You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लालू प्रसाद यादवांना चारा घोटाळ्यात 5 वर्षांची शिक्षा आणि 60 लाखांचा दंड
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना झारखंडमधील सीबीआयच्या विशेष कोर्टानं चारा घोटाळ्यातील पाचव्या प्रकरणात सोमवारी (21 फेब्रुवारी) पाच वर्षांची शिक्षा सुनावली.
यासोबत, लालू प्रसाद यादव यांना याच प्रकरणात 60 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कोर्टानं 15 फेब्रुवारी रोजी लालूंना दोषी ठरवलं होतं.
लालू प्रसाद यादवांनी सोमवारी (21 फेब्रुवारी) व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टाच्या कारवाईत सहभाग नोंदवला. मात्र, कोर्टाच्या परिसरात मोठी गर्दी गोळा झाली होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला होता.
लालू प्रसाद यादव यांचे वकील प्रभात कुमार यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं की, "लालू प्रसाद यांचं वय, प्रकृती आणि पशुपालन घोटाळ्यातीलच दुसऱ्या प्रकरणात भोगलेल्या शिक्षेचा अवधी पाहता, कोर्टाकडे कमीत कमी शिक्षेची मागणी केली होती."
कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील करू, असंही प्रभात कुमार यांनी सांगितलं.
कोर्टानं जगदीश शर्मांसह 38 दोषींना 15 फेब्रुवारीलाच शिक्षा सुनावली होती. या 38 जणांना तीन वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली. मात्र, त्यांना लगेच जामीनही मिळाला.
2017 साली चारा आणि पशुपालन घोटाळ्याच्या इतर प्रकरणात शिक्षा मिळाल्यानंतर लालू प्रसाद यादवांनी एकूण आठ महिने तुरुंगात घालवले आणि 31 महिने हॉस्पिटलमध्ये होते. ते आठ महिने रांचीस्थिती होटवारच्या बिरसा मुंडा तुरुंगात राहिले.
याआधी 15 फेब्रुवारीला दोषी ठरवल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना रांचीच्या बिरसा मुंडा सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं आणि तिथूनच रिम्स हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथं त्यांना पेईंग वॉर्डात भरती करण्यात आलं, जेणेकरून डॉक्टरांना त्यांच्या तब्येतीवर देखरेख ठेवता येईल.
लालू प्रसाद यादव यांच्या वकिलांनी त्यांच्या तब्येतीचं कारण देत सीबीआय कोर्टात अर्ज केला होता, जो कोर्टानं स्वीकारला.
575 साक्षीदार आणि 15 ट्रंक पुरावे
विशेष सरकारी वकील बीएमपी सिंह यांच्या मते, सीबीआयने 575 साक्षीदार आणि 15 ट्रंक पुरावे कोर्टात सादर केले. बचावपक्षाकडून केवळ 25 लोकांनीच साक्षी दिल्या.
लालू यादव यांच्या विरोधातील प्रकरणं
नव्वदच्या दशकातल्या कोट्यवधींच्या पशुपालन घोटाळ्यात सीबीआयनं त्यावेळी एकूण 66 गुन्हे दाखल केले होते.
यातील सहा प्रकरणात बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आरोपी बनवण्यात आलं होतं. बिहारच्या विभाजनानंतर यातील पाच प्रकरणं झारखंडमध्ये स्थलांतरित करण्यात आले.
यातील पाच प्रकरणातील चार प्रकरणात लालू प्रसाद यादव याआधीच दोषी ठरले आहेत. मात्र, या प्रकरणांत त्यांना जामीन मिळाला होता.
आरसी 47-ए/96 हे पाचवं आणि शेवटचं प्रकरण होतं. यात 1990-91 आणि 1995-96 च्या दरम्यान खोटे बिलांच्या मार्फत अवैध पैसे काढल्याचा आरोप आहे. अवैधरित्या पैसे काढल्याचं हे सर्वात मोठं प्रकरण आहे.
यात लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात आयपीसी कलम 120-बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1998 अंतर्गत 13(2) आर डब्लू 13 (1) (सी), (डी) अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले होते.
लालूंवर आरोप आहे की, मुख्यमंत्री असताना या प्रकरणावर त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही. त्यावेळी काही खासदार आणि आमदारांना संसद, विधानसभा, विधानपरिषद अशा सभागृहांत याबाबत मुद्दा उठवला असतानाही, कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आहे.
पहिला गुन्हा कसा दाखल झाला?
1996 मध्ये घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर तत्कालीन बिहारमधील डोरंडा ठाण्यात 17 फेब्रुवारी रोजी याबाबत एफायआर (नंबर 60/96) दाखल करण्यात आलं होतं.
त्यानतंर त्याचवर्षी 11 मार्चला पटना उच्च न्यायालयाने याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सीबीआयनं 8 मे 2001 ला 102 आरोपींविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल केलं.
त्यानंतर 7 जून 2003 ला 68 दुसऱ्या आरोपींवरही आरोपपत्र दाखल करण्यात आलं. 26 सप्टेंबर 2005 ला कोर्टानं एकूण 170 आरोपींवरील आरोप निश्चित केले होते.
यातील 55 आरोपींचं निधन खटल्यादरम्यानच झालं. आठ आरोपी सरकारी साक्षीदार झाले. दोन आरोपींनी दोषी असल्याचे मान्य केले.
सहा आरोपींचा शोध लावू शकली नाही सीबीआय
या प्रकरणातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, सीबीआय सहा आरोपींचा गेल्या 25 वर्षांपासून शोध घेत आहे, मात्र अद्याप त्यांचा शोध लागू शकला नाही. हे सहा आरोपी फरार असल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)