माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन, AIIMS मध्ये घेतला अखेरचा श्वास

माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन झालं. दिल्लीतील AIIMS हॉस्पिटलमध्ये आज (13 सप्टेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. ते 74 वर्षांचे होते.

रघुवंश प्रसाद सिंह हे राजकीय क्षेत्रासह सामाजिक-ऐतिहासिक विषयांचे जाणकार होते.

जूनमध्ये रघुवंश प्रसाद सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला.

दोन-तीन दिवसांपूर्वीच रघुवंश प्रसाद सिंह यांनी दिल्लीतील AIIMS हॉस्पिटलमधूनच राष्ट्रीय जनता दलाचा राजीनामा देणारं पत्र लिहिलं होतं. लालू प्रसाद यादव यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, जननायक कर्पूरी ठाकूर यांच्यानंतर तुमच्याच पाठीशी मी कायम उभा राहिलो. मात्र, आता नाही. पक्षाचे कार्यकर्ते आणि तुम्हा सगळ्यांचाच खूप स्नेह लाभला. मला माफ करा."

मात्र, लालू प्रसाद यादव यांनी रघुवंश प्रसाद सिंह यांचं राजीनामा पत्र नाकारलं आणि म्हटलं, की तुम्ही कुठेच जाणार नाही.

आज रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनाची वार्ता कळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी ट्वीट करून म्हटलं, "प्रिय रघुवंश बाबू, तुम्ही हे काय केलंत? परवाच तुम्हाला म्हटलं होतं की, तुम्ही कुठेच जाणार नाहीत. मात्र, तुम्ही खूप दूर निघून गेलात. निशब्द आहे, दु:खी आहे. खूप आठवण येईल."

केवळ कपड्यांवरूनच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही रघुवंश प्रसाद सिंह हे साध्या पद्धतीने राहणारे व्यक्तिमत्त्व होते, असं बिहारमधील वरिष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर सांगतात.

रघुवंश प्रसाद सिंह हे UPA-1 मध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्री होते. महाराष्ट्रातील रोजगार हमी कायद्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या मनरेगा कायद्याची अंमलबजावणी रघुवंश प्रसाद सिंह यांनी केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)