी सुरू झाली तेव्हा आर्थोपेडिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू झाले. "टाच इतकी दुखायची की घरात लंगडी घालत चालावं लागायचं. टाचेला आराम पडेल असे बूट वर्षभर वापरले, तेव्हा कुठे जरा आराम पडला."

पन्नाशी उलटल्यानंतर सुरू झालेल्या या त्रासावर उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना चालण्याचा सल्ला दिला. त्यानंतर काही मित्रांकडून प्रेरणा घेत त्यांनी ट्रेकिंगची वाट चोखाळली. तेव्हा त्यांचं वय 53 वर्षं होतं.
पुढे आपली युको बँकेतली नोकरी सोडत त्यांनी वयाच्या 59व्या वर्षी म्हणजे एक वर्ष आधी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांची भटकंती वेगाने सुरू झाली. टाचेचाच नाही तर वयानुसार येणाऱ्या गुडघ्यांच्या आजारापासून ते दूर राहू शकले.
"मला गुडघ्यांना ती कॅप वापराव्या लागत नाही. गुडघेही कधीच दुखत नाहीत. गडावरून घरी गेलो की तासाभरात फ्रेश होतो. मग इतकं ताजंतवानं वाटतं की गडावर जाऊन आलोय हे जाणवतही नाही. पाय दुखत नाहीत, इतका मी आता फीट आहे. कोणतंही मलम, लेप वा औषध पायांना लावावं लागत नाही. आहार साधा आणि वेळेवर असल्याने तब्येत उत्तम राहाते."
'मी मुंगीच्या पावलांनी चालतो'
हे आजोबा सिंहगडावर खूप लोकप्रिय आहेत, अनेक तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेतलीये.
"कोणामुळे कोणाला एनर्जी मिळेल सांगता येत नाही. आमचे महाजन सर सांगायचे वय हे फॅक्टर नाही. तुमच्यात जिद्द आणि चिकाटी हवी. त्या जोरावर तुम्ही कुठेही जाऊ शकता. तुमच्या पुढे कोण गडावर गेलं हे पाहू नका की मागे कोण राहिलं त्याच्याकडे बघू नका. स्वतःच्या पायाने चालताय तर मग मुंगीच्या पावलानेही चाललं तरी हरकत नाही. तुम्हाला दमायला होणार नाही कारण तुम्ही सावकाश चालत असता."
म्हणूनच ते गडावर चढताना कधीच थांबत नाही.

"माझ्यासारख्या वयस्कर मंडळींसोबत मी हिमालयातही 16 ट्रेक केले. पाठीवर सॅक घेत दिडशे किलोमीटर पायी चालत पंचकेदार हा ट्रेक मी दोनदा केलाय. कैलास मानसरोवर, सारपाज, महाराष्ट्रातला कळसूबाई आणि सह्याद्रीतले बरेचसे ट्रेक केले आहेत."
कोरोना काळात महाराष्ट्राच्या बाहेरचे ट्रेक बंद करावे लागल्याने त्यांनी शहराजवळच्या सिंहगडावर जाणं सुरूच ठेवलं.
'गुगलमुळे ट्रेकिंग बदललं'
करवंदे भल्या पहाटे 3 वाजता उठून सिंहगडचा पायथा गाठतात. भांडारकर रोडवरून मजल दरमजल करत ते पीएमटीने प्रवास करणं पसंत करतात. कधी-कधी त्यांची पत्नी त्यांच्यासोबत असते.

प्रत्येक ट्रेकविषयी आपल्या डायरीत ते सविस्तर वर्णन लिहून ठेवतात. ते म्हणतात- ही लिहून ठेवलेली माहिती ट्रेकर्स ग्रुपला उपयोगाला यायची. एव्हरेस्ट बेसचा ट्रेक केला तेव्हा त्यावर 26 पानं डायरीत लिहिली. ती माहिती वाचून मित्रांचे पाच ग्रुप एव्हरेस्ट बेसला जाऊन आले. लहानसा पूल, महत्त्वाचं वळण, झोपडी, खडक अशा खाणाखुणा लिहिल्याने वाटेत कुठेही चुकणं शक्य नाही, असं अचून वर्णन लिहिलं होतं.
अनेक वर्षं या खुणा अशाच राहतात. पण गुगलमुळे झालेला ट्रेकींगमधला बदलही त्यांनी स्वीकारलाय.

"गुगल सर्चवर सगळी माहिती मिळते, त्यामुळे ट्रेकर्सना शिजवलेलं अन्न मिळाल्यासारखं आहे. आता जगात कुठेही ट्रेकला जायचं असेल तर एका क्लीकवर मिळतं."
पण त्यांना डोंगरावर येणाऱ्या काही पर्यटकांविषयी काळजीही वाटते. सेल्फी काढत डोंगरावरून तोल जाण्याचे प्रकार घडताना पाहिलं की तरुण मंडळींची त्यांना चिंता वाटते. मोबाईलमुळे होणारं हे नुकसान टाळता येऊ शकतो असं ते म्हणतात.
त्यांच्या या सिंहगड प्रेमाचा सन्मान करत सिंहगड परिवार या ग्रुपने त्यांचा खास सत्कार केला आहे.
हेही पाहिलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









