योगी आदित्यनाथ यांच्यावर आदित्य ठाकरेंची टीका, 'यूपीचे मुख्यमंत्री लवकरच माजी मुख्यमंत्री बनणार', #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. आदित्य ठाकरे म्हणतात, 'योगी आदित्यनाथ लवकरच माजी मुख्यमंत्री बनणार'

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपले उमेदवार प्रचारात उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची गोरखपूर येथे सभा पार पडली.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केलीय. झी 24 तासनं ही बातमी दिलीय.

ते म्हणाले, "उत्तर प्रदेशचा विकास केला असं सांगितलं जात होतं. पण, विकास झाला का? नाही झाला. इथले मुख्यमंत्री मुबंईत येतात तिथे जाहिरात देतात. इतके उद्योग आले. कारखाने आले. मग, इथे रोजगार वाढला का? नाही. उलट बेरोजगारी वाढलीय."

"महिला अत्याचार वाढलेत की महिला सन्मान वाढलाय? सामाजिक न्याय वाढलाय की सामाजिक अन्याय वाढलाय? आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते या निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री होतील," असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

2. रशियाच्या युक्रेशनवरील आक्रमणामुळे सोयाबीन, गहू आणि मक्याच्या किमतीत वाढ

रशियाकडून युक्रेनविरोधात आक्रमणाची घोषणा झाल्यानंतर क्रूड ऑइल आणि सोने दरच नाही, तर गहू, सोयाबीन आणि मक्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

रशिया गव्हाचा मोठा उत्पादक देश असून आता युद्धामुळे जगभरातील गव्हाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गव्हाच्या किमतीत वाढ झाली आहे.

सोयाबीन आणि मका दरातही मोठी वाढ झाली आहे.

सोयाबीन दीड वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर ट्रेंड करत आहे. तर मागील 9 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर गव्हाची विक्री होत आहे. मक्याच्या किमतीतही वाढ झाली असून हा दर 33 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

3. नवाब मलिक कुटुंबाची उस्मानाबादेत 150 एकर जमीन - भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद तालुक्यातील जवळा येथे 150 एकर जमीन आहे.

इतकी जमीन खरेदी करण्यासाठी मलिक कुटुंबाकडे पैसा कुठून आला? याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केलीय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

ही जमीन सिलिंगची होती, मात्र ती खरेदी करताना कोणतीही परवानगी घेतली नाही. तसंच एका कुटुंबाला इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करता येत नसताना ती नियमबाह्य रित्या खरेदी केल्याचा आरोपही काळे यांनी केला आहे.

उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागात तब्बल 150 एकर जमीन घेण्याचे प्रयोजन काय?, असा सवाल करत ईडीने या प्रकरणाचीही चौकशी करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय.

4. HSC Exam : 12 वी परीक्षा वेळापत्रकात बदल

राज्यातील इयत्ता 2 वीच्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. 12 वीची परीक्षा 4मार्चपासून सुरू होत आहे. मात्र, आता 5 मार्च आणि 7 मार्चला होणाऱ्या विषयांची परीक्षा पुढे ढकलण्यात आलीय. यात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा विषयांचा समावेश आहे.

नुकतीच अहमदनगरमधील संगमनेर येथे 12 वीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला आग लागल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

12 वीचा 5 मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता 5 एप्रिलला होणार आहे, तर 7 मार्चला होणारा मराठीचा पेपर हा 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.

5. भारताचा श्रीलंकेवर विजय

श्रीलंकेविरुद्धच्या पहिलाच टी 20 सामना भारताने 62 धावांनी जिंकला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.

भारताने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने निर्धारीत 20 षटकात सहा बाद 137 धावा केल्या.

या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)