Unemployment: तरुणांमध्ये बेरोजगारी का वाढतेय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ऋजुता लुकतुके
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
देशातला तरूण सध्या चिडलाय. अनेक ठिकाणी तरुण आणि पोलिसांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय.
बिहारच्या आरामध्ये चिडलेल्या तरुणांनी ट्रेन पेटवून दिली, जवळच्या गयामध्ये अशाच काही तरुणांनी रेल्वे स्टेशनवर हल्ला झाला, दगडफेक झाली आणि याच संघर्षात एकाचा मृत्यूही झाला.
उत्तर प्रदेशमध्येही गेल्या आठवड्यात रेल्वे भरती परीक्षेदरम्यान तरुणांचा असाच संताप बघायला मिळाला.
पण तरुणांच्या संतापाचा इतका उद्रेक का झालाय? हे असं का होतंय? कारण त्यांच्या हाताला काम नाहीये. त्यातच ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातले बेरोजगारीचे आकडे आता बाहेर आले आहेत.
त्यात देशातल्या बेरोजगारीचं प्रमाण आतापर्यंतचं सर्वाधिक म्हणजे 7.9% वर पोहोचलेलं दिसतंय. देशात ही परिस्थिती का उद्भवलीय, कोव्हिड हे एकटं कारण त्याला आहे का?
देशात बेरोजगारी का वाढतेय?
मागच्या दोन वर्षांत कोव्हिडमुळे अनेकांना नोकरी गमावणं, पगार कपात किंवा असलेल्या नोकरीत अनिश्चितता यांचा सामना करावा लागला आहे.
याचा परिणाम म्हणून 2020 मध्ये तब्बल 3,548 तरुण-तरुणींनी हतबलतेतून आत्महत्याही केल्या.
2020 च्या शेवटच्या तिमाहीसाठी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या राष्ट्रीय संस्थेनं सादर केलेली आकडेवारीच बघा.
देशातला बेरोजगारीचा दर ऑक्टोबर 2020 मध्ये 7 टक्के, नोव्हेंबरमध्ये 7.75% आणि डिसेंबरमध्ये उच्चांकी 7.91% वर पोहोचलाय.

फोटो स्रोत, AFP
यातही शहरी बेरोजगारी 9.30% आणि ग्रामीण बेरोजगारी 7.28% आहे.
ISPOS या जागतिक संस्थेनं केलेल्या 'वर्ल्ड ग्लोबल सर्व्हे'मध्ये 70% भारतीयांनी कोरोना व्हायरसच्या बरोबरीने बेरोजगारी आणि रोजगार सुरक्षितता यांची काळजी वाटत असल्याचा कौल दिला होता.
बांगलादेश (5.3%), व्हिएतनाम (2.3%) आणि मेक्सिको (4.7%) या नुकत्या उदयाला येणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची 2020 मधली कामगिरी रोजगाराच्या बाबतीत खालावलेली आहे यातच सगळं आलं.
जागतिक बँकेचे माजी प्रमुख अर्थतज्ज्ञ कौशिक बासू यांनी बीबीसी बोलताना आपलं निरीक्षण मांडलं आहे.
ते म्हणतात, "1991 मध्ये भारतात आर्थिक मंदी आली होती. रोजगारविषयक समस्याही त्यातून निर्माण झाली. पण, त्यावर्षीच्या आणि मागच्या तीन दशकांच्या तुलनेत देशात आताचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक आहे."
बेरोजगारी वाढण्याची कारणं काय?
देशात अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी नेमकी काय कारणं जबाबदार आहेत?
1) कोरोनाचा उद्रेक
2017 पासून पुढची तीन वर्षं देशात बेरोजगारीचा दर हा ५ ते ६ टक्क्यांमध्ये सिमित होता. आणि तो घटता म्हणजे कमी होणारा होता. पण, कोरोना उद्रेकानंतर २०२० च्या मार्चमध्ये राष्ट्रीय लॉकडाऊन लागलं.

फोटो स्रोत, AFP
आर्थिक घडामोडी आणि व्यवहारांवर बंधनं आली आणि त्याचा थेट फटका रोजगाराला बसला. काही ठिकाणी पगार कपात झाली. तर काही ठिकाणी ऑनलाईन कामाचं प्रमाण वाढल्यामुळे मनुष्यबळाची गरज कमी झाली.
2) ग्रामीण रोजगाराच्या अपुऱ्या संधी
गेली अनेक दशकं भारताला ही सामाजिक समस्या सतावतेय. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा संधी मिळत नाहीत.
गावात असलेले कुटीर उद्योग, लघु उद्योग आणि शेतीशी संबंधित उद्योग अलीकडच्या काळात कमी झाले आहेत
3) बेरोजगारीचं ढिसाळ नियोजन
प्रत्येक देशात बेरोजगारीच्या नियोजनासाठी एक यंत्रणा असते. आणि लोकसंख्या वाढ ज्या प्रमाणात होते त्याप्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी असा एक ठोकताळा असतो. पण, भारतात हे नियोजन पूर्वीपासूनच नीट झालं नसल्याचं अर्थतज्ज्ञ सांगतात.
कोरोना काळात सरकारने मनरेगाची कामं वाढवून ग्रामीण रोजगार देण्यासाठी प्रयत्न केले. पण, सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण वाढवण्याची गरज होती ते झालं नाही. शिवाय या भरती परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळांमुळे उलट तरुणांमध्ये उद्रेक बघायला मिळाला.
आताच्या बेरोजगारीवर उपाय काय?
देशातली बेरोजगारीची स्थिती जी आकड्यातून दिसते, त्याहून काही अंशी जास्त भीषण आहे.
कारण, सर्वेक्षण असं सांगतं की, 98% लोक असंघटित क्षेत्रात किंवा अनियमित स्वरुपात काम करतात. त्यामुळे त्यांना निवृत्तीवेतन, आरोग्यविमा यासारख्या सवलती मिळत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
15 ते 23 वयोगटातल्या तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणजे तरुणांना नवीन संधी मिळत नाहीएत.
नोकरदार वर्गामध्ये स्त्रियांचं प्रमाण अत्यल्प आहे
कोरोना परिस्थितीमुळे बेरोजगारीचा प्रश्न आणखी बिकट झालाय हे उघड आहे. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्राध्यापक मिलिंद आव्हाड यांना बेरोजगारीची समस्या देशात शहरी आणि ग्रामीण भागात एकसारखी आणि सर्वदूर पसरलेली दिसते.
"देशात सध्या तरुण लोकसंख्या जास्त आहे. एक प्रकारचा तरुण शहरात वाढलेला, सोशल मीडिया आणि इतर तंत्रज्ञानामध्ये प्रवीण असा आत्ममग्न, प्रवीण, कुशल भारतीय तरुण आहे. तर दुसऱ्या प्रकारचा तरुण वर्ग ग्रामीण भागातून येतो, ज्याला पुरेशा शिक्षण आणि रोजगाराच्या संधी नाहीत. पण, सध्या या दोन्ही वर्गांमध्ये नैराश्य दिसून येत आहे. कारण, हाताला काम नाही. त्यामुळे अर्थकारणाबरोबरच ही एक सामाजिक समस्याही बनली आहे." प्राध्यापक आव्हाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
याची कारणमीमांसा आणि त्यावरील उपायांविषयी बोलताना व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अभाव आणि भांडवलकेंद्री अर्थव्यवस्था ही प्रमुख कारणं दिसतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या मते,"शेती आणि शेतीतून निर्माण होणारा रोजगार यात व्यावसायिकता आली पाहिजे. तर शहरी भागात औद्योगिक वाढ झपाट्याने होतेय. पण, ती भांडवलकेंद्री आहे. ती जनकेंद्री झाली पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नोकऱ्या जाण्यापेक्षा, तंत्रज्ञान वापरल्यामुळे नवीन प्रकारच्या रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील याचाही अभ्यास झाला पाहिजे."
यासाठी केंद्रसरकारची यंत्रणा कामाला लागली पाहिजे असं आव्हाड यांचं मत आहे. तसंच सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण आधीच कमी होतंय. त्यात नोकरभरतीमध्ये होणारे घोटाळे आणि ढिसाळ कारभार याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
सध्या खरंतर भारताबरोबरच जगातली कोरोनामुळे रोजगाराची स्थिती फारशी बरी नाहीए. पण, भारतात तरुणांची संख्या जास्त आहे. आणि पदवी घेऊन बाहेर पडलेल्यांसाठी पुरेशा संधी मिळत नाहीएत ही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळेच तरुणांमध्ये असंतोष आहे. निवडणुकांच्या निमित्ताने यावर राजकारणही होताना दिसतंय. उत्तर प्रदेशमध्ये रेल्वे स्थानकांवर हल्ला करणारे तरुण हे पाकिस्तानी होते असं विधान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. तर विरोधकांनीही या मुद्यावर सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. पण, या सगळ्यांत तरुणांचा प्रश्न आणि व्यथा अनुत्तरितच राहतेय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








