You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कच्चा बदाम' मुळे रातोरात स्टार झालेले भुबन बदयाकर
(भुवन बदयाकर यांच्या कारला अपघात झाला आहे. कार शिकत असताना हा अपघात झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भुवन बदयाकर यांची प्रकृती सुधारत असल्याची डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांचा प्रवास जाणून घेऊ.)
सोशल मीडियाच्या युगात एखादी व्यत्ती रातोरात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकते. तात्पुरत्या का होईना, पण प्रसिद्धीचा नवा मार्गच जणून सोशल मीडियानं दिलाय.
पश्चिम बंगालचे भुबन बदयाकर याचं ताजं उदाहरण म्हणावं लागेल.
भुबन बदयाकर बीरभूम जिल्ह्यातील असून, ते शेंगदाणे विकतात. त्यांचं 'कच्चा बदाम' गाणं इतकं लोकप्रिय झालं की, इन्स्टाग्राम रिल्सवर प्रत्येक दुसरा व्हीडिओ या गाण्याचाच दिसू लागलाय.
त्यांच्या गाण्यावर केवळ भारतातील लोकच नव्हे, तर परदेशातील लोकही थिरकू लागले आहेत. बॉलिवूडच्या अनेक कलावंतांनीही या गाण्यावर इन्स्टा रिल्स बनवले आहेत.
कोलकात्याहून प्रकाशित होणाऱ्या 'द टेलिग्राफ' या इंग्रजी वृत्तपत्राने भुबनला रातोरात मिळालेल्या लोकप्रियतेबाबत विचारलं आणि त्यांच्या आयुष्यातील या बदलाबाबत जाणून घेतलं.
भुबन यांच्या मते, "गाणं इतकं लोकप्रिय होईल याचा अंदाजच नव्हता. माझ्या आकलनशक्तीच्या हे बाहेरचं आहे, पण ईश्वराची कृपा आणि लोकांच्या प्रेमामुळे हे शक्य झालं."
ज्या व्यक्तीनं सर्वांत पहिलं गाणं शूट केलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं, त्या व्यक्तीचं भुबन आभार मानतात.
भुबन म्हणतात की, मला माहित नाही ती व्यक्ती कोण होती, मात्र त्यांना मी सदिच्छा देतो.
भुबन यांनी 'द टेलिग्राफ'शी बोलताना आपल्या गतआयुष्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "मी बीरभूममधील एका छोट्याशा गावातील आहे. माझं कुटुंब या गाण्याच्या यशामुळे प्रचंड आनंदात आहे. जेव्हा कधी मी घरातून बाहेर जातो, जसं आता कोलकात्यात कार्यक्रमासाठी आलोय, तेव्हा माझी पत्नी, मुलगा काळजीत पडतात की, प्रवासादरम्यान मी कुठे राहीन. मात्र, माझी श्रद्धा आहे की, ईश्वर तुम्हाला मार्ग दाखवतो आणि मार्गदर्शनही तोच करतो."
'कच्चा बदाम' विकण्याबाबत भुबन यांनी म्हटलं की, "कच्चा बदाम (भुईमूगाच्या शेंगा) विकण्यामागे अनेक कारणं आहेत. माझ्याकडे या शेंगा भाजण्यासाठी वेळ नसतो. भुईमूगाच्या कच्च्या शेंगा जास्त पौष्टिक असतात. आपले केस आणि पोटासाठी त्या चांगल्या असतात. भाजलेल्या भुईमूगाच्या शेंगा चविष्ट लागतात, मात्र आरोग्यासाठी कच्चा शेंगाच जास्त चांगल्या असतात."
भुबन हे भुईमूगाच्या शेंगा केवळ पैशाच्या बदल्यातच नव्हे, तर फोनच्या बदल्यातही देतात. यावर भुबन म्हणतात की, हे मी जास्त कमाईसाठी करतो.
ते पुढे म्हणतात, "जर भुईमूगाच्या शेंगा मी पैशासाठी देत असतो, तर मिळकत कमी झाली असती. मात्र, तुटलेल्या-फुटलेल्या सामानाच्या बदल्यात भुईमूगाच्या शेंगा दिल्यानं मिळकत अडीच रुपयांऐवजी पाच रुपये होते. मी भजन आणि आध्यात्मिक गाणीही गातो."
"माझं आयुष्य बदलण्याच्या कल्पनेपलीकडचं आहे. मला हे समजू शकलो नाही की, लोक इतकं प्रेम का देत आहेत. सरकार आणि राज्य पोलिसांनीही माझी खूप मदत केलीय. सिनेमातील लोकांनीही माझ्यासोबत चर्चा केली," असं भुबन म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)