प्रवीण चव्हाण कोण आहेत? ज्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी 'पेन ड्राइव्ह बॉम्ब'मधून आरोप केलेत

"महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांचा सूड उगविण्याचं षडयंत्र रचत आहेत. साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे मॅनेज केलं जातंय," असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.

फडणवीस इथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढं म्हटलं, "हा महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना आहे आणि सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक हा खेळ खेळत आहेत."

हा आरोप करताना त्यांनी 125 तासांच्या स्टिंग ऑपरेशनचे फुटेज विधानसभेत जमा केलं आहे. सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून फडणवीस यानी सादर केला. भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात खोटं कुभांड रचून एकूण 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा त्यात असल्याचा दावा, फडणवीस यांनी केला आहे.

"पडद्याआडून कोण कोण मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून पुरतं स्पष्ट होतं आहे. या प्रकरणातील संपूर्ण एफआयआर या वकिलांनीच तयार करून दिला असून, रेडच्या वेळी संपूर्ण बारकाईने नियोजन त्यांनीच केलं आहे. ड्रग्जच्या व्यापाराचा उल्लेख करून मोक्का लावायला कसा सांगितलं, त्यातून शासन पातळीवर कशा बैठका झाल्या, त्यात मुख्यमंत्र्यांपासून ते पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक कसे उपस्थित होते, याचा संपूर्ण उलगडा या वकिलांनी केला आहे. प्रकरण निगेटिव्ह असताना ते आपण कसे पॉझिटिव्ह केले, याची संपूर्ण कथा ते यातून सांगताना दिसत आहेत," असं भाजपनं आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

या स्टिंग ऑपरेशमध्ये माजी आमदार अनिल गोटे आणि सरकारी वकील प्रवीण चव्हाण एकमेकांशी चर्चा करत असल्याचं दिसत आहे.

फडणवीसांच्या या आरोपांनंतर प्रवीण चव्हाण हे नाव चर्चेत आलं. कोण आहेत हे प्रवीण चव्हाण असा प्रश्न विचारला जाऊ लागला.

या आरोपांनंतर प्रवीण चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं, "सरकार माझं नाहीये. मी सरकारमध्ये कधीही नाहीये. माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा राजकारणी किंवा त्यांच्या जवळचा नाहीये. राजकारणामध्येसुद्धा नाहीये. माझ्या पूर्ण कालावधीत साधा ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा आमदार-खासदार या कोणत्याही निवडणुकांमध्ये मी नाहीये. त्यामुळे सरकारशी माझा संबंध असण्याचा माझा प्रश्नच येत नाही", असं प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं.

चव्हाण म्हणाले, "हे सर्व टेम्परिंग आहे किंवा जो काही आवाज वगैरे आहे ते आज नाही तर उद्या बाहेर येणारच आहे ना. मी अजून व्हीडिओ पाहिलेला नाही. मी त्यातील ऑडिओ अद्याप ऐकलेले नाहीत. सीबीआयची चौकशी किंवा कोणती चौकशी करायची हे मी ठरवत नाही. चौकशी कोणती करायची हे सरकार ठरवणार."

या प्रकरणात काहीच तथ्य नाही. या प्रकरणात चौकशी झाली तरी माझी काही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली आहे.

"या प्रकरणात आवाज कुणाचा आहे हे चेक करावं लागले, हे मॅन्युप्युलेटेड व्हीडिओ आहेत. वकिल असल्यामुळे लोक माझ्या ऑफिसला येत असतात. अनील गोटेंची एक केस पुण्यात सुरू आहे. त्यासाठी त्यांना सल्ला हवा होता. पण माझ्याकडे वेळ नसल्याचं मी त्यांना सांगितलं," असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.

कोण आहेत प्रवीण चव्हाण?

प्रवीण पंडित चव्हाण हे विशेष सरकारी वकील आहेत. सुरेशदादा जैन, रमेश कदम, डीएसके, महेश मोतेवार, बीएचआर बँक, रवींद्र बराटे यांच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन प्रकरणातही त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे.

जळगावची नूतन मराठा विद्या प्रसारक संस्थेपासून या वादाला सुरुवात झाली. साधारण चार वर्षांपूर्वी या संस्थेत सत्ता मिळवण्यासाठी दोन गटांमध्ये स्पर्धा सुरू होती. पहिला नरेंद्र पाटील गट आणि दुसरा भोईटे गट.

ही संस्था हडप करण्यासाठी गिरीश महाजन यांनी भोईटे गटाला साथ दिली आणि बनावट पद्धतीने संस्था बळकावली असा पाटील गटाचा आरोप आहे.

नरेंद्र पाटील यांचे लहान भाऊ अॅड.विजय पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. आपलं अपहरण आणि मारहाण झाल्याचा त्यांचा आरोप आहे. तसंच चाकूचा धाक दाखवून संस्थेतून राजीनामा द्यायला सांगितलं असाही त्यांचा आरोप आहे.

या प्रकरणी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक आणि इतर 29 लोकांवर जळगावमधील निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा 5 जानेवारी 2021 रोजी कोथरुड पोलिस स्टेशनमध्ये हस्तांतरित करण्यात आला.

याव्यतिरिक्त नगरपालिकेतील काही बांधकामांच्या आर्थिक घोटाळ्याच्या तक्रारी सुद्धा आहेत.

अॅड.विजय पाटील यांनी या तक्रारी केल्या तेव्हा भाजप सरकार होतं. त्यामुळे त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही असं म्हटलं जातं. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पाटील पुन्हा कोर्टात गेले आणि कोर्टाने गुन्हा दाखल करण्यास सांगितला.

याच प्रकरणात प्रवीण चव्हाण हे सरकारी वकील म्हणून काम पाहात होते.

सादर केलेल्या व्हीडिओमध्ये प्रवीण पंडित चव्हाण हे चाकू प्लांट करण्यापासून ड्रग्जचा धंदा कसा करायचा, रेड कशी टाकायची, रेडमध्ये वस्तू कशा प्लँट करायच्या आणि कसेही करून ही केस मोक्कामध्ये कशी फिट बसवायची याचं नियोजन करत असल्याचं फडणवीसांनी त्यांच्या आरोपात म्हटलं होतं.

रवींद्र बऱ्हाटे प्रकरणातही सरकारी वकील

माजी खासदार ईश्वरलाल जैन तसेच मनीष जैन यांच्याविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याने दाखल केलेल्या केसमध्ये प्रवीण चव्हाण हे सरकारी वकील आहेत. त्याचबरोबर आता बऱ्हाटे यांच्याविरोधात दाखल असलेल्या पुण्यातील केसमध्ये देखील चव्हाण हेच सरकारी वकील आहेत.

रवींद्र बऱ्हाटे हे नेमके कोण आहेत? त्यांच्यावरील आरोप काय आहेत? हे प्रकरण काय आहे?- याबद्दल सविस्तर बातमी तुम्ही इथे वाचू शकता-

"पुण्यात 35 सरकारी वकील आहेत. पूर्णवेळ सरकारी वकील असताना या सर्व महत्त्वाच्या केसेस चव्हाण यांच्याकडे देण्यात आल्या. चव्हाण यांचा पगार देखील लाखांच्या घरात आहे. डीएसके यांच्या केसमध्ये अनेक ठेवीदारांनी विशेष कोर्टात अर्ज दाखल केला आहे. त्यात त्यांनी चव्हाण यांना बदलण्याची विनंती केली होती. ठेवीदारांच्या आरोप होता की, चव्हाण हे डीएसके केसच्या खटल्यासाठी हजर राहत नाहीत. त्यामुळे केस पुढे ढकलली जाते," अशी माहिती अनेक वर्षं कोर्ट बीट सांभाळणाऱ्या पुणे मिररच्या पत्रकार अर्चना मोरे यांनी दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)