बनारसी साडीचा इतिहास आणि नकली चिनी बनारसी साड्यांचं अतिक्रमण

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी, वाराणसीहून
बनारस, वाराणसी, काशी... कोणत्याही नावाने हाक मारा हे शहर चालता बोलता जिवंत इतिहास आहे.
इथली माणसं जेव्हा 'यहा हर कंकर, शंकर' चा जयघोष करत असतात त्याचवेळी इथल्या अनोख्या 'तानाबाना' संस्कृतीचा दाखलाही देत असतात.
उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी फिरताना आम्ही वाराणसी शहर पालथं घातलं. जसं इथल्या मराठी लोकांच्या गल्लीबोळांमध्ये फिरलो तसंच बनारसी साड्या बनवणाऱ्या मुस्लीम कारागिरांच्या मोहल्ल्यातूनही भटकलो.
इथेच आम्हाला भेटले मकबूल हसन. त्यांचा पिढीजात बनारसी साड्या विणण्याचा व्यवसाय आहे.
मकबूल यांना आपल्या बनारसी साड्यांमधल्या कलेसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यांनीच आम्हाला बनारसी साड्यांच्या हजारो वर्षं जुन्या इतिहासाबद्दल सांगितलं.
बनारसी साडीचा इतिहास
बनारसमधल्या सिल्कचा इतिहास 2500 वर्षांचा आहे.
"गौतम बुद्धांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा त्यांना बनारसमध्ये बनलेल्या सिल्कच्या कापडातच गुंडाळून ठेवलं होतं. याचा लिखित पुरावा आहे. बौद्धधर्मियांच्या इतिहासात याचा उल्लेख आहे. यावरून हे सिद्ध होतं की बनारसमध्ये गेल्या अडीच हजार वर्षांपासून कापड व्यवसाय आहे," हसन म्हणतात.

त्याकाळी बनारसी साड्या बनायच्या त्याला पदर किंवा काठ नसायचे. रेशमी कापड बनायचं. त्याला पोत म्हणायचे. त्यावर वेगवेगळ्या प्राण्यांची नक्क्षी असायची.
"त्यात कधी मोर, कधी पोपट-मैना तर कधी वाघ-सिंह पण असायचे. या साड्यांवर बुट्टे नसायचे आणि ज्या नक्क्षी असायच्या त्या एका ओळीत किंवा प्रमाणात नसायच्या," हसन सांगतात.
त्याकाळी भारतात बिनाब्लाऊजची साडी नेसायची पद्धत होती आणि त्याला निखंड साडी म्हणतात.
बिहारच्या सुप्रसिद्ध लेखिका उषा किरण खान या बीबीसीच्या सीटू तिवारींशी बोलताना म्हणाल्या होत्या की,
"आधी महिला फक्त साडी नेसायच्या. शिवणकाम तर मुस्लिमांसोबत इथे आलं. त्यानंतर ब्लाऊज शिवून घालणं ही कन्सेप्ट आली. मी लहानपणी संथाल आदिवासी स्त्रियांना पाहिलं आहे. त्या आपले स्तन झाकायच्या नाहीत. काही उत्सव, समारंभ असेल तेव्हाच या महिला अशा प्रकारे साडी नेसायच्या की त्यांचे स्तन झाकले जातील. अनेकदा त्या आपल्या शरीराच्या वरच्या भागात फक्त एक कापड टाकायच्या. हे कापड अधूनमधून उडत राहायचं, पर्यायाने त्या महिलांचे स्तनही अधूनमधून दिसत राहायचे."
मुस्लीम आक्रमकांबरोबर जशी शिवलेले कापड घालण्याची परंपरा आली तसंच बनारसी साडीतही अनेक बदल झाले.
मकबूल हसन ते बदल सविस्तर समजावून सांगतात.
"मुघल आले तेव्हा साड्यांवर मोटीफचं (गुंतागुतींची वेल, फुलं यांची नक्क्षी) काम सुरू झालं. जहांगिराच्या काळात बनारसी साडीच्या डिझाईनमधून प्राणीपक्षी कमी कमी होत गेले आणि त्यात बंद कळ्याची नक्क्षी आली."
जसा शहाजहानचा काळ आला तेव्हा या कळ्यांची पूर्णपणे उमलेली फुलं झाली. याच काळात या साड्यांच्या डिझाईनमध्ये वेली, फुलं, तंतू अशाही गोष्टी आल्या.

"मुघलांनी बनारसी साडीच्या डिझाईनवर खूप काम केलं. शहाजहानच्या काळात साडीची नक्क्षी अधिकाधिक गुंतागुतींची होतं गेली, बुट्टे आले. त्यांच्या नक्क्षीत सुसुत्रता आली. आता साड्यांना काठ बनायला लागले," ते म्हणतात.
याच काळात जामदनीचं काम सुरू झालं. जामदनी म्हणजे काय तर असं डिझाईन किंवा भरतकाम जे साडीच्या दोन्ही बाजूंनी सारखं दिसेल. कुठूनही एकही धागा सुटा नसेल.
जामदानीचं काम राज्यकर्त्यांना इतकं आवडलं की या साड्या किंवा या प्रकारचे रेशमी कपडे फक्त शाही घराण्यासाठीच राखून ठेवले गेले.
चीन स्वस्त साड्यांचं आक्रमण
अडीच हजार वर्षांचा भरजरी इतिहास असणाऱ्या या साडीवर आता संकट आलंय. एकतर विणकरांची नवी पिढी या व्यवसायात उतरू इच्छित नाही आणि दुसरं म्हणजे या हस्तउद्योगाच्या संरक्षणासाठी कोणतंही ठोस सरकारी धोरण नाही.
मकबूल हसन म्हणतात, "एक गोष्ट समजून घ्या की ही एक कला आहे आणि कोणतीही कला, हस्तद्योग सरकारी प्रोत्साहनाशिवाय बहरू शकत नाही. आजवर भारतात अनेक पारंपरिक कला बहरल्या कारण इथल्या राजामहाराजांनी, बादशाहांनी त्या कलांना, त्या कलाकारांना प्रोत्साहन दिलं. संरक्षण दिलं."

या पारंपरिक कलांचं संरक्षण करायचं असेल तर त्याचा समावेश अभ्यासक्रमात करायला हवा, त्यासाठी नवीन कोर्सेस डिझाईन करायला हवेत असंही ते म्हणतात.
'नारळी पदर, जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी.' शांताबाई शेळकेंनी हे शब्द पैठणीसाठी वापरले असले तरी बनारसी साडीला अगदी तंतोतंत लागू पडतात. ही फक्त साडी नाहीये, हा 2500 वर्षांचा इतिहास आहे, भारतातल्या बदलत्या संस्कृतीची साक्ष आहे.
पण या साडीची चमक आता फिकी पडतेय. वाढती स्पर्धा, मास प्रोडक्शन आणि चीन-जपान सारख्या देशात बनणाऱ्या याच्या स्वस्त आवृत्त्या यामुळे इथल्या विणकरांना खूप त्रास सहन करावा लागतोय.
आधी कसं होतं की या साड्या फक्त हातमागावर विणल्या जायच्या. त्याचे ताणेबाणे कसे बसवायचे, कोणत्या नक्क्षीसाठी काय वापरायचं याची प्रक्रिया कुठे लिहिलेली नव्हती. ती विणकरांच्या डोक्यात पक्की असायची.
"त्यात अनेक जुगाड असायचे ते फक्त विणकरांना माहिती असायचे. ही माहिती फक्त पिढी दर पिढी पुढे सरकायची. इतर कोणाला याबद्दल काहीही माहिती नसायचं," मकबूल सांगतात.
जोवर या साड्या हातमागावर बनायच्या तोवर याचं डिझाईन, ही कला कोणीही कॉपी करू शकलं नाही. पण जशा या साड्या यंत्रमागावर बनवण्याची सुरुवात झाली तसं बनारसमधल्या विणकरांच्या पोटावर पाय आला.

"या साड्यांची नक्कल आधी सुरतने सुरुवात केली. सुरतच्या कापड उद्योगाने बनारसी साड्या बनवायला सुरुवात केली. पण नंतर याच चीन शिरला. सिल्क त्यांच्याकडे होतंच. त्यांनी आमचं डिझाईन घेतलं. त्यात त्यांनी पॉलिएस्टर, इतर धागे मिक्स करून नकली बनारसी साड्या बनवायला सुरुवात केली आणि स्वस्तात स्वस्त साड्या त्यांनी भारतीय बाजारात उतरवल्या. चीनने सुरत आणि बनारस दोघांना बरबाद केलं," मकबूल हसन उद्वेगाने म्हणतात.
बनारसच्या विणकरांची आता मागणी आहे की सरकारने चीनकडून आयात होणाऱ्या अशा साड्यांवर अधिक टॅक्स लावावा म्हणजे स्थानिक विणकरांच्या पोटावर पाय येणार नाही.
एक धागा हिंदू एक धागा मुस्लीम अशी 'तानाबाना संस्कृती'
स्वस्त, नकली आवृत्त्यांमुळे खरी पारंपारिक बनारसी साडी मागे पडत असली तरी या साडीने हजारो वर्षं इथल्या हिंदू-मुसलमानांना एकत्र बांधून ठेवलं आहे आणि यातून तयार झालीये एक अनोखी तानाबाना संस्कृती.

याबद्दल बोलताना हसन म्हणतात, "बनारसी साडीचा जितका कच्चा माल येतो तो सगळा हिंदू व्यापाऱ्यांकडून. ही साडी विणणारे असतात मुस्लीम कारागिर आणि ज्यांना आम्ही हा माल विकतो, ते व्यापारी असतात हिंदू."
"म्हणजे साडीत एक धागा ताण्याचा असतो तर बाण्याचा तसंच या बनारसी साडीच्या उद्योगात एका बाजूला हिंदू आहेत तर दुसऱ्या बाजूला मुस्लीम. आम्ही एकमेकांशिवाय तरू शकत नाही."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








