You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अण्णा हजारे : किराणा दुकानातील वाईन विक्रीविरोधातील उपोषण स्थगित, अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर निर्णय
सरकारने वाईन विक्रीच्या धोरणाबद्दल जनतेला विचारून निर्णय घेण्याचे मान्य केल्यामुळे 14 फेब्रुवारीपासून सुरू होणारे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी घेतलाय.
वाईन विक्रीच्या धोरणाविरोधात उपोषण करण्याचं अण्णा हजारेंनी जाहीर केल्यानंतर, सरकारने या मुद्द्यावर चर्चा सुरू केली.
चर्चेवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीत चर्चेतून प्रश्न मार्गी लागू शकतात, असं अण्णा हजारेंनी म्हटलंय.
10 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन सावंत आणि इतर वरिष्ठ अधिकारी अण्णांशी चर्चेसाठी राळेगणला गेले होते. त्यांच्याशी सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाल्याचं अण्णांनी सांगितलं. तसंच, मंत्रालयातील अधिकाऱ्यांशीही अण्णांची फोनवरून चर्चा झाली.
त्यानंतर 10 फेब्रुवारीलाच अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि 11 फेब्रुवारीला अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनीही राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णांशी चर्चा केली.
12 फेब्रुवारीला नाशिक विभागीय पोलीस आयुक्त बी. जी. शेखर यांनीही अण्णांशी चर्चा केली.
अण्णा आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकीत काय ठरलं?
1) किराणा दुकानातून दारूची विक्री करण्यात येणार नाही.
2) वाईन विक्रीच्या नवीन धोरणाचा निर्णय जनतेला विचारून घेण्यात येईल.
3) वाईन विक्रीच्या प्रस्तावित धोरणाच्या निर्णयाला माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देऊन त्यावर जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यात येतील.
4) जनतेच्या सूचना व हरकती मागविण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.
5) नागरिकांच्या सूचना व हरकती आल्यानंतर सरकारकडून त्या विचारात घेऊन यासंबंधी अंतिम निर्णय घेण्यात येईल.
अण्णा हजारे म्हणाले, "वरील मुद्दे सरकारने मान्य केले असून अशा प्रकारचे नागरिकाच्या जीवनावर दुष्पपरिणाम करणारे धोरण ठरवताना ते जनतेला विचारून ठरवावे असा आग्रह शासनाकडे धरण्यात आला. तो शासनाने मान्य केला आहे. तसे लेखी पत्र प्रधान सचिव यांनी दिले आहे. म्हणून आम्ही विश्वास ठेवला आहे. पण त्याचे पालन झाले नाही तर पुन्हा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही."
"आमचे आंदोलन हे कोणत्याही पक्ष-पार्टीच्या विरोधात किंवा व्यक्तीच्या विरोधात नाही. विविध सामाजिक कार्यकर्त्यांशी सातत्याने चर्चा झाली. कार्यकर्ते व ग्रामसभा यांनी या वयात उपोषण न करण्याची आग्रहाची विनंती केली. या सर्व बाबींचा विचार करून खालील निर्णय जाहीर करण्यात येत आहे," असंही अण्णा हजारेंनी स्पष्ट केलं.
अण्णांनी उपोषणाचा दिलेला इशारा
वाईन शॉपप्रमाणेच, सुपरमार्केट आणि किराणा दुकानातही वाईन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात घेतला होता. या निर्णयाबाबत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही याप्रकरणात उडी घेतली होती.
किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा अण्णा हजारेंनी राज्य सरकारला दिला होता.
येत्या 14 फेब्रुवारीपासून या निर्णयाविरुद्ध आपण उपोषणास बसणार आहोत, असं स्मरणपत्र अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं.
या पत्रात अण्णा हजारे म्हणाले होते, "केवळ राज्याचा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचं दिसून येतं. पण या निर्णयामुळे लहान मुले व्यसनाधीन होऊ शकतात. महिलांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, या गोष्टींचा विचार सरकारने केलेला नाही, याची खंत वाटते.
युवा शक्ती ही आपली राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही, असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे, हेसुद्धा आश्चर्यकारक आहे, असं अण्णा पत्रात म्हणाले होते.
यापूर्वी आपणास या विषयावर दोन पत्रे पाठवली आहेत. तसंच लोकायुक्त मसुदा समितीच्या बैठकाही टाळण्यात येत आहेत. त्याबाबतही पत्र पाठवलेलं आहे. आपणाकडून एकाही पत्राचं उत्तर देण्यात आलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या एकाही पत्राला कधीच उत्तर देत नाहीत. पण आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडूनही तसंच घडताना दिसत आहे.
पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांना मी कधीही वैयक्तिक विषयावर पत्र लिहिलेलं नाही. व्यापक हिताच्या सामाजिक प्रश्नांवरच मी पत्र लिहित असतो. तरीही त्याचं उत्तर देणं टाळलं जात असेल तर सरकारला जनतेच्या हिताशी काही देणं-घेणं आहे की नाही, असा प्रश्न उभा राहतो, असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं होतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)