You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमित शहांनी संसदेत ओवेसींना विनंती करत म्हटलं... #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) अमित शहांनी ओवेसींना विनंती केली, कारण...
एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तर प्रदेशात झालेल्या हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल (7 फेब्रुवारी) संसदेत निवेदन दिलं. या निवेदनानंतर अमित शाहांनी ओवेसींना झेड दर्जाची सुरक्षा स्वीकारण्याची विनंतीही केली. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय.
"ओवेसींच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. दोन अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या गोळीबारात कुणीही जखमी नाही. गाडीच्या खालच्या बाजूला तिन्ही गोळ्या लागल्या. या प्रकरणात तीन साक्षीदार असून, गुन्हा दाखल करण्यात आलाय," अशी माहिती अमित शाह यांनी निवेदनाद्वारे दिली.
निवेदन संपल्यानंतर अमित शाह यांनी ओवेसींना उद्देशून म्हटलं की, "माझं निवेदन संपलंय. पण आम्हाला ज्या तोंडी सूचना आल्या, त्याप्रमाणे तुम्ही अजूनही सुरक्षा घेण्यास नकार दिलाय."
"मी या सभागृहाच्या माध्यमातून ओवेसींनी विनंती करू इच्छितो की, त्यांनी तात्काळ सुरक्षा घ्यावी आणि आम्हा सर्वांच्या चिंतेला पूर्णविराम द्यावा," असं अमित शाह म्हणाले.
यूपीतील उत्तर हापूर इथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद महामार्गावर 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अज्ञातांनी ओवेसींच्या गाडीवर गोळीबार केला होता. हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
2) शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका - प्रकाश आंबेडकर
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून राजकारणाला सुरुवात झालीय. मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कात लतादीदींचं स्मारक व्हावं, अशी मागणी भाजपनं केल्यानंतर यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही मत मांडलं आहे. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.
"शिवाजी पार्कवर खेळच खेळले जावेत. स्मारकासाठी इतरही अनेक जागा आहेत, तिथं स्मारक बांधलं जावं," असं मत मांडताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "शिवाजी पार्कची स्मशानभूमी करू नका."
"शिवाजी पार्क हे त्या परिसरातील एकमेव मोठं मैदान आहे, ज्यावर मुलांना खेळता येतं. तिथं शाळा, कॉलेज किंवा इतर मुलांचे सामने होतात. व्यक्तीचं स्मारक करायचं असल्यास इतर अनेक जागा आहेत. परंतु, मुलांना खेळण्यासाठी असलेल्य मैदानांवर अतिक्रमण करावं असं मला वाटत नाही," अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली.
3) 'शिवसेना आणि हाताच्या नादाला लागल्यापासून घड्याळाची वेळ चुकतेय'
विरोधकांना खोचक भाषेत टोले लगावण्याची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भाषणशैली सर्वश्रुत आहे. मात्र, आता त्यांनी सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसलाच या शैलीद्वारे निशाणा बनवलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
झालं असं की, सांगलीत स्वर्गीय गुलाबराव पाटील प्रतिष्ठान आणि सांगली मध्यवर्ती बँकेच्या वतीनं पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ते उशिरा पोहोचले. त्यात राज्यमंत्री विश्वजित कदमही उशिरा पोहोचले. परिणामी कार्यक्रम उशिरा सुरू झाला.
मग जयंत पाटील ज्यावेळी या कार्यक्रमात भाषणाला उभे राहिले, तेव्हा ते म्हणाले, 'शिवसेना' आणि 'हाता'च्या नादाला लागून 'घड्याळा'ची वेळ चुकत आहे.
हे वक्तव्य केल्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
धनुष्यबाण, घड्याळ आणि हात एकत्रित आल्यापासून सांगलीत सहकार क्षेत्रात चांगली ताकद निर्माण झाली असून, लोकांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचंही जयंत पाटील या कार्यक्रमात म्हणाले.
4) 'भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे', ठाण्यातल्या पोस्टर्समुळे चर्चांना उधाण
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांच्या मतदारसंघासह ठाणे जिल्ह्यात अनेक समर्थकांनी पोस्टर्स लावले आहेत. यातील एक पोस्टर मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय.
या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख 'भावी मुख्यमंत्री' असा करण्यात आलाय. एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी हे पोस्टर लावलं आहे.
ठाण्यातील पाचपाखाडी कोपरी हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात सर्वत्र हे पोस्टर दिसून येतायत आणि सर्वत्र याची चर्चाही होताना दिसतेय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
5) धर्मसंसदेतील वक्तव्य हिंदुत्वाचं प्रतिनिधित्व करत नाहीत - मोहन भागवत
हरिद्वारमध्ये पार पडलेल्या धर्मसंसदेत करण्यात आलेली वादग्रस्त वक्तव्या हिंदू विचारसरणीचं प्रतिनिधित्व करत नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
"धर्मसंसदेतून जी वक्तव्यं झाली, ते हिंदूंचे शब्द, हिंदूंचं मन, हिंदूंचे कर्म नाहीत," असं मोहन भागवत म्हणाले. नागपुरातील कार्यक्रमात भागवत बोलत होते.
हरिद्वारमध्ये 17 ते 19 डिसेंबर 2021 दरम्यान झालेल्या धर्मसंसदेत काहीजणांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. महात्मा गांधी यांच्याबद्दल कालिचरण महाराजांनी या धर्मसंसदेतून आक्षेपार्ह विधानं केली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)