रशियाः स्टालिनला शांततेच्या मार्गावर चालण्याची समज देणाऱ्या राधाकृष्णन यांची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images
जगभरात पाच ऑक्टोबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. पण, भारतात तो एक महिना आधी म्हणजेच पाच सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. राधाकृष्णन हे राष्ट्रपती आणि विचारवंत होते हे सर्वांनाच माहीत आहे. पण ते भारताचे राजदूतही होते.
या दरम्यान त्यांचे घडलेले किस्सेही प्रसिद्ध आहेत. ते किस्से काय आहेत हे आपण पाहूतच पण त्याआधी राधाकृष्णन कोण होते हे जाणून घेऊया.
माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला झाला होता.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तेव्हाचं मद्रास म्हणजेच आताच्या चेन्नईपासून 40 किलोमीटर अंतरावरील तिरुतन्नीमध्ये झाला होता. राधाकृष्णन यांचे वडील श्री वीर सामैय्या तहसीलदार होते.
'प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया' या पुस्तकात जनक राज जय लिहितात की, राधाकृष्णन यांच मूळ गाव सर्वपल्ली होतं. पण त्यांच्या आजोबांनी हे गाव सोडून तिरुतन्नीमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.वयाच्या 8 व्या वर्षापर्यंत राधाकृष्णनन तिरुतन्नीमध्येच राहिले.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये भरती केलं. त्यानंतर तिरुपतीमधील लूथेरियन मिशनरी हायस्कूल, पुढे वूर्चस कॉलेज वेल्लूर आणि मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं लग्न झालं.
वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी 'इथिक्स ऑफ वेदांत' या विषयावर शोधप्रबंध लिहिला, तो 1908मध्ये प्रकाशित झाला होता. अगदी कमी वयापासूनच राधाकृष्णन यांनी शिकवायला सुरुवात केली होती.
वयाच्या 21व्या वर्षी ते 'मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेज'मध्ये ज्युनियर लेक्चरर म्हणून शिकवत होते.त्यानंतर ते आंध्र प्रदेश यूनिव्हर्सिटी आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे कुलगुरू म्हणून काम पाहिलं. तसंच 10 वर्षं दिल्ली युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते. ब्रिटिश अकादमीत निवड झालेले ते पहिले भारतीय व्यक्ती होते आणि 1948 मध्ये युनेस्कोचे चेअरमन म्हणून त्यांची निवड झाली होती.ऑक्सफर्ड विद्यापीठानं त्यांना 'नाईटहूड'ने सन्मानित केलं.
शिक्षक दिवस का साजरा करतात?
भारतात 1962 पासून शिक्षक दिवस साजरा केला जातो. याचवर्षी म्हणजेच 1962च्या मे महिन्यात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशाचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदभार हाती घेतला होता. याअगोदर 1952 ते 1962 या कालावधीत ते देशाचे पहिले उप-राष्ट्रपती होते. एकदा डॉ. राधाकृष्णन यांच्या मित्रांनी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करू देण्याची विनंती केली.

देशाचं भविष्य मुलांच्या हातात आहे आणि मुलांना एक चांगला माणूस म्हणून घडवण्यात शिक्षकांचं मोठं योगदान असतं, असं सर्वपल्ली यांचं मत होतं. त्यामुळे मग माझा जन्मदिवस शिक्षकांच्या स्मरणार्थ साजरा केल्यास मला आनंद होईल, असं राधाकृष्णन यांनी मित्रांना सांगितलं.
त्यानंतर 1962पासून दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
शांततेच्या मार्गावर चालण्याचा सल्ला
राधाकृष्णन यांच्या आयुष्यातील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातले दोन किस्से आपण पाहूयात.पहिला तेव्हाचा आहे जेव्हा राधाकृष्णन रशियात भारताचे राजदूत होते.याविषयी प्रसिद्ध कवी रामधारी सिंह दिनकर यांनी स्मरणांजली या पुस्तकाल लिहिलंय, "जेव्हा राधाकृष्णन मॉस्कोमध्ये भारताचे राजदूत होते, तेव्हा बरेच दिवस स्टालिन त्यांच्याशी भेटायला तयार नव्हते.
"शेवटी दोघांची भेट झाली तेव्हा राधाकृष्णन यांनी स्टालिनला म्हटलं, आमच्या देशात एक राजा होता, जो क्रूर होता. रक्तपात घडवून त्यानं प्रगती केली होती. पण एका युद्धात त्याला साक्षात्कार झाला आणि त्यानं धर्म, शांती आणि अंहिसेचा मार्ग पकडला. आता तुम्हीसुद्धा या मार्गावर का नाही चालत?" दिनकर लिहितात

फोटो स्रोत, Getty Images
राधाकृष्णन यांच्या या प्रश्नावर स्टालिन यांनी त्यांच्या दुभाष्याला म्हटलं, "या माणसाला राजकारण समजत नाही. हा फक्त मानवतेचा पुजारी आहे."
दुसरा किस्सा आहे राधाकृष्णन चीनला गेले तेव्हाचा. सर्वपल्ली राधाकृष्णन चीनला गेले तेव्हा चीनचे नेते माओ यांनी आपल्या निवासस्थानी त्यांचा पाहुणचार केला. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तेव्हा राधाकृष्णन यांनी माओ यांच्या गाल प्रेमाने थोपटले होते. त्यांच्या या कृतीचं माओंना आश्चर्य वाटलं यावर माओ काही बोलायच्या आधीच राधाकृष्णन यांनी म्हटलं, "अध्यक्ष महोदय. तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका. असंच मी स्टालिन आणि पोप यांच्याबरोबरसुद्धा केलं आहे.
"भारताचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यादरम्यान चीनमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी बीबीसीचे प्रतिनिधी रेहान फजल यांना त्या भेटीबद्दल सांगितलं, "जेवण करताना माओ यांनी चॉपस्टिकच्या साहाय्यानं प्लेटमधील एक पदार्थ राधाकृष्णन यांच्या ताटात ठेवला. पण, राधाकृष्णन हे शाकाहारी आहे, याचा माओ यांना काही एक अंदाज नव्हता. राधाकृष्णन यांनीही माओ यांनी काही चूक केली, असं जाणवू दिलं नाही."
त्यावेळी राधाकृष्णन यांच्या बोटाला जखम झालेली होती. चीनच्या दौऱ्यापूर्वी कंबोडियाला गेले असताना कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्यांचा हात कारच्या दरवाजामध्ये अडकला होता आणि बोटाचं हाड मोडलं होतं. माओ यांनी हे बघितल्यानंतर डॉक्टरांना बोलावलं आणि राधाकृष्णन यांच्या बोटाची मलमपट्टी करून दिली. तर हे असे होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. 1954 मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च अशा 'भारतरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 17 मे 1975 रोजी त्यांचं निधन झालं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








