भारतानं पाकिस्तानात ‘चुकून’ मिसाईल डागल्याबाबत इम्रान खान म्हणतात...

फोटो स्रोत, Getty Images
भारताचं क्षेपणास्त्र 'चुकून' पाकिस्तानच्या हद्दीत पडल्याच्या घटनेवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर भाष्य केलं आहे.
एका सभेत बोलताना इम्रान खान म्हणाले, "पाकिस्तानच्या मनात असतं तर काही करू शकलो असतो, पण आम्ही हे प्रकरण चांगलं हाताळलं."
पंजाब प्रांतातील हाफिजाबादमध्ये एका सभेत बोलताना इमरान खान म्हणाले, "आम्हाला सतत धमक्या येत आहेत. आताच भारताचे एक क्षेपणास्त्रही आलंय, पाकिस्तानने खूप चांगले प्रत्युत्तर दिलं आहे... तरीही आम्ही आणखीही बरंच काही करू शकलो असतो."
इम्रान खान पुढे म्हणाले, "आज मी तुम्हाला सांगतो की आपला देश हा स्वतःचे रक्षण करू शकतो, आपण यावेळी योग्य मार्गावर चालत आहोत."
नेमकं काय घडलं होतं?
भारताकडून पाकिस्तानवर चुकून एक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचं 11 मार्च 2022 रोजी भारत सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं.
नेहमीच्या देखभालीदरम्यान एका "तांत्रिक गडबडीमुळे" हे घडल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. यासाठी "दिलगिरी"सुद्धा व्यक्त करत असताना, सुदैवाने कुणाचा मृत्यू झाला नाही, याचं समाधान भारतानं व्यक्त केलं आहे.
एक "वेगवान उडती वस्तू" मिया चान्नू शहराच्या जवळ कोसळल्याचं पाकिस्तानच्या वतीने सांगण्यात आलं. दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज असल्याने हा संभाव्य धोका मोठा असू शकला असता.

फोटो स्रोत, Getty Images
भारताने शुक्रवारी जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलं, की "9 मार्च 2022 रोजी नेहमीच्या देखभालीदरम्यान एक तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे चुकून एक क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. भारत सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे."
हरियाणामधल्या सिरसामधून हे क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं.
तर पाकिस्तानच्या वतीने यावर प्रतिक्रिया देताना भारताला इशारा देण्यात आला आहे. "अशा हलगर्जीपणासाठी मोठी किंमत चुकवावी लागू शकते," असं सांगताना इस्लामाबादने भारताला तंबीसुद्धा दिली आहे की अशी चूक पुन्हा होऊ नये.
पाकिस्तानच्या वायुदलाने दिलेल्या माहितीनुसार हे मिसाईल माक- 3 म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या तिप्पट वेगाने, 12 हजार मीटर उंचीवर उडालं होतं. पाकिस्तानच्या हवाईहद्दीत तब्बल 124 किलोमीटर प्रवास करून ते कोसळलं, असं सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, AFP
"या मिसाईलच्या मार्गात भारत आणि पाकिस्तान दोन्हीच्या हवाई हद्दीतल्या अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स होत्या. त्यामुळे अनेक जिवांना तसंच साधनसंपत्तीला धोका निर्माण झाला होता," असंही पाकिस्तानचे लष्करी प्रवक्ते मेजर-जनरल बाबर इफ्तिखारो यांनी गुरुवारी सांगितलं. त्यानंतर शुक्रवारी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारताच्या पाकिस्तानमधल्या उच्चायुक्तांना बोलावून घटनेची तक्रार केली. या घटनेच्या चौकशीतून काय समोर येईल, ते आम्हालाही सांगावं, अशी विनंती पाकिस्तानने भारताकडे केली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








