गंगुबाईं काठियावाडींचे कुटुंबीय म्हणतात, 'आईला वेश्या दाखवलं, आमची नाचक्की झाली'

    • Author, मधू पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

हिंदी चित्रपटांचं पूर्वीपासूनच वादविवादांशी घनिष्ठ नातं राहिलेलं आहे. चित्रपट दिग्दर्शक व निर्माते संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट हे याचं एक मोठं उदाहरण म्हणावं लागेल.

'गोलियों की रासलीला- रामलीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' यांसारख्या त्यांच्या चित्रपटांवरून गतकाळात वाद झाले आहेत आणि आता 'गंगुबाई काठियावाडी' या त्यांच्या नव्या चित्रपटानेही वादाला तोंड फोडलं आहे.

गंगुबाईंच्या कुटुंबियांना या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातून सूचित होणारी कथा न रुचल्यामुळे हा वाद सुरू झाला. गंगुबाईंच्या कुटुंबियांनी या संदर्भात आपले आक्षेप नोंदवले असून अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. गंगुबाईंना स्वतःचं अपत्य नव्हतं, पण त्यांनी चार मुलांना दत्तक घेतलं होतं.

संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा आहे, असा आरोप गंगुबाईंचा दत्तक मुलगा बाबूराव आणि त्यांची नात भारती यांनी केला आहे.

पुस्तकाविषयी माहिती नव्हती

संजय लीला भन्साळी यांनी हा चित्रपट करण्यापूर्वी आपल्याशी कोणताही संपर्क साधलेला नव्हता वा आपली संमतीही घेतलेली नव्हती, असं गंगुबाईंच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. गंगुबाईंवर पुस्तक लिहिलं गेल्याचीही आपल्याला माहिती नसल्याचं या कुटुंबियांनी म्हटलं आहे. त्यांनी या चित्रपटाचा टीझर पाहिला आणि गंगुबाईंच्या आयुष्याचा उल्लेख एका पुस्तकात करण्यात आल्याचंही त्यांना तेव्हाच कळलं.

विख्यात लेखक एस. हुसैन झैदी यांनी लिहिलेल्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर भन्साळींचा चित्रपट आधारीत आहे. झैदी यांनी पुस्तक लिहितानाही आपली परवानगी घेतली नव्हती, असा दावा गंगुबाईंच्या कुटुंबियांनी केला आहे.

'चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाल्यापासून आमच्यावर तोंड लपवण्याची वेळ आली आहे'

गंगुबाईंचा दत्तक मुलगा बाबूजी रावजी शाह बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले, "मी 75 वर्षांचा आहे, आणि गंगुबाई माझी आई होती, एक सामाजिक कार्यकर्ती होती, तिने अनेक लहान-मोठी कामं केली, माझं लग्न करवून दिलं, मला घर घेऊन दिलं. आम्ही आत्ता राहतो तिथेच मी लहानाचा मोठा झालो.

माझी दोन मुलंही तिथेच वाढली, पण आता माध्यमांमधून ज्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे आम्हाला तिथे थांबणं मुश्कील झालं. माझी मुलगी आणि मुलगे मोठे झालेले आहेत, त्यांना शाळेत-कॉलेजात जाताना लोक नावं ठेवू लागले आहेत, त्यामुळे आम्हाला राहती जागा सोडावी लागली.

आमचं बालपण कामाठीपुरामध्ये गेलं. या चित्रपटात आता जे दाखवलं जातंय ते सगळं चुकीचं आहे. पहिल्यांदा ऑगस्ट 2020 मध्ये या चित्रपटाचं नाव वर्तमानपत्रात वाचल्यावर आम्हाला आमच्या आईवर हा चित्रपट येत असल्याचं कळलं. त्याच वेळी आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली होती."

कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, गंगुबाई सामाजिक कार्यकर्त्या होत्या.

गंगुबाईंची नात भारती सांगतात, "माझी आजी एक खूप मोठी सामाजिक कार्यकर्ती होती. ती वेश्या नव्हती. तिच्याकडे आलेलं लहान मूल असो की म्हातारी व्यक्ती, गाय-बैल, कुत्रा, कबुतर असे प्राणीपक्षी असोत, कोणीही जेवल्याविना माघारी जात नसे.

गुरुवारी आमच्या घराच्या दारासमोर भिकारी पैसे मागण्यासाठी रांग लावून उभे असायचे. आजी त्यांना पैसे वाटायची. ती मकदूम शाह बाबाच्या दर्शनाला गेली तरी सगळ्या मुलांना जेवण दिल्याशिवाय परत यायची नाही. आम्हाला जितपत माहिती आहे, त्यावरून तरी तिने सगळी चांगलीच कामं केली. तिने काही वाईट काम केल्याचं आम्ही कधीही ऐकलं नाही. असं कोणी म्हणत असेल तर त्याने आमच्या समोर येऊन सांगावं, मग आम्ही ते कबूल करू."

'टीझर पाहिल्यापासून लोक आम्हाला फोन करतायंत'

भारती पुढे म्हणतात, "आम्ही जे बघितलं तेच आम्ही सांगू शकतो ना. माझी आजी मरण पावली तेव्हा मी 20 वर्षांची होते. विसाव्या वर्षी आपली स्मरणशक्ती तर पक्की असते. कोणीतरी अगदी लहान असतानाची आठवण सांगतंय, असं नाहीये. आम्ही आधीपासून जे बघत आलो त्यातली प्रत्येक गोष्ट माझ्या आठवणीत आहे. त्यामुळे चित्रपटात दाखवलंय ते सगळं खोटं आहे, एवढं आम्हाला कळतं.

टीझर पाहिल्यापासून लोक आम्हाला फोन करतायंत. तुमच्या आईविषयी काय दाखवलंय बघा, वगैरे सांगतायंत. आजीला सगळेच 'माँ' असं म्हणायचं. कोणीच तिला गंगुबाई म्हणून हाक मारायचं नाही. ती सगळ्यांची 'माँ' होती. चित्रपटात ती मोठा टिळा लावताना दाखवलेय, पण माझ्या आजीने आयुष्यात कधी तसा टिळा लावलेला नाही."

गंगुबाईंच्या रूपातील आलिया भट्टवर आक्षेप

चित्रपटात आलिया भट्ट पांढरी साडी नेसून आणि कपाळावर लाल कुंकू लावून दाखवली आहे.

गंगुबाईंच्या रूपातील आलिया भट्टविषयी बोलताना भारती म्हणतात, "कामाठीपुरात प्रत्येक सेक्स वर्करच्या घरात माँचा फोटो असतो. आपण देवाच्या फोटोवर कुंकू लावतो ना, तसं आजीच्या फोटोवर कुंकू लावून लोकांनी तिची प्रतिमा उंचावत नेली, म्हणून चित्रपटात मोठं कुंकू लावलेली गंगुबाई दाखवली असेल.

ती कायम पांढरेच कपडे घालायची. तिचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला होता, त्यामुळे स्वातंत्र्यसेनानींच्या संपर्कामुळे ती कायम पांढरा पोशाख करायची. ती नेहमी खादीचा पोशाखच घालत असे. गुजराती लोकांसारखा मोठा ब्लाउज आणि पांढऱ्या रंगाची साडी- असा तिचा पेहराव असायचा."

चित्रपटाच्या ट्रेलरबाबत बोलताना भारती म्हणाल्या, "ट्रेलमध्ये सगळं घाण तेवढंच दाखवलंय. उदाहरणार्थ, आझाद मैदानात आजी भाषण करताना दाखवली आहे. 'हमको किसी ने श्रीमती नहीं बनने दिया' असं ती बोलते. किती बेकार वाक्य आहे हे. आपल्या मर्जीनुसार काहीही वाक्यं तिच्या भाषणात कोंबलेली आहेत. चित्रपटाच्या ट्रेलमध्ये गंगुबाई धंदा करताना दिसते. पण या लोकांना गंगुबाईचा इतिहास माहीत आहे का? तिच्याविषयी त्यांना काय माहितेय?

ट्रेलरमध्ये असं दाखवलंय की, 1936 साली गंगुबाईंचा जन्म झाला आणि 1947मध्ये त्यांना दत्तक घेण्यात आलं. म्हणजे अकराव्या वर्षी त्यांना दत्तक घेतलं गेलं. माझ्या आईचा जन्म 1944 साली झाला, आणि गेल्याच वर्षी ती वारली. माझ्या आईला आजीने 1944 साली दत्तक घेतलं असेल, तर तेव्हा आजीचं वय आठ वर्षांचं असेल का? असं सगळा गोंधळ आहे त्या चित्रपटात. आपल्या मनात येईल ते लिहून टाकायचं! पैसा कमावण्यासाठी या लोकांनी आमची पूर्णच वाट लावून टाकली. सगळा पैशाचाच तर खेळ आहे ना?"

'चित्रपटामुळे आमची खूप नाचक्की झाली'

या चित्रपटामुळे गंगुबाईंच्या कुटुंबियांना खूप अपमान सहन करावा लागतो आहे, असं त्यांचा दत्तक मुलगा बाबूजी रावजी म्हणतात. ते सांगतात, "आमची यात खूप नाचक्की झाली. आता आमच्यावर तोंड लपवून फिरायची वेळ आलेली आहे. आमच्या लेकीसुना बाजारात जातात, शाळा-कॉलेजांमध्ये जातात, तेव्हा सगळे लोक त्यांच्याकडे बोट दाखवून 'या त्याच परिवारातल्या आहेत' असं कुजबुजतात."

गंगुबाईंची नात भारती म्हणतात, "आमच्यावर दारोदार हिंडायची वेळ आलेय. तुम्हाला हवं तर आमच्या घराचा करार बघा. आम्ही किती दिवस त्या घरी राहिलो, ते तपासा.

2020 सालापासून आम्ही कुठे ना कुठे भटकतोच आहोत. आमच्यावर तोंड लपवून राहायची वेळ आलेय. लोक येता-जाता आम्हाला टोमणे मारतात. समाजात राहिल्यावर हे कळतंच सगळ्यांना. आम्ही आमच्या आजीचं कौतुक करतो, पण आता चित्रपटाचा ट्रेलर पाहून लोक आम्हाला विचारतात, 'अरे, तुमचा परिवार असा होता काय?'

कोणी आम्हाला 'वेश्येची औलाद' म्हणतात. असे शब्द वापरावे लागतायंत, त्याबद्दल मी माफी मागते, पण लोक आमच्याबद्दल असंच बोलतायंत. आम्हाला मुलंबाळं आहेत, जावई आहेत, नातवंडं आहेत, आमचं कुटुंब आता इतकं विस्तारलंय. गंगुबाईंनी चार मुलं दत्तक घेतली होती, तिथून हे कुटुंब इतकं वाढलं. पण आता आम्हाला लोकांच्या विचित्र प्रश्नांना उत्तर द्यावी लागतायंत."

'हा लढा पैशाचा नाही, आत्मसन्मानाचा आहे'

गंगुबाईंवरील चित्रपटावरून सुरू झालेल्या या वादात आता गंगुबाईंच्या कुटुंबियांची मागणी काय आहे? या प्रश्नावर बाबूजी रावजी म्हणतात, "तुम्ही आमच्या याचिकेसंदर्भातली फाइल पाहू शकता. आम्ही पैशाची मागणी केलेली नाही. आमची जी काही नाचक्की झाली, त्याबाबत आम्ही याचिका दाखल केलेली आहे.

आम्हाला या चित्रपटासंदर्भात कोणी संपर्क साधला नाही आणि आम्ही कोणाकडेही पैशाची मागणी केलेली नाही. पैसाच हवा असता, तर आम्ही त्यांना आमचं नाव खराब करूच दिलं नसतं. आम्ही सरळ त्यांना जाऊन भेटलो असतो आणि अमुकइतके पैसे द्या अशी सरळ मागणी केली असती. मग नाव खराब होऊ दे किंवा काहीही होऊ दे. पण आम्ही स्वतःचा आत्मसन्मान गमावलेला नाही.

गंगुबाईंना जितका सन्मान मिळत होता, तितका सन्मान मिळवायला अनेकांना आयुष्य पुरं पडत नाही. आज गंगुबाईंना लाभलेली सगळी प्रतिष्ठा या लोकांनी धुळीस मिळवून टाकली. गंगुबाई बेवारस मेल्या, त्यांचं कोणीच नव्हतं, अशी गोष्ट यांनी रंगवलेय. आमची मागणी एवढीच आहे की, या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं, त्यावर स्थगिती आणावी. आमच्या आईची गोष्ट कोणी हवी तशी सांगावी, हे आम्हाला मान्य नाही. आम्ही न्यायासाठी लढतो आहोत."

2020 साली पहिली नोटीस पाठवली होती

गंगुबाईंच्या कुटुंबियांचे वकील नरेंद्र दुबे म्हणतात, "पहिल्यांदा ऑगस्ट 2020मध्ये मला संपर्क साधण्यात आला. त्या वेळी या चित्रपटाचा प्रोमो प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर गंगुबाईंच्या कुटुंबियांच्या वतीने आम्ही लगेच चित्रपटकर्त्यांना संपर्क साधला आणि नोटीस पाठवली.

चित्रपटाच्या आशयाबाबत गंगुबाईंच्या कुटुंबियांचे आक्षेप असून हा चित्रपट तयार करू नये, असं त्यात नोंदवलं होतं. या चित्रपटात गंगुबाईंना वेश्या आणि माफिया डॉन म्हणून दाखवलं आहे, त्यातून संबंधित कुटुंबियांची मानहानी होते, असंही नोटिशीत लिहिलं होतं.

ही नोटीस आम्ही संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, भन्साळी प्रोडक्शन्स, हुसैन झैदी, अशा सगळ्यांना पाठवली होती. त्यातल्या फक्त हुसैन झैदींचं उत्तर आलं. मग आम्ही चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्यासाठी नगर दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर आम्ही फौजदारी याचिकासुद्धा केली आणि मग सुनावणी लांबत गेली. मग आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आणि आता हा खटला सर्वोच्च न्यायालयात गेला आहे."

गंगुबाईंवरील चित्रपटाची गोष्ट एस. हुसैन झैदी यांच्या पुस्तकावर आधारीत आहे.

गंगुबाईंच्या कुटुंबियांचे वकील नरेंद्र दुबे यांच्या म्हणण्यानुसार, "फक्त चित्रपटाच्या ट्रेलरबाबत अडचण असती, तर तेवढं समजून घेता आलं असतं. पण अख्ख्या चित्रपटाची गोष्टच अशी आहे आणि आम्ही न्यायालयात हे सांगितलं आहे. एस. हुसैन झैदी यांनी पुस्तकात जे लिहिलंय तेच दिग्दर्शकाने पडद्यावर दाखवलंय. आपण पूर्णपणे सत्य गोष्ट लिहिल्याचं झैदींचं म्हणणं आहे, त्यामुळे कुटुंबियांकडे न्यायालयात दाद मागण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

पुस्तकात सत्य सांगितलंय, आणि त्या सत्य कथेचे हक्क घेऊन त्यावर व्यावसायिक चित्रपट बनवला जातो आहे, असं चित्रपटकर्त्यांचं म्हणणं आहे. गंगुबाई पैसेवाल्या होत्या, असं त्यांनी दाखवलंय. गंगुबाई पैसेवाल्या असत्या, तर आज त्यांच्या कुटुंबियांवर ही वेळ आली नसती. गंगुबाईंकडे बेन्टले कार असल्याचं चित्रपटात दाखवलंय. वास्तविक त्या दोनशे पंचवीस चौरस फुटाच्या घरात राहत होत्या. चित्रपटातच्या कथेत घातलेला मसाला खूप मानहानीकारक आहे. हे प्रकरण केवळ आई आणि मुलं यांच्यातल्या नात्याशी संबंधित नाही, तर एका स्त्रीच्या आत्मसन्मानाचा हा प्रश्न आहे."

दुबे पुढे म्हणतात, "एखाद्या व्यावसायिक चित्रपटासाठी तुम्ही वास्तवाचा किती विपर्यास करणार, हा प्रश्न आहे. झैदी यांनी पुस्तकात लिहिलंय की, गंगुबाई वेश्या होत्या. पण त्यांना वेश्या व्हायचं नव्हतं. ज्या बाईला वेश्या व्हायचं नव्हतं, तिचं चित्रण अशा रितीने केलं गेलं, तर ते तिला रुचलं असतं का? ती वेश्या होती, मुंबईची माफिया डॉन होती, अशा अभद्र गोष्टी यात दाखवलेल्या आहेत.

ती इतकी मोठी गुन्हेगार असती, तर सरकारी कागदपत्रांमध्ये तिच्या नावावर काहीतरी नोंद झाली असतीच की. पण तशी काही नोंद आढळत नाही. त्यांच्यावर कोणताही खटला दाखल झालेला नव्हता, किंवा ही कथा खरी असल्याचं सिद्ध करणारा कोणताही दस्तावेज नाही. या चित्रपटात जे दाखवलंय त्यावरून सगळ्या अफवांना तोंड फुटलं."

बीबीसी हिंदीने चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते संजय लीला भन्साळी आणि सह-निर्माते पेन स्टुडियो यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण अजूनपर्यंत त्यांच्याकडून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

एस. हुसैन झैदी यांच्या वकिलांनी दावा फेटाळला

गंगुबाईंच्या कुटुंबियांनी केलेले दावे निराधार असल्याचं लेखक एस. हुसैन झैदी यांच्या वकील मधू चौधरी यांनी म्हटलं आहे. त्या म्हणतात, "बाबूजी रावजी शाह या गृहस्थांनी एस. हुसैन झैदी, भन्साळी प्रोडक्शन्स आणि इतरांविरोधात कायदेशीर कारवाई केली होती. हे गृहस्थ गंगुबाई काठियावाडींचा दत्तक मुलगा असल्याचा दावा करतात.

'गंगुबाई काठियावाडी' या नावाचा चित्रपट 'माफिया क्विन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावरून प्रेरित असून त्यात आपल्या आईची बदनामी झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार ज्या व्यक्तीला होता, ती व्यक्ती आता मरण पावली आहे, त्यामुळे ही कारवाई पुढे जाऊ शकत नाही, असं मुंबई नगर दिवाळी न्यायालयाने 17 फेब्रुवारी 2021 रोजी दिलेल्या आदेशात म्हटलं होतं.

त्यामुळे 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाविरोधात बाबूजी रावजी शाह यांनी केलेला दावा निराधार ठरतो, त्यातून खटला उभा राहू शकत नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार याचिका रद्द करण्यात आली. माननीय मुंबई उच्च न्यायालयानेसुद्धा 30 जुलै 2021 रोजी दिलेल्या आदेशात ही याचिका रद्द करणारा निर्णय कायम ठेवला. बाबूजी रावजी शाह यांनी दाखल केलेली मानहानीचा फौजदारी कारवाईची तक्रारसुद्धा उच्च न्यायालयाने रद्द केली. 22 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार सध्या हा खटला माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर विचाराधीन आहे आणि योग्य वेळी त्यावर निर्णय दिला जाईल."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)