You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना शाळा : ज्या मुलांनी कधी शाळेचं तोंडच पाहिलं नाही त्यांचं काय होणार?
- Author, अँड्र्यू क्लेरन्स
- Role, बीबीसी न्यूज, नवी दिल्ली
2019 चा डिसेंबर महिना. आपल्याला काही महिन्यांनंतर शाळेत जाता येणार या कल्पनेनेच सीनू जेबाराज यांची तीन वर्षांची मुलगी आनंदून गेली होती. पण ती शाळेत जाण्याच्यावेळीच भारतामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि तिच्या सगळ्या आनंदावर विरजण पडलं.
नंतर काही काळानंतर लॉकडाऊन मागे घेण्यात आला पण देशभरातल्या शाळा बंदच राहिल्या. काही राज्यांनी शाळा उघडायचा प्रयत्न केलासुद्धा, पण एकापाठोपाठ आलेल्या कोरोना लाटांमुळे त्यात फारसे यश आले नाही.
जेबाराज यांची मुलगी आता पाच वर्षांची झाली आहे. त्यांच्या मुलीला शाळा म्हणजे काय हे समजण्याआधीच झूमवर शिक्षण घ्यावं लागत आहे. अशा झूमवरच्या शिक्षणाचे तिचे 600 हून अधिक दिवस झाले आहेत.
पूर्व प्राथमिक पातळीवरच्या शाळाच बंद झाल्यामुळे भारतात 4.2 कोटी मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. जेबाराज यांची मुलगी त्यांच्यापैकीच एक आहे.
जेबाराज म्हणतात, "तिनं शाळेत जावं, तिथं सामाजिक बंध निर्माण व्हावेत, तिला मित्र-मैत्रिणी असाव्यात असं मला वाटायचं. पण आता तिच्यासाठी मित्र-मैत्रिणी म्हणजे झूमच्या एकेका चौकोनात अडकलेली मुले आहेत."
दिल्लीतल्या शाळा या महिन्यात सुरू होणार आहेत, त्यामुळे आता या मित्र-मैत्रिणींना प्रत्यक्षात पाहाण्याची संधी तिला मिळणार आहे. मुलं प्रत्यक्ष शाळेपासून दूर राहिल्यामुळे शिक्षण प्रक्रियेवर मोठा परिणाम झाल्याचं तज्ज्ञ सांगतात.
शाळा सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणारे साथरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहेरिया यांच्या मते, "एखाद्या मुलाने पहिल्या इयत्तांमधलं शिक्षण नीट मिळवलं नाही, तर त्याचा परिणाम पुढील अनेक इयत्तांवर दिसून येतो."
मूल जितकं लहान तितका दीर्घ परिणाम पुढील शिक्षणावर दिसून येतो असं ते सांगतात.
ज्या मुलांकडे अखंड इंटरनेट आणि लॅपटॉप नाहीत त्यांच्या शिक्षणावर झालेला परिणाम तर अधिकच गंभीर आहे.
दीर्घकाळ शाळा बंद असल्याचा गरीब विद्यार्थ्यांवर घातक परिणाम होणार, असं गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अर्थतज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात म्हटलं आहे.
यात 1400 मुलांचे एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील जवळपास निम्म्या मुलांना फक्त काही शब्द सोडल्यास वाचताच येत नव्हते.
ही एक समस्या असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने ओळखल्याचं दिसतं. पण नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये त्याबद्दल दिलेल्या तोडग्यावर तज्ज्ञ समाधानी नाहीत.
ग्रामीण आणि गरीब गटातील विद्यार्थ्यांना शाळा बंद झाल्यामुऴे मोठा फटका बसल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मान्य केल्याचं दिसतं. अर्थसंकल्पात त्यांनी सरकारतर्फे स्थानिक भाषेतून पूरक शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक वाहिन्यांची संख्या 200 पर्यंत नेण्याचं जाहीर केलं.
पण विजेचा एकदम मर्यादित पुरवठा असणाऱ्या भागातील मुले याचा कसा लाभ घेतील, हे समजलेले नाही.
शिक्षणाशी तुटले नाते...
ज्या मुलांची परिस्थिती चांगली आहे आणि जी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत त्यांच्यासमोरही अनेक प्रश्न आहेत. झूम वर्गांमध्ये लक्ष केंद्रित करणं त्यांना कठीण जात असल्याचं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे.
कोडाईकॅनाल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थी समुपदेशक रुथ मेरी सांगतात, "अनेक मुलांनी कॅमेरा सुरू करणं सोडून दिलंय. ऑनलाईन शिक्षणाशी तुटलेपणाची भावना निर्माण झाल्याचं ते निदर्शक आहे"
विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचीही परिस्थिती काही वेगळी नाही. विद्यार्थ्यांच्या हावभावावरुन त्यांना किती समजलंय हे पूर्वी लक्षात यायचं पण आता त्यांच्यासमोरही प्रश्न निर्माण झाले आहेत, असं मेरी सांगतात.
मालती खावास यांच्या पाच वर्षांच्या मुलाने 2020मध्ये ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात केली. त्यांना अर्धा तास एका जागी बसता यावे यासाठी त्यांच्या शिक्षकांनी प्रयत्न केले.
पण मुलांना अर्ध्या तासासाठी लक्ष एका जागी ठेवणं शक्य नव्हतं, असं मालती सांगतात.
पाच आणि त्यापुढील वयाची मुलं जर इतर मुलं बरोबर असतील तर चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकतात, असं समुपदेशक मारिजा सितार सांगतात.
मारिजा म्हणतात, "सामाजिक कौशल्यं आणि कोणत्या परिस्थितीत काय करावं याचं शिक्षण खेळाच्या वेळेस होत असतं. पण सहअध्यायींपासून दूर घरात एकेकटं राहून हे शक्य होत नाही."
मालती खावास सांगतात, मुलांना सगळे धडे समजावेत यासाठी त्यांचे शिक्षक भरपूर प्रयत्न करतात.
"पण त्याने सामाजिक कौशल्यं, नवे मित्र बनवावेत किंबहुना शिकताना एकाग्र व्हावं असं आम्हाला वाटतं. हे सगळं त्याला शिकता येत नाही."
मुलांनी ऑनलाइन वर्ग करत राहावेत याकडे लक्षही देणं अनेक पालकांना शक्य झाले नाही.
पालकांवर आलेल्या ताणाचा मुलांवर परिणाम होतो असं खावास सांगतात.
"अधिक चांगल्या प्रकारे, रोचक लेखन कसं करावं हे मी योग्य प्रशिक्षणामुळे सांगू शकत नसल्यामुळे माझा पाच वर्षांचा मुलगा रडत असतो", असं मालती सांगतात.
अखेर त्यांनी त्यांच्या शिक्षिका असलेल्या बहिणीची मदत घेतली. पण, अशी मदत सर्वांनाच मिळेल असे नाही, असं मालती संगतात.
आता शाळा सुरू होणार आहेत. ही स्थिती जेबाराज आणि खावास या दोहोंनाही आश्वासक वाटणारी आणि चिंताक्रांतही करणारी आहे.
जेबाराज म्हणतात, "माझ्या मुलीला शाळा एकदम विचित्र गोष्ट वाटणार, तिला तिथं हरवल्यासारखं होणार. या सगळ्याची सवय होईपर्यंत आम्हाला काळजी वाटत राहिल."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)