उत्तर प्रदेशातल्या निकालांमुळे राजकीय वजन कोणाचं वाढलं- मोदींचं की योगींचं?

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तरप्रदेशच्या इतिहासात आज 37 वर्षानंतर भाजप सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आल्याचं दिसतं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चेहरा पुढं करून ही निवडणूक लढवली गेली. मात्र, पंतप्रधान मोदी सुद्धा उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कमी पडले नाहीत.

कोरोनाच्या साथीमध्ये मलिन झालेली प्रतिमा सुधारावी या हेतूने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशचे जवळपास सर्व जिल्हे पालथे घातले. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर तर त्यांनी 200हून अधिक सभा घेतल्या, रॅली काढल्या. तिकडे मोदींनीही 27 सभा घेतल्या.

मुख्यमंत्री असणाऱ्या योगींची 'बुलडोझर बाबा' अशी प्रतिमा उभी करण्यासाठी भाजपने जोर लावला आणि सोबतच दिलेलं मोफत अन्नधान्य आणि खाल्लेल्या मिठाचीही आठवण लोकांना करून दिली.

मागच्या पाच वर्षात सत्तेत असूनही, वाढलेल्या वोट शेअरच्या आधारे भाजप परत सत्तेत येत असेल तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण? अशा चर्चा आता उत्तरप्रदेशात रंगल्या आहेत.

राजकीय वजन मोदींचं वाढलं की योगींचं?

उत्तरप्रदेशच्या या सगळ्या रणधुमाळीत राजकीय वजन मोदींचं वाढलं की योगींचं? म्हणजे या निकालांचं खरं श्रेय मोदींचं की योगींचं ?

यावर वरिष्ठ पत्रकार नीरजा चौधरी एकाच ओळीत सांगतात, "या निकालांमुळे पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'मोदी ब्रँड'ची ताकद कायम ठेवली आहे, तर योगींनी त्यांची ब्रँड इमेज अजून मजबूत केली आहे."

आता यामागची काही कारणं ही नीरजा सांगतात. त्या सांगतात, "मोदींनी शेवटच्या क्षणी एक फिरकी टाकली. ती फिरकी म्हणजे पूर्वांचल. तसं तर मोदी नेहमीच असं काहीतरी गेमचेंजर करतात. मात्र यावेळेस स्टार प्रचारक होते योगी आदित्यनाथ. ते देशातल्या सर्वात मोठ्या राज्याचे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत. मागच्या वेळी योगींना शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आणून बसवलं होत. यावेळी मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली.

योगींचा फॅनबेस हा मोदींपेक्षा वेगळा असा आहे. या निवडणुकीत विजय पक्का केल्याने पुढच्या पंतप्रधान पदासाठी योगींची दावेदारी प्रबळ झाली आहे. 2024 मध्ये कदाचित योगी पंतप्रधान पदाचे उमेदवार नसतील. पण येणाऱ्या काळात ते नक्कीच पंतप्रधान पदाचा चेहरा असू शकतात."

त्यामुळेच या निवडणुकीत मोदींपेक्षा जास्त योगींची विश्वासार्हता पणाला लागली असल्याचं चित्र होत, असं अनेक राजकीय विश्लेषक सांगत होते.

आताच्या निवडणुकीत भाजपने चांगली कामगिरी केली याचं श्रेय योगींना देण्यात आलं आणि हेच त्यांच रिपोर्ट कार्ड होतं ज्यात ते चांगल्या मार्कांनी पास झाले आहेत.

'द हिंदू' या वृत्तपत्राच्या वरिष्ठ पत्रकार निस्तुला हेब्बार यांनी उत्तरप्रदेशच्या विजयाचं श्रेय मोदी आणि योगी या जोडगळीला दिलं आहे.

योगींविषयी त्या म्हणतात, "भाजपच्या आघाडीच्या जोडगळीमध्ये आता तिसऱ्या नेत्याची जागा तयार झाली आहे. एवढ्या मोठ्या राज्यात सलग दुसऱ्यांदा विजय मिळवणे ही मोठी गोष्ट आहे. 2017चा विजय हा मोदींचा विजय होता. पण 2022च्या विजयात योगींचाही सहभाग आहे."

पण आताच्या या विजयात केंद्राने राबवलेल्या ज्या काही योजना होत्या त्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस वाराणसी मध्ये बसून होते. त्यांनी खेळलेली ही खेळी महत्वाचीच होती. मोदी हे उच्चवर्णीय नसून मंडल विरोधकांच्या राजकारणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि फक्त उत्तरप्रदेशचं नाही तर पाच राज्यांच्या निवडणुकीत ही भाजपने जो विजय मिळवला आहे त्याचं श्रेय पंतप्रधान मोदींना जातं."

उत्तरप्रदेशच्या विजयात योगींनी दिलेल्या योगदानाबद्दल निस्तुला सांगतात, "मुख्यमंत्री असताना योगींनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या त्याचा फायदा भाजपला मिळाला हे निकालात स्पष्टपणे दिसून आलंच आहे."

त्यामुळे निकालानंतर भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांची बोलकी प्रतिक्रिया आली. ती म्हणजे, "बुलडोझरसमोर कोणाचं काही चालत नसतं."

भाजपने आपल्या कार्यकाळात गुन्हेगारी कमी झाल्याचा प्रचार एकदम जोरात केला होता.

आता भलेही एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार या गोष्टी खऱ्या नसल्या तरी, समाजवादी पक्ष सत्तेवर असताना जी कायदा आणि सुव्यवस्था बिघडली होती ती योगींच्या राजवटीत सुधारली हे जनतेला पटवून देण्यात भाजपला यश आलं.

आणि इतकंच नाही तर भाजपने 2017 च्या आधी समाजवादी पक्षाच्या काळात राबवलेल्या खराब न्याय व्यवस्थेबाबत लोकांच्या मनात भीती निर्माण केली. आपल्या सभांमध्ये भाजपच्या नेत्यांनी तर ओरडून ओरडून हेच सांगितलं की, लाल टोपीवाले सत्तेत आले तर गुंडगिरी पुन्हा सुरू होईल.

योगी आणि अखिलेश यांच्या कार्यकाळातला फरक काय आहे, हे न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून दाखवून देण्यात भाजप यशस्वी झाल्याचं दिसतंय.

हिंदू-मुसलमान आणि मंदिर अजेंडा

कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलताना 2013ची मुझफ्फरनगर दंगल सर्वांनाच आठवते. 2014 आणि 2017मध्ये झालेल्या दंगलीमुळे जे ध्रुवीकरण झालं त्याचा फायदा भाजपला मिळाला, असे अनेक राजकीय विश्लेषकांच मत आहे. पण 2022च्या निवडणुकीत ध्रुवीकरण हा मुख्य मुद्दाचं नव्हता.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निवडणुकीत नवा फॉर्म्युला आणला, तो म्हणजे, 80:20 चा! या फॉर्म्युलाला अखिलेश यादव यांनी मुस्लिमांच्या विरोधात केलेलं वक्तव्य असा करार दिला. पण भाजपने मात्र नेहमीच सर्वांसाठी, सर्वांचा विकास अशी चर्चा केली.

इथं एक गोष्ट निस्तुला सांगतात ती म्हणजे, "भाजपने सरळ सरळ हिंदू - मुसलमान असा भेदभाव न करता, कोडवर्डच्या रुपात काम केलं."

भाजप जेव्हा सुरक्षेविषयी बोलतं, त्यावेळी लोकांच्या डोळ्यासमोर 'माफिया' 'डॉन' असा मॅसेज गेला. अगदी त्याच पद्धतीने जेव्हा अयोध्या आणि काशीची चर्चा झाली, तेव्हा जनतेला आपोआपच हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा मुद्दा कळला.

तीच गोष्ट नीरजा जर वेगळ्या पद्धतीने मांडतात. त्या सांगतात, "योगी एक खंबीर नेतृत्व म्हणून उदयाला आल्याचं दिसतं. त्यांनी हिंदू रक्षक म्हणून आपली प्रतिमा आणखीच मजबूत केली आहे. हे नेतृत्व मुस्लिमांवर तुटून पडू शकतं. आता योगींनी याविषयी उघडपणे प्रचार केला नाही. मात्र त्यांच्या कृतीतून बऱ्याच गोष्टी लोकांना समजल्या होत्या.

उदाहरण म्हणून घ्यायचं झालंच तर, योगी नेहमी ज्या पोशाखात दिसतात किंवा मग मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाल्यावर योगींनी तिथं दिलेल्या भेटी या सगळ्यांमुळे त्यांची हिंदू म्हणून प्रतिमा आणखी कट्टर झाली."

आणि याचा उलटा परिणाम असा झाला की, अखिलेश यादवांना सुद्धा मंदिरात दर्शनासाठी जावं लागलं.

गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजना

काही तज्ज्ञ सत्ताविरोधी लाटेवरही प्रश्न विचारत आहेत. भाजपच्या पाच वर्षांच्या सत्तेनंतर ही योगींच्या सत्तेविरोधात लाट नव्हती का?याचं उत्तर लपलं आहे फ्री मिळणार रेशन आणि किसन सन्मान निधी योजनांमध्ये!

बरेच राजकीय तज्ज्ञ सांगतात की, या दोन योजना नसत्या तर मात्र सत्ताविरोधी लाटेचा काहीसा परिणाम निकालांवर दिसला असता. अर्थात भाजपला काहीसा 'खो' बसला असता.

यावर निस्तुला सांगतात, "कोविडच्या काळात लोकांना होणारा त्रास मोफत मिळणाऱ्या रेशनिंगमुळे काही प्रमाणात कमी झाला."

नीरजा सांगतात की, "कोविडच्या दुसऱ्या लाटेत लोकांमध्ये भाजपविरोधात राग होता, नाराजी नव्हती. या योजना आणल्यामुळे राग काही प्रमाणात कमी झाला आणि याचं श्रेय मोदी सरकारला जातं."

या योजना योग्यरित्या लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने आणि सोबतच भाजपने मेहनत घेतली. याचा परिणाम उत्तरप्रदेशमध्ये जे विजयाचं निशाण रोवण्यात आलं त्याचं श्रेय मोदी आणि योगी या दोघांनाही जातं.

शेतकरी आणि बिगर ओबीसी नेत्यांच्या बंडाळीवर या दोन्ही जाणकार एका मतावर येतात की, "शेतकर्‍यांची असलेली नाराजी आणि बिगर ओबीसी नेत्यांच बंड यामुळे भाजपचे काही नुकसान झालं. मात्र ते भरून काढण्यासाठी भाजपने आपली संघटना आणि कार्यकर्त्यांसह सरकारी योजनांचा प्रचार केला आणि सरकारी योजना घरोघर पोहोचल्या"

आता भविष्यात हे दोन्ही नेते (मोदी आणि योगी) एकमेकांसोबतचं संतुलन कसं राखतात हे पाहणं रंजक ठरेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)