You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेती : 'शेतकऱ्याच्या पोटी पुन्हा जन्माला येणार नाही,' 23 वर्षीय शेतकऱ्यानं व्हीडिओ बनवून संपवलं आयुष्य
पंढरपूरमधील तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. 23 वर्षीय सुरज जाधव या शेतकऱ्यानं विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
सुरज जाधव यांनी आत्महत्येपूर्वी व्हीडिओ बनवला आणि आपली हतबलता त्यातून व्यक्त केली. हा व्हीडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
सुरज जाधव पंढरपूरमधील मगरवाडी येथील राहणारे होते.
आत्महत्यापूर्वी बनवलेल्या व्हीडिओतून ते म्हणाले की, "शेतकऱ्याच्या पोटी पुन्हा जन्माला येणार नाही. शेतकऱ्याचा सरकार विचार करत नाही. जोपर्यंत सरकार आहे, तोपर्यंत शेतकरी नाही."
वीज तोडणी आणि महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून सुरज जाधवांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे.
सुरज जाधव कोण होते?
सुरज जाधव हे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी होते. पंढरपूरमधील मगरवाडी हे त्यांचं गाव.
एबीपी माझानं दिलेल्या माहितीनुसार, सुरज जाधव हे सुशिक्षित शेतकरी होते. जमिनीच्या लहानशा तुकड्यात ते राबायचे. शेतमालाला भाव मिळत नसल्यानं काही दिवसांपूर्वी त्यांनी कलिंगडे वाटून टाकली होती.
शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी जनावरे वाढवण्यास सुरुवात केली होती. त्यातून रोज 200 लिटर दुधाचं संकलन करून ते विकत असत. मात्र दुधाचे भावही पडल्यानं तोटा सहन करावा लागला.
सुरज जाधव यांच्यावर 20 लाखांचं कर्ज झाल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी एबीपी माझाला सांगितलं.
सुरज जाधव यांनी विष प्राशन केल्याची घटना 2 मार्च 2022 रोजी घडली. त्यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांचं निधन झालं.
या आत्महत्येच्या घटनेनंतर राजकीय क्षेत्रातून राज्य सरकारवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
'सरकारला लाज वाटायला पाहिजे, अजून किती बळी घेणार?'
"सरकारला लाज वाटायला पाहिजे. अजून किती बळी घेणार?" असा प्रश्न विचारत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर म्हणाले, "सुरज जाधवच्या आत्महत्येची घटना अतिशय क्लेषदायक आहे. इथे अधिवेशनात क्षुल्लक गोष्टींवरुन गदारोळ करणाऱ्या आमदारांना, मंत्र्यांना इथे शेतकऱ्यांची मुलं मरत आहेत, त्याचे देणेघेणे नाही, लाज वाटत नाही."
रविकांत तुपकर पुढे म्हणाले, "मी पुन्हा शेतकऱ्यापोटी जन्माला येणार नाही, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असे म्हणत या मुलाने आत्महत्या केली. ही बाब सर्व समाजघटकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. आणखी किती शेतकऱ्यांच्या मुलांचे बळी हे सरकार घेणार आहे? राज्याच्या उर्जामंत्र्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे."
"शेतकऱ्यांच्या मुलांनो, आत्महत्या हा पर्याय नाही. आपल्यावर ही वेळ आणणाऱ्यांच्या गचांड्या धरून त्यांना रस्त्यावर आणू, संघर्ष करू, मात्र आत्महत्येचा मार्ग धरू नका. स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे," असं आवाहनही रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांना केलंय.
महाराष्ट्र सरकारला लकवा मारलाय का? - राजू शेट्टी
माजी खासदार राजू शेट्टींनी वीज बिलाच्या मुद्द्यावरूनच राज्य सरकारला धारेवर धरलंय.
"तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना 24 तास मोफत देतं, कर्नाटक सरकार दिवसा सात दिवस वीज देतं, राजस्थान सरकार शेतकऱ्यांना दिवसा वीज देतं. मग कृषिप्रधान महाराष्ट्र सरकारला काय लकवा मारलाय का?" असा संतप्त सवाल राजू शेट्टींनी ट्विटरवरून विचारला आहे.
सुरज जाधवच्या बलिदानातून शेतकऱ्यांची भावना समोर - फडणवीस
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सुरज जाधव यांच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले, "सुरज जाधवांच्या बलिदानातून कोट्यवधी शेतकऱ्यांची भावना समोर आलीय. या सरकारनं संवेदना दाखवून वीज कनेक्शन कापणं बंद करावं, अशी मागणी आम्ही केली. मात्र, महाराष्ट्र सरकार कोडगं आहे."
"हे सरकार मुंबईच्या बिल्डरांना कोट्यवधींची सूट देऊ शकतं, हे दारूविक्री करणाऱ्यांना सूट देऊ शकतं, बेवड्यांकरता धोरण करू शकतं, पण शेतकऱ्यांनी वीज कनेक्शन कापू नका अशी विनंती केली, तरी कनेक्शन कापणं सुरू आहे," असं फडणवीस म्हणाले.
"वीज कनेक्शन कापणार नसल्याचं आश्वासन सरकार देतं. मात्र, उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत नाही. कारण ऊर्जामंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. पवित्र सभागृहाचा अपमान करत वीज कनेक्शन कापणं सुरू आहे, असंही फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांनो टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहनही फडणवीसांनी यावेळी केली.
राज्य सरकारने कृषीपंपांच्या वीज तोडण्याचे आदेश तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या समस्येवर स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा व्हावी, असा आग्रह फडणवीस यांनी लावून धरला होता. अखेर उर्जामंत्री नितीन राऊत संध्याकाळपर्यंत यावर स्पष्टीकरण देतील, अशी हमी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेतली.
दरम्यान, शेतकऱ्यांना पुढील 3 वर्षांत टप्प्याटप्प्यानं दिवसा सलग 8 तास वीज पुरवठा करण्याचं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)