You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्नाटक हिजाब वाद : आमच्या घरात नाक खुपसू नका, अन्यथा जखमी व्हाल, असदुद्दीन ओवेसींचा पाकिस्तानला इशारा #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. 'आमच्या घरात नाक खुपसू नका, अन्यथा जखमी व्हाल,' ओवेसींचा पाकिस्तानला इशारा
कर्नाटकच्या उडुपीमध्ये मुस्लीम मुलींनी बुरखा किंवा हिजाब घालून येण्यावरून वाद सुरू आहे.
या वादादरम्यान देशभरातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत असताना सीमेपलीकडून पाकिस्ताननेही भारतावर यावरून टीका केली होती. त्याला MIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उत्तर प्रदेशात आयोजित एका प्रचारसभेत ओवेसी बोलत होते.
"मलालावर हल्ला पाकिस्तानमध्येच झाला होता. पाकिस्तानच्या संविधानानुसार कुणी गैरमुस्लीम व्यक्ती तिथला पंतप्रधान होऊ शकत नाही. आम्ही पाकिस्तानच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही इकडे बघू नका. तिकडेच बघा", असं ओवेसी यांनी म्हटलं.
दरम्यान, "आमच्या घरच्या प्रश्नात नाक खुपसू नका, अन्यथा जखमी व्हाल," अशा शब्दांत खासदार असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानाला सुनावलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. मुंबईत स्थापन होणार भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ मुंबईत आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
काल (10 फेब्रुवारी) आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
हे संगीत महाविद्यालय मुंबईतील कलिना कॅम्पससमोर असेल. भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय असं त्याचं नाव असेल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची 3 एकर जागा असून त्याच जागेत हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय उभारण्यात येईल. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
3. संजय राऊत काळजी करू नका, ED तुमची चौकशी कायद्यानुसारच करेल - भातखळकर
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ED आणि इतर तपास संस्थांविरोधात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिल्यानंतर त्याची चर्चा आहे.
या प्रकरणी विविध प्रतिक्रिया येत असताना भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या मुद्द्यावरून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
"संजय राऊत तुम्ही काळजी करू नका, ED तुमची चौकशी कायद्यानुसारच करेल,"असं भातखळकर म्हणाले.
"संजय राऊत यांना आता लोकशाही आठवायला लागली आहे. विरोधकांना मारहाण करून त्याचं निर्लज्ज समर्थन करणाऱ्यांना आता घाम फुटला आहे. ED च्या कारवाईनंतर तुरुंगात जावे लागेल, या भीतीने ते गारठले आहेत," असंही भातखळकर म्हणाले. ही बातमी लोकमतने दिली.
4. पाचही राज्यात भाजपचीच लाट - नरेंद्र मोदी
"उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजपचीच लाट दिसून येईल," असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी बोलत होते. "निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे मी कुठल्याही राज्याचा दौरा करु शकलो नाही. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी काही ठिकाणी जनतेला संबोधित केलं. या सर्व राज्यात भाजप मोठा विजय प्राप्त करेल, असा मला विश्वास आहे," असं मोदींनी म्हटलं.
"ज्या राज्यात सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेलं आम्हाला जोखलं आहे. ते आम्हाला पुन्हा संधी देतील," असंही मोदी म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
5. जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू
जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्यां निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. यासंदर्भात आयोगाने जिल्हा प्रशासनांना 5 फेब्रुवारीपर्यंत प्रारुप रचना तयार करण्याचे आदेश दिले होते.
तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रारुप रचनेसह 9 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासही त्यांनी सांगितलं होतं.
राज्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया आणि नागपूर वगळून राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 284 पंचायत समित्या यांच्या निवडणुका होणार आहेत. प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर पुढील तयारीला आता वेग येणार आहे. ही बातमी अॅग्रोवनने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)