अंकुर वारीकू : भारताच्या अस्वस्थ जेन Z ला नेमकं काय हवं आहे?

फोटो स्रोत, Getty Images
भारतातील मध्यमवर्गातील 18 ते 25 वयोगटातील महत्त्वाकांक्षी जेन-Z मधील (जेनरेशन Z)तरुण हे पारंपरिक गोष्टांपासून दूर जात असल्याचं पाहायला मिळत आहे. पण सध्याच्या अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता त्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतील का?
इंटरनेट उद्योजक अंकुर वारीको यांचे यू ट्यूब आणि इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना तरुणांकडून रोज जवळपास 300 ईमेल येतात. ते ज्या तरुणांनी बोलले आहेत, ते त्यांच्या पुर्वजांच्या तुलनेत वेगळे कसे आहेत, याबाबतचं मत त्यांनी इथं मांडलं आहे.
आपण जेव्हा तरुण, मध्यमवर्गीय भारतीयांबाबत विचार करतो तेव्हा आपण मेहनती, अभ्यासू आणि कुटुंबाच्या इच्छा आणि परंपरांप्रती विनम्र असलेल्यांचा विचार करत असतो.
आम्ही कल्पना करतो की तरुण महिला आणि पुरुष स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, ज्यामुळं त्यांना आघाडीच्या इंजिनीअरिंग किंवा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. स्वतःचं एक उत्तम असं करिअर निर्माण करण्याचा आणि पालकांची स्वप्नं पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी घेतलेला असतो.
हे सर्व अगदीच जुन्या पद्धतीचं म्हणजे स्टिरिओटाईप झालं.
अशा अनेक मध्यमवर्गीय तरुणांशी मी पालकांना प्रश्न विचारण्यासंदर्भात, बंड करण्याबाबत किंवा पर्यायीमार्गाची निवड करण्याबद्दल बोललो आहे. पण बहुतांश वेळा त्यांनी तसा विचारच केला नाही. बहुतांश वेळा अगदी वळसा घालून आल्यानंतरही ते त्याच मार्गावर जाण्याबाबत ठाम असतात.
मोठा होत असताना मीही याच लोकांपैकी एक होतो. तसंच माझ्यानंतरचे जे असतील तेही फार काही वेगळे आहेत, असं मला वाटत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ते वेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करतात वेगळ्या प्रकारचे शब्द वापरतात (माझा 22 वर्षीय व्हीडिओ एडिटर म्हणतो नाईस म्हणण्यापेक्षा नॉईस म्हणणं हे अधिक कूल आहे). त्यांना आणखी खूप पुढं जायचं आहे आणि कदाचित लग्न करण्यापूर्वी ते किमान एका तरी रिलेशनशिपमध्ये राहिलेले असतील. पण मला खात्री असेल की, मी आणखी बारकाईनं पाहिलं तर मला नक्कीच असं कोणीतरी आढळेल जो एका स्थिर नोकरीच्या दिशेनं पुढं जात असेल.
पण मी जेव्हा दोन वर्षांपूर्वी यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावर या तरुणांसाठी कंटेंट तयार करायला सुरुवात केली होती, तेव्हा मध्यमवर्गीय तरुण भारतीयांबाबत मला जे काही माहिती होतं, ते माझ्यासाठी आव्हान ठरलं होतं.
मी तयार केलेले व्हीडिओ हे जवळपास 40 लाखांपेक्षा अधिक तरुणांनी पाहिले. त्यापैकी अर्धे हे 18-24 वयोगटातील होते. तर त्यांच्यापैकी 40% तरुण हे भारताबाहेरच्या 10 मोठ्या शहरांमध्ये राहतात.
त्यांना इंग्रजी येते पण मातृभाषेत बोलणं हे त्यांना अधिक आरामदायी वाटतं. रोज मला शेकडो ई-मेल येतात त्यात अर्थविषयक, करिअर, रिलेशनशिपपासून ते मानसिक आरोग्यापर्यंतचे अनेक विषय सुचवलेले असतात.
मी एका 15 वर्षांच्या स्वतःहून शिकलेल्या कोडरबरोबर काम करतो, दुसरा एक कॉलेज ड्रॉपआऊट असलेला तरुण त्याच्या वडिलांना त्यांचा कौटुंबीक व्यवसाय डिजिटल करण्यासाठी मदत करत आहे. एक 24 वर्षांचा पेंटर आहे जो वयाच्या सहाव्या वर्षांपासून पेंटिंग करत आहे, एक फ्रीलान्सर आहे जो कॉलेमधून बाहेर पडून नोकरी केली असती तर जेवढी कमाई असती त्यापेक्षा जवळपास तिप्पट कमाई सध्या करत आहे, तर एक अशी आहे जी दिवसा अकाऊंटंट आणि रात्री बीट बॉक्सर असते (ती अत्यंत चांगली गाते).
एका क्षणाला मला असं वाटतं की, विशीच्या आसपासचे हे तरुण नियमालादेखील अपवाद असतात. पण आता असं वाटतं की, ते याबाहेरचे नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
हे तरुण जगाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतात आणि त्यातलं त्यांचं स्थान याबद्दलच्या काही गोष्टींनी मला धक्का दिला आहे.
कॉलेज म्हणजे फक्त पदवी नाही
या जेन Z गटातल्या तरुणांसाठी कॉलेज म्हणजे केवळ नोकरीसाठीचा एक मार्ग नव्हे. तर ती त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे.
याठिकाणचा अभ्यासक्रम, दिलेल्या परीक्षा आणि वर्गातला अभ्यास यावर ते स्थिर राहत नाहीत. कॉलेज म्हणजे त्यांच्यासाठी प्रयोग करण्याचा आणि नाती जोडण्यासाठीचा जणू एक स्प्रिंगबोर्ड आहे.
याचठिकाणी ते एखाद्या खास स्टार्टअपची सुरुवात करू शकतात किंवा त्याची पाळंमुळं रोवू शकतात, किंवा कोणत्याही आर्थिक ताणाशिवाय ते अनेकप्रकारच्या इंटर्नशिप करू शकतात.
नोकरीसाठी ते उड्या मारत नाहीत
नव्या काळातील हे तरुण कधीही हायस्कूल आणि कॉलेजदरम्यान एका वर्षाचा गॅप घेत नाहीत.
संपूर्ण वर्ष ब्रेक घेणं हे विनाकारण वेळ वाया घालवण्यासारखं आहे. पण मी ज्या 18 वर्षांच्या तरुणांबाबत बोलतो आहे, त्यांच्यामते त्यांना प्रत्यक्षात ते जे नाहीत ते बनण्यात त्यांना वेळ वाया घालवायचा नाही. त्यामुळं त्यांचं ध्येय निश्चित करण्यापूर्वी ते नेमकं काय करू शकतात, याचा अंदाज घेण्यासाठी काही महिने किंवा वर्षाचा वेळ घेऊ शकतात.
लग्न करायचंच असेल तर ते उशिरा करायचं
मी ज्यांच्याशी बोललो त्या विशीच्या आसपासचे जवळपास सगळेच तरुण हे कमिटमेंटला सापळ्यासारखं पाहातात.
त्यांना आयुष्यात याबाबतची घाई नको असते. त्यांच्यासाठी कोणीतरी त्यांचा हात घरून पुढं नेण्याऐवजी स्वतःनं स्वतःला ओळखणं आणि स्वतःच स्वतःचा मालक असणं अधिक महत्त्वाचं असतं.
आर्थिक धोके पत्करतात
यांच्यापैकी बहुतांश तरुणांनी त्यांच्या पालकांना स्थैर्य मिळवण्यासाठी झगडताना पाहिलेलं असलं तरी, सध्याचा काळ वेगळा असल्याची जाणीव त्यांना आहे. सध्या असमानता अधिक आहे, स्वप्नं मोठी आहेत आणि यशाकडं जाणारे मार्गही अनेक आहेत, हे त्यांना माहिती असतं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्यासाठी पैसा हे जीवन जगण्याचं साधन नसून स्वातंत्र्याचं साधन आहे.
उच्चभ्रू वस्तीत मोठा बंगला हे त्यांचं ध्येय नसतं. तर क्रिप्टो आणि शेअर बाजारात गुंतवणुकीनंतर उरलेल्या पैशातून एअर जॉर्डनची जोडी खरेदी करणं त्यांच्यासाठी अधिक आवश्यक असतं.
सोशल मीडिया शिकण्यासाठी आहे
यूट्यूब ही त्यांच्यासाठी शाळा आहे.
पुस्तकातले धडे नेमकं काय शिकवत आहेत, याकडं त्यांचं फारसं लक्ष नसतं. तर इन्स्टाग्रामवर योग्य लोकांना फॉलो करून लवकरात लवकर लोकांकडून अधिक व्यवहार्य ज्ञान मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
त्यांच्यामध्ये काही महत्त्वाकांक्षा आणि धाडस असतं. त्यांच्यामध्ये एक खास गुण आहे, जो त्यांना यापुर्वीच्या सर्व पिढ्यांपासून वेगळा करतो, तो म्हणजे धोका पत्करण्याची भूक.

फोटो स्रोत, Getty Images
मध्यमवर्गीय भारतीयांसाठी धोका पत्करणं हा कायम केवळ एक शब्द राहिलेला आहे.
अगदी माझ्या पालकांच्या पिढीमध्येही स्थैर्य हा महत्त्वाचा मुद्दा होता. दैनंदिव जीवनातील संतुलन, करिअर साध्य करणं, परिणाम या उच्चभ्रू वर्गाकडून देण्यात आलेल्या संज्ञा होत्या.
मात्र, या जेन Z मधील तरुणांना केवळ त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या जागतिक संधींबद्दल माहितीच नाही, तर त्या संधींचा वापर करण्यासाठीही ते मागेपुढे पाहत नाही.
35 व्या वर्षी निवृत्ती मिळवण्याचा मार्ग आहे याची त्यांना जाणीव आहे आणि त्याचा पाठलाग करण्यात त्यांना काही वाटतही नाही. 60 व्या वर्षापर्यंत काबाडकष्ट करण्यास त्यांचा विरोध आहे.
त्यामुळंच पेटीएम या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म या स्टार्ट अपचे संस्थापक विजय शेखर शर्मा किंवा भारतातील सर्वात मोठं हॉटेल नेटवर्क सुरू करून भारतातील तरुण अब्जाधीश बनलेले रितेश अग्रवाल हे सध्या आदर्श बनले आहेत.
पेटीएम नफा कमवत नाही किंवा ओयो कर्जाच्या डोंगराखाली दबल्यामुळं त्यांच्या विस्ताराची गती मंदावली असल्याचं खरं असलं तरी, ती लगेचच काळजी करण्याची बाब नाही.
आम्ही लहानाचे मोठे झालो तेव्हा आम्हाला मनाच्या विरुद्धदेखील अनेकदा वाट पाहावी लागली आहे. आम्ही दूध खरेदी करण्यासाठी रांगेत उभे राहिलो आहोत, एखाद्याला फोन करण्यासाठी अनेक तास वाट पाहिली आहे किंवा पत्र पोहोचण्यासाठी अनेक दिवस थांबलो आहोत. गाडी खरेदी करण्यासाठी अनेक वर्ष थांबलो आहोत आणि आर्थिक स्थैर्यासाठी आयुष्यभर झगडलो आहोत.
आम्हाला आमच्या आवडीनं संयम शिकवण्यात आलेला नाही, तर आपण ज्या पद्धतीच्या भारतात राहतो, त्या संपूर्ण व्यवस्थेनं आपल्याला ते शिकवलं आहे.
आजघडीला आपल्याला पाहिजे असलेलं सर्व काही, म्हणझे अन्न, कपडे, पुस्तकं, चित्रपट, अगदी रिलेशनशिपही एका क्लिकवर उपलब्ध आहे.
जगाचा वेग आणि या जेन Z मधील तरुणांच्या महत्त्वकांक्षा यामुळं त्यांना सर्वकाही लगेचच हवं आहे. मी काही दिवसांपूर्वीच एक ट्विट पाहिलं होतं, "मला सर्वकाही आजच हवं आहे, हीच माझी समस्या आहे," असं त्यात लिहिलेलं होतं.
जेन Z बरोबरची ही सध्याची सगळीकडे समस्या आहे. मात्र, भारतात आपली अर्थव्यवस्था या पिढीच्या महत्त्वकांक्षेपेक्षा विसंगत आहे.
एक तरुण अकाऊंटंट पूर्णवेळ बीटबॉक्सर बनू शकते का? विशीच्या आसपास असलेल्या कलाकाराला ग्राफिक्स डिझाईन फर्ममध्ये जॉब मिळू शकतो का.
ही अस्वस्थ असलेली पिढी आकांक्षा आणि पर्याय यामधलं अंतर भरून काढू शकते का किंवा याच्या मधल्या खाईत ती कोसळून जाईल?
याचं उत्तर काळच देऊ शकतो.
(अंकुर वारीकू हे भारतीय उद्योजक, प्रसिद्ध लेखक, शिक्षक आणि कंटेंट क्रिएटर आहेत.)

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









