मराठी-युक्रेनी कुटुंब युद्धभूमीतून कसं बाहेर पडलं?

फोटो स्रोत, Tony Carvalho
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"मी माझ्या दोन्ही मुलांसोबत बाहेर खेळत होतो. तेवढ्यात मोठा स्फोट झाला," मूळचे वसईचे असलेले टोनी कर्वालो युक्रेनमधल्या युद्धाचा आपला अनुभव सांगतात.
आपली युक्रेनी पत्नी ओलेना आणि दोन मुलांसह टोनी ओदेसा शहरात राहात होते. पण रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यावर त्यांना घर सोडावं लागलं.
मजल दरमजल करत हे कुटुंब रोमानियापर्यंत कसं पोहोचलं? त्यांना वाटेत काय दिसलं? टोनी आणि ओलेनानं आपले अनुभव बीबीसी मराठीला कथन केले आहेत.
वसईतले टोनी युक्रेनला कसे पोहोचले?
41 वर्षांचे टोनी पेशानं आयटी मॅनेजर आणि एक खलाशी आहेत. ते रॉयल कॅरिबियन कंपनीच्या जहाजांवर काम करतात.
जहाजावरच त्यांची ओळख युक्रेनच्या ओलेना इव्हानविना स्टेफाक यांच्याशी झाली. दोघांनी 2014 साली लग्न केलं. टोनी आणि ओलेना यांना दोन मुलंही आहेत.

फोटो स्रोत, Alamy
हे मराठी-युक्रेनी कुटुंब कधी भारतात, तर कधी युक्रेनमध्ये ओलेना यांच्या परिवारासोबत ओदेसा इथे राहायचे. एप्रिल 2021 पासून कर्वालो कुटुंबीय युक्रेनमध्येच होते.
ओदेसा हे दक्षिण युक्रेनमधलं काळ्या समुद्राच्या काठावरचं हे बंदर आहे. दरवर्षी 1 एप्रिलला इथे ह्युमोरिना या हास्यउत्सवाचं आयोजन होतं. अशा शांत आणि आनंदी शहर म्हणून ओळख असलेल्या शहरात युद्ध होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं.
"सगळ्यांनाच वाटत होतं की दोन्ही राष्ट्राध्यक्ष बोलून तह वगैरे होईल आणि प्रश्न मिटेल. आपल्यावर ते हल्ला करतील असं आम्हाला कुणालाच कधीही वाटलं नव्हतं," ओलेना सांगतात.
"हे दोन्ही देश भावंडांसारखे आहे. रशियन्स कधी हल्ला करतील असं वाटलंही नव्हतं. माझ्यासह अनेकांचे नातेवाईक रशियामध्येही आहेत. कुणी मॉस्कोमध्ये राहतात तर मॉस्कोतले अनेकजण निवृत्तीनंतर इथे राहायला येतात. ते एकीकडे आपण एक देश आहोत असं म्हणतात, आणि असा हल्ला करतात. यावर विश्वास ठेवणंही कठीण वाटतं. " पण 24 फेब्रुवारीच्या सकाळी सगळं चित्र बदललं.
'स्फोटांचे आवाज आले तेव्हा मी हादरून गेलो'
"ओलेनाला रात्रीच वेगवेगळ्या ठिकाणहून नातेवाईकांचे मेसेजेस यायला लागले. टीव्हीवर आम्ही पाहिलं, तेव्हा कळलं की रशियानं युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. "

फोटो स्रोत, Anadolu Agency
तेव्हा ओदेसामध्ये हल्ला वगैरे झाला नव्हता. सकाळी सगळं शांत होतं म्हणून टोनी मुलांसोबत बाहेरही पडले.
"मी माझ्या दोन्ही मुलांसोबत बाहेर खेळत होतो. तेवढ्यात मोठा स्फोट झाला. मी तीन मोठे स्फोट झाल्याचं ऐकलं, आणि सगळेच घाबरा घाबरी चालू झाली. स्फोट एवढा मोठा होता की मी हादरून गेलो," टोनी सांगतात.
पुढचे चोवीस तास सगळीकडून रॉकेट हल्ले आणि स्फोटांच्या बातम्या येऊ लागल्या.
ओलेना सांगतात, "आमच्या घरापासून साधारण पंधरा किलोमीटरवर एक सैनिक तळ आहे आणि जवळच एक मालवाहू जहाजांचं बंदरही आहे. तिथे काही रॉकेट दागली गेली, जी युक्रेनियन सैन्यानं वाटेतच पाडल्याचं आम्हाला कळलं.
"माझी एक नातेवाईक तिकडेच राहते. तिनं एकामागोमाग एक स्फोट ऐकले. सगळीकडेच घबराट पसरली होती. लोक दुकानांत सामान घेण्यासाठी, पैसे काढण्यासाठी धावत होते."
खरं काय, खोटं काय कळत नव्हतं. कुठलीच नेमकी माहिती मिळत नव्हती. पण घरात काही गोष्टींचा साठा करून ठेवावा म्हणून टोनी, ओलेना आणि ओलेनाचे आईवडील बाजारात निघाले.
"आम्ही सगळे बाहेर पडलो, तर सगळीकडे ट्रॅफिक जॅम होता. पेट्रोल पंपवर पाच-सहा किलोमीटर रांगा लागल्या होत्या. एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या," टोनी सांगतात.

फोटो स्रोत, Tony Carvalho
पुढे काय होणार, आपण काय करायला हवं, हे दोघांनाही कळत नव्हतं. घरात थांबलं तरी धोका आहे, बाहेर पडलं तर उघड्यावर अडकून पडण्याचा धोका अशी परिस्थिती होती.
पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला.
'मुलांना सांभाळणं कठीण होतं'
"25 तारखेला सकाळी आम्ही नाश्ता वगैरे केला. बातम्या पाहात होतो, मेसेजेस सुरू होते. परिस्थिती बिघडतेय हे पाहून आम्ही तिथून निघायचं ठरवलं. "
काही भारतीयांनी सोशल मीडियावर ग्रुप केले आणि कुठून कसं जाता येईल याचा सगळे विचार करत होते. टोनी यांनी भारतीय दूतावासाला संपर्क करायचाही प्रयत्न केला, पण त्यांची बातचीत होऊ शकली नाही.
ते सांगतात "भारतातले वीस एक हजार विद्यार्थी तिथे अडकले होते. त्यांचे आईवडीलही फोन लावायचा प्रयत्न करत असणार. त्यामुळे लाईन जॅम झाल्या होत्या."
टोनी, ओलेना, त्यांची दोन मुलं आणि ओलेनाचे आईवडील अखेर गाडीनं रोमानियाच्या सीमेकडे निघाले. सोबत काही खाद्यपदार्थ, कपड्यांच्या बॅगा घेतल्या.
"हायवे पूर्ण जॅम होता. अनेकदा आम्ही मुख्य रस्ता सोडून गावा-गावातल्या आतल्या रस्त्यानं वाट काढत निघालो. एरवी जे अंतर 9 तासांचं, ते कापण्यासाठी 17 तास लागले. पाणी, पेट्रोल काही लागलं तर आम्ही कुठेकुठे शोधत फिरत होतो."

फोटो स्रोत, Tony Carvalho
कुठे चिप्स, बिस्किट्स वगैरे मिळायचं, कुठे काहीच नाही अशी अवस्था होती. अनेक ठिकाणी चेकपॉईंट्स होते आणि तिथून एका वेळी एकाच गाडीला पुढे जाऊ दिलं जायचं.
दोन लहान मुलांसोबत प्रवास करणं अजिबात सोपं नव्हता. टोनी सांगतात, "माझा मोठा मुलगा साडेपाच वर्षांचा तर धाकटा अडीच वर्षांचा आहे. त्यांना काहीच कळत नव्हतं, लहान आहेत ना ते."
ओलेना सांगतात, "मुलांना काय सुरू आहे हे कळत नाही. ते सतत प्रश्न विचारत होते, आपण कुठे चाललो आहोत, आपण तिथे का चाललो आहोत? माझा लहान मुलगा तर सतत रडत होता. कारण तो थकून गेला होता. "
आपल्याच नाही, तर सर्वच मुलांची हीच अवस्था झाली आहे, असं ओलेना यांना दिसलं. "तिथे अनेक महिला आणि लहान मुलं होती. त्यातली बहुतेक सर्वच लहान मुलं रडत होती. हे सगळं खूप कठीण होतं. आम्ही कसंबसं बाहेर पडलो."
युक्रेनच्या सरकारनं फक्त महिला, मुलं आणि वृद्धांनाच जाण्याची परवानगी दिली आहे. कारण युक्रेनी तरुणांना सैन्यात भरती व्हावं लागू शकतं. ओलेनाच्या आईवडिलांनीही मागे परतण्याचा निर्णय घेतला होता.
"ओलेनाच्या आईवडिलांनी सांगितलं, आम्ही नाही येणार. आमचा देश इथेच आहे. माझंही हे सेकंड होम आहे, मलाही त्यांना सोडताना वाईट वाटत होतं, " टोनी सांगतात.
सीमेवर पोहोचल्यावर गाडी सोडून त्यांना चालत पुढे जावं लागलं. जवळपास तीन तास चालल्यावर ते रोमानियाच्या सीमेवर पोहोचले. तिथूनही पायपीट संपली नव्हती. पण आता सुटका झाल्याची भावना धीर देत होती.
'आम्ही बाहेर पडलो, पण बाकीच्यांचं काय?'
"रोमानियात दाखल होताच तिथल्या सरकारनं आम्हाला खूप मदत केली. आम्हाला ते खायला प्यायला देत होते. इतकं, की आम्हाला त्यांना सांगावं लागलं. बास, आम्ही आणखी नाही घेऊन जाऊ शकत. आमच्यासोबत मुलं आणि सामान होतं ते पाहून कुणी सामान उचलालयला मदत करायला आले," टोनी सांगतात.

फोटो स्रोत, Reuters
रोमानियात ते ओलेना यांच्या एका नातेवाईकांकडे राहिले. तिथून मुंबईला येणार आहेत.
टोनी आपल्या भावना व्यक्त करतात. "आम्ही रोमानियात पोहोचलो, तर थोडा आनंद झाला की आपण बाहेर पडलो. पण जे भारतीय अजूनही अडकले आहेत त्यांची हालत खूप खराब आहे, ते खूप घाबरले आहेत. "
"आम्ही प्रवास करत होतो तेव्हा एवढ्या अडचणी आल्या. युक्रेनी लोकांसाठीही हे इतकं कठीण असेल, तर भारतीय विद्यार्थ्यांसाठी ते आणकी कठीण आहे. कारण भाषेची मोठी अडचण आहे. कुणाला इथे इंग्लिश फारसं समजत नाही, आणि अनेक भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनी कळत नाही."
रात्र वाढली, की अडचणीही वाढतात. टोनी यांना हेच दिसून आलं.
"युक्रेनमध्ये थंडीही खूप आहे. आपल्याला ती हवा एवढी जमत नाही. जॅकेट वगैरे असलं तरी थंडी सहन होत नाही. काही तर इतक्या धावपळीत निघाले होते, की त्यांना काही गरम कपडे वगैरेही फारसे सोबत घेता आलेले नाहीत."
अडकलेल्या अशा भारतीयांना आपले अनुभव सांगून धीर द्यायचा टोनी आणि ओलेना प्रयत्न करतायत.
"युक्रेनी लोकांना ओलेनाचे आईवडील आमच्यासोबत होते, त्यामुळे आम्ही गाडीनं जाऊ शकलो. पण भारतीय विद्यार्थ्यांसाठी हे शक्य नाही."
"भारतीय दूतावासाला माझी विनंती आहे की एकतर तुम्ही बसेसची सोय करा किंवा युक्रेनी सरकारशी बोलून भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करावी."
कुटुंबियांविषयीची चिंता ओलेना यांच्या बोलण्यात डोकावते. "माझे वडील त्यांचं काम सोडून जाऊ शकत नाहीत. माझ्या भावाला कदाचित लढण्यासाठी जावं लागू शकतं. हे सगळं भीतीदायक आहे."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









