गंगुबाई काठियावाडी : आलिया भट्ट म्हणते, 'मलाही डिप्रेशन येतं, पण ते लपवायची गरज नाही'

    • Author, मधु पाल
    • Role, बीबीसी हिंदीसाठी मुंबईहून

'हायवे', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'कपूर अँड सन्स', 'उड़ता पंजाब', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'राझी' आणि 'गली बॉय'सारख्या हिट सिनेमांनंतर आलिया भट्टचा आता 'गंगुबाई काठियावाडी' आता सिनेमागृहांमध्ये आलाय.

यापूर्वीच्या जवळजवळ सर्वच सिनेमांमध्ये आलिया भट्टने आपल्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून दाद मिळवली आहे.

तिच्या यशस्वी कारकिर्दीत आलियाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असली तरीही ती करण जोहरची कठपुतळी आहे, असं तिच्याबद्दल अनेकदा बोललं जातं. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या मर्जीशिवाय कोणत्याही सिनेमाचा किंवा मोठा निर्णय ती घेत नाही, असंही म्हटलं जातं.

पण तिला अशा टिप्पणींविषयी काय वाटतं?

"एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा चांगली असते म्हणूनच आपण तिला गुरू मानतो. अशा व्यक्ती आपल्यापेक्षा नेहमीच पुढे राहाणार आहेत," असं आलिया बीबीसीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हणाली.

"माझी क्षमता ओळखून करणने मला पहिली संधी दिली. जो माणूस तुम्हाला पहिली संधी देतो, त्याच्यासाठी तुमच्या मनात भरपूर आदर असतो. मला त्याची कठपुतळी म्हटलं जाण्यानं मला आजिबात वाईट वाटत नाही.

"जर लोक माझा माझ्या गुरूसाठीचा आदर पाहून मला कठपुतळी म्हणत असतील तर मला त्याने काहीच फरक पडत नाही," असं आलियानं सांगितलं.

'अशा शब्दांचा वापर भडकवण्यासाठी होतो'

गेल्या सहा वर्षांपासून आलिया भट्टचे बहुतेक चित्रपट यशस्वी झाले आहेत. तरीही ती केवळ एकाच दिग्दर्शकाबरोबरच सिनेमे करते, असा आरोप तिच्यावर होतो.

यावर आलिया म्हणते, "असं का म्हटलं जात असेल, हा प्रश्न मला नेहमीच पडतो. मला अनेक दिग्दर्शक काम देतात. जर माझ्या कामाला चाहत्यांची वाहवा मिळत असेल तर नक्की मी काहीतरी चांगलं काम केलं असेलच ना? कठपुतळीसारखे शब्द तुम्हाला चिडवण्यासाठी वापरले जातात. मी अशा शब्दांमुळे भडकत नाही."

'कधी-कधी नैराश्य आल्यासारखं वाटतं'

आजकाल फक्त सामान्य लोकंच नाही तर अनेक मोठे आणि प्रसिद्ध लोक त्यांच्या नैराश्याच्या काळाबद्दल बोलू लागले आहेत. विशेषतः लाखो चाहते असणाऱ्या बॉलिवुड तारेतारकांना एकटेपणाचा सामना करावा लागतो.

दीपिका पदुकोण तिच्या नैराश्याबद्दल नेहमीच बोलत आली आहे. तसंच आलियाही याबद्दल खुलेपणानं बोलताना दिसतेय.

याबद्दल आलिया म्हणते, "एकेकाळी मी दोन वेगवेगळ्या अनुभवांच्या मदतीने जगायचे. कधी आनंदी राहायचे तर कधी दुःखी. जास्तीत जास्त आनंदी राहाण्याचा प्रयत्न करायचे, पण जेव्हा दुःखी व्हायचे तेव्हा त्याचं कारणही मला समजायचं नाही.

"आजसुद्धा मला कधीकधी डिप्रेशन यंतं, तेव्हा त्यामागचं कारण ओळखू शकत नाही. जेव्हा माणसाला आतून तुटल्यासारखं वाटतं तेव्हा तुम्हाला नैराश्य आलंय, हे ओळखावं.

"ते लपवण्याची गरज नाही. नैराश्य आल्यावर ते लपवण्याऐवजी आपल्या कुटुंबीयांना सांगितलं पाहिजे. आपल्या भावना मित्र-मैत्रिणींना सांगितल्या पाहिजेत. माझी बहीण यातून गेली आहे," ती सांगते.

आलिया म्हणते, "मला जे होतं ते नैराश्य नाही, कारण ते काही दिवसच असतं. तेवढ्या काळातच मला एकटेपण वाटतं. ते दूर करण्यासाठी मी कुटुंबातील सदस्यांना, मित्रांना भेटते. त्यांच्याशी बोलून मन मोकळं करते."

आलिया भट्टचा 'कलंक' 19 एप्रिलला रिलीज होतोय. त्यात संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन, माधुरी दीक्षित सारखे कलाकार आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)