You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उन्नाव : डिसेंबरपासून मुलीचा शोध घेणाऱ्याला आईला दोन महिन्यांनंतर मुलीचा पुरलेला मृतदेह मिळाला
- Author, अनंत झणाणे
- Role, बीबीसी प्रतिनिधी, उन्नाव
उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये 22 वर्षीय दलित मुलीची हत्या करून मृतदेह पुरल्याचे प्रकरण 10 फेब्रुवारीला उघड झाले. पण रीता देवी आपल्या मुलीचा शोध 8 डिसेंबरपासून घेत होत्या.
त्यांच्या मुलीचा मृतदेह गुरुवारी जमीन खोदून काढण्यात आला आणि कुटुंबाच्या परवानगीनंतर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
समाजवादी पार्टीचे माजी मंत्री दिवंगत फतेहबहादूर सिंह यांचा मुलगा रजोल सिंह यांच्यावर हत्येचा आरोप आहे.
पोलीस प्रशासनाने वेळीच या प्रकरणाची दखल घेतली नाही असा आरोप रीता देवी यांनी केला आहे. यामुळेच मुलीची हत्या झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
पीडित मुलीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही तासांनी बीबीसीची टीम रीता देवी यांना भेटण्यासाठी उन्नाव येथील त्यांच्या घरी पोहचली. रीता देवी यांची अवस्था अत्यंत वाईट होती.
डिसेंबरपासून आपल्या मुलीचा शोध घेणाऱ्या रीता देवी यांना याचीही जाणीव आहे की यापुढेही त्यांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. आतापर्यंत पोलीस प्रशासानासोबत त्यांनी कसा लढा दिला याची व्यथा त्यांनी सांगितली.
तसंच आत्महत्येचा प्रयत्नही त्यांना करावा लागला आणि एवढं केल्यानंतर त्यांना पोलिसांनी मुलीचा शोध घेतला पण जमीनीत पुरलेला आपल्या मुलीचा मृतदेह त्यांना आढळला.
सपा नेत्याच्या मुलाच्या दुकानात काम करत होती
रीता देवी यांची मुलगी 8 डिसेंबर 2021 पासून बेपत्त होती. पण या प्रकरणी एफआयआर 10 जानेवारी 2022 रोजी नोंदवण्यात आला. रीता देवी यांची मुलगी सपाचे माजी मंत्री दिवंगत फतेह बहादुर सिंह यांचा मुलगा रजोल सिंह याच्या दुकानात काम करत होती.
रीता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीने साधारण एक महिनाच तिथे काम केलं आणि या दरम्यान रजोल सिंहने तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
स्थानिक पोलिसांनी एफआयआरलाही विलंब केला, यासंदर्भात बोलताना रीता देवी सांगतात, "इन्सपेक्टर साहेब म्हणाले मुलगी तुम्ही लपून ठेवली आहे. पैसे कमवण्यासाठी तुम्ही हे करत आहात. तुम्ही मेसेज करुन मुलाच्या खात्यावर पैसे मागवता."
आरोपी रजोल सिंह पोलिसांना लाच देत होता आणि म्हणून पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली असाही आरोप रीता देवी यांनी केला आहे.
रीती देवी यांनी अनेकदा पोलीस स्टेशनला खेटा मारल्या पण पोलिसांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचंही त्या सांगतात.
"पोलीस प्रशासन घाणेरड्या नजरेने पहायचे आणि तुमची मुलगी प्रौढ आहे, तुम्ही इथून जा असं सांगायचे. रोज पोलीस स्टेशनला येऊन मुलगी सापडणार आहे का? असंही म्हणायचे. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर माझी मुलगी आज जीवंत असती."
पोलिसांवर निष्काळजी केल्याचा आरोप
सातत्याने तक्रार करूनही आणि एफआयआर नोंदवण्याची विनंती करूनही उन्नाव पोलिसांनी आरोपी रजोल सिंह याला बरीच सूट दिली असाही आरोप रीता देवी यांनी केला आहे.
उन्नावचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशी शेखर सिंह यांनी रीता देवी यांच्या आरोपांसंदर्भात बोलताना सांगितलं, "या प्रकरणात पोलिसांचीही चौकशी सुरू आहे. या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार. कोतवाली एसएचओ अखिलेश पांड्ये यांना निलंबित केलं आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा झाला आहे का? किंवा कारवाई करण्यास पोलीस कुठेही कमी पडले आहेत का? याची चौकशी करण्यासाठी उन्नाव पोलीस अधिक्षक यांनी आदेश दिले आहेत. यात जो कोणीही दोषी आढळणार त्यांच्यावर कारवाई केली जाईल."
मुलीचा मृतदेह आढळण्याबाबत आणि या प्रकरणात रजोल सिंह आणि सूरज सिंह यांना अटक करण्याबाबत अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशी शेखर सिंह म्हणाले, "यासाठी आमची पाच पथकं काम करत आहेत. ते दिवस-रात्र प्रकरणाचा शोध घेत आहेत."
पोलीस यासंबंधी तपास करत असून आरोपी रजोल आणि सूरज सिंह यांच्याविरोधात गँगस्टर अक्ट आणि एनएसए अंतर्गतही कारवाई होईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
अखिलेश यांच्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
रीता देवी आपल्या मुलीचा अशापद्धतीने शोध घेत आहेत ही माहिती पहिल्यांदा समोर आली जेव्हा त्यांनी लखनऊ येथे सपाच्या कार्यालयासमोर अखिलेश यादव यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
रीता देवी म्हणाल्या, "ते गाडीत बसून निघून गेले. त्यांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही की ही एक महिला आहे आणि व्यथित आहे. आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे. त्यांनी किमान एकदा तरी विचारणा करायला हवी होती."
या घटनेनंतर रिता देवी यांनी लखनऊ पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं आणि त्यानंतर प्रकरणाचा तपास उन्नाव पोलीस स्टेशनला देण्यात आला. मग मुलीचा शोध सुरू झाला.
निवडणूक प्रचारादरम्यान अखिलेश यादव यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, "ज्यांच्याविषयी बोललं जात आहे ते सपाचे मंत्री होते आणि त्यांचा मृत्यू चार वर्षांपूर्वी झाला आहे. पोलिसांनी उत्तर द्यायला हवे की कारवाई करण्यासाठी एवढे दिवस का लागले. आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या पाहिजे."
रजोल सिंह कोण आहेत?
रजोल सिंह दिवंगत सपा नेते फतेह बहादूर सिंह यांचा मुलगा आहे. फतेह बहादूर सिंग हे मुलायम सिंह यादव यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री होते आणि उत्तर प्रदेश सहकारी महासंघाचे अध्यक्ष होते. ते उन्नावच्या सफीपूरचे ब्लॉक प्रमुखही होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.
फतेह बहादूर सिंग यांना आणखी एक मुलगा असून त्याचे नाव अशोक सिंग आहे.
समाजवादी पक्षाचे उन्नाव जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फतेह बहादूर यांच्या मालमत्तेबाबत राजोल सिंह आणि अशोक सिंह या दोन्ही भावांमध्येही चर्चा सुरू आहे.
धर्मेंद्र यादव म्हणतात की, "फतेह बहादूर सिंग यांच्या दोन्ही मुलांचा समाजवादी पक्षाशी काहीही संबंध नाही आणि ते पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाहीत."
या प्रकरणी राजोल सिंह यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
योगींकडून अपेक्षा
रीता देवी म्हणाल्या, "योगी आदित्यनाथ निर्णय घेतील. आम्ही त्यांच्याकडे न्याय मागणार."
परंतु रीता देवी आणि त्यांच्या कुटुंबियांना अनेक प्रयत्न करुनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वेळ मिळालेली नाही.
पीडित मुलीचे वडील मुकेश गौतम यांच्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला तसंच मुख्यमंत्री दरबारातही जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांची भेट होऊ शकली नाही.
मुकेश गौतम म्हणाले, "एक महिन्यापर्यंत आम्ही कोतवालींकडे खेटा मारत होतो. परंतु आमचा एफआयआर नोंदवण्यात आला नाही. म्हणून आम्ही योगी महाराज यांच्या दरबारात गेलो परंतु आचार संहितेमुळे तो सुद्धा बंद होता. आमची भेट होऊ शकली नाही."
शनिवारी (12 फेब्रुवारी) वरिष्ठ वकील आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या सीमा कुशवाहा यांनी उन्नाव पोहचून कुटुंबाची भेट घेतली आणि पीडित कुटुंबाकडून ही केस लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)