भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य, 'समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा'

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

1. 'समर्थ के बिना शिवाजी को कौन पुछेगा' - भगतसिंह कोश्यारी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल?, असं वादग्रस्त वक्तव्य केलं. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

कोश्यारी यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. तसेच सोमवारी (28 फेब्रुवारी) पुण्यात आंदोलनाची घोषणा केली. त्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भगतसिंह कोश्यारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना बोलत होते.

यावेळी भगतसिंह कोश्यारी म्हणाले, "महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे."

ते पुढे म्हणाले, "आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सद्गुरूकडे मिळतो."

2. मुंबईत मराठी पाट्याच हव्यात : उद्धव ठाकरे

मराठी भाषा दिनानिमित्त बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मुंबई या दोन्हीचं नातं सांगताना याबाबतची अनेक वक्तव्य केली. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

यावेळी त्यांनी मराठी भाषेचा गौरव करताना "हा दिवस वर्षातून एकदाच असता कामा नये. रोज या भाषेचा गौरव कसा वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे."

मराठी भाषा आणि मुंबईबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "ज्यावेळी मराठी माणसाला न्याय मिळत नव्हता त्यावेळी बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या मनगटातील ताकद दाखवून दिली. तसंच सुधीर जोशींनी लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसासाठी मोलाचे योगदान दिले. त्यामुळे ही मुंबई अशीच मिळाली नसून रक्त सांडवून घ्यावी लागली. तर या मुंबईतून सर्वकाही मिळत आहे तिथे मराठी पाट्याच हव्या."

3. माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला अटक आणि सुटका

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने त्याच्या सोसायटीतील रहिवाशांबरोबर वाद घातला. यासाठी वांद्रे पोलिसांनी त्याला अटक केली होती.

विनोद कांबळीवर वांद्र्यातील रहिवाशी सोसायटीच्या गेटला कार धडकवल्याचा आरोप आहे. कांबळी राहत असलेल्या सोसायटीचा हा गेट आहे. पोलिसांनी कांबळीला अटक केली व नंतर त्याला जामिनावर सोडलं. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

विनोद कांबळीवर आयपीसीचं कलम 279 (बेदरकारपणे वाहन चालवणं), कलम 336 दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणं आणि कलम 427 या कलमांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत.

4. नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिलीय.

दिशा सालियन हिची बदनामी केल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

आमदार नितेश राणेही याप्रकरणी सहआरोपी आहेत. लवकरच पोलीस दोघांचा जबाब नोंदवणार आहेत.

दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाला. तिच्यावर बलात्कार होताना एका मंत्र्याचे सुरक्षारक्षक फ्लॅटबाहेर होते, असा दावाही नारायण राणे यांनी अलीकडेच झालेल्या पत्रकारपरिषदेत केला होता. त्यानंतर नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनीही अशाचप्रकारच्या आरोपांची राळ उडवून दिली होती.

5. भारतानं श्रीलंकेला दिला व्हाईट वॉश

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने तिसरा सामना 6 विकेट्सनी जिंकत मालिका 3-0 ने जिंकली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

या सामन्यात श्रेयस अय्यरने धडाकेबाज असं सलग तिसरं अर्धशतक झळकावत सामना भारताला सहज जिंकवून दिला आहे.

भारताने श्रीलंकेचं 147 धावाचं आव्हान 16.5 ओव्हरमध्ये संपवत सामना जिंकला आहे. वेस्ट इंडीजनंतर आता भारताने श्रीलंकेलाही व्हाईट वॉश दिला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)