कोरोनामुळे शाळा सरसकट बंद करण्याला विरोध, कारण...

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"ऑनलाईन अभ्यास होत नाही. अनेक कॉन्सेप्टसुद्धा मुलांना कळत नाहीत. अनेक मुलांना ऑनलाईन लेक्चरमध्ये झोप सुद्धा येते. नियम पाळून काळजी घेऊन ऑफलाईनच शाळा घेतल्या पाहिजेत."

पुण्यातल्या रहिवासी असणाऱ्या डॉ. प्रियदर्शनी निपाणीकर सांगत होत्या. निपाणीकर स्वतः डॉक्टर आहेत. त्यांची मुलगी सध्या आठवीला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिला ऑनलाईनच शिक्षण घ्यावं लागत आहे. त्यामुळे मुलीचा सर्वांगीण विकास होत नाहीये, असं निपाणीकर यांना वाटतं.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या आधी कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. परंतु काही दिवसांमध्येच त्या पुन्हा बंद करण्यात आल्या.

गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे. सातत्याने शाळा बंद असल्याने दोन पिढ्यांच नुकसान झाल्याचं देखील ते सांगतात. त्यामुळे सरसकट शाळा बंद करु नयेत असं त्यांना वाटतं.

ऑनलाईन शिक्षण शहरीभागातील विद्यार्थ्यांना घेणे शक्य आहे. पण राज्यातील दुर्गम भागात जिथे पालकांकडे मोबाईल नाहीत, गावात रेंज नाही अशा भागांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावं लागत आहे. शिक्षण बंद असल्याने असे विद्यार्थी बालमजुरीकडे वळण्याची देखील शक्यता आहे.

सरसकट शाळा बंद करु नयेत असं शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांना वाटतं.

कुलकर्णी म्हणतात, "शहरी - ग्रामीण वेगवेगळा विचार केला पाहिजे. ओमिक्रॉनचा संसर्ग हा खासकरुन शहरी भागात अधिक आहे. ग्रामीण भागात त्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत भागात शाळा सुरु ठेवायला हव्यात. तिथे जर केसेस वाढल्या तर स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला हवा. परंतु मुंबई पुण्याच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला जातोय."

"शाळा बंद ठेवल्या तरी विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था नाही. शासन म्हंटलं होतं दुरदर्शनचा वापर करुन एक चॅनेल सुरु करून प्रत्येक वर्गासाठी कार्यक्रम घेतले जातील परंतु ते करण्यात आलं नाही. पर्याय नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. गेल्या वर्षी स्मार्टफोन नाही म्हणून सहा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे समाजवास्तव आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे राज्याचं धोरण कसंकाय असू शकतं," असा प्रश्न देखील कुलकर्णी उपस्थित करतात.

"सध्या एकत्र कुटुंब पद्धती नसल्याने घरातही मुलं एकटी पडली आहेत. त्यामुळे जास्तवेळ त्यांच्या मोबाईलवर घालवला जातोय. छंद विकसनासाठी काहीही नाही. एका सर्वेनुसार विद्यार्थ्यांची गणित आणि भाषा या विषयांची क्षमता बाधित झाली आहे. ज्या मुलांच लेखन-वाचन घसरतं ती शाळेतून बाहेर पडतात. ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांचे लेखन वाचन घसरेल त्यांची शाळेबाबतची रुची कमी होईल. त्यामुळे विद्यार्थी शाळा कायमची सोडण्याचा धोका वाटतो," असं देखील कुलकर्णी पुढे म्हणतात.

"ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येणं शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था शासनाने करायला हवी" असं शिक्षण क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेले अ. ल. देशमुख यांना वाटतं.

"एखाद्या भागातील मंदिर किंवा ज्यांच्या घरात पुरेसी जागा आहे तेथे 25-30 विद्यार्थ्यांना शिक्षण दिले पाहिजे. मुलं घरीच बसली तर शाळेबद्दल नकारात्मकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. कोरोना कधी जाईल हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळे त्याला जुळवून घेऊन काय करता येईल याचा विचार केला पाहिजे. शिक्षणातलं होणारं नुकसान मोठं आहे. कोरोनाचा सर्वांत वाईट परिणाम शिक्षणावर झाला आहे. पाच दहा वर्षानंतर याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरुवात होईल," असा इशारा देखील देशमुख देतात.

अनेक शिक्षकांना देखील सर्व नियम पाळून शाळा ऑफलाईनच असाव्यात असं वाटतं. सुनीता सपाटे या पुण्यातील भारत इंग्लिश स्कूल या शाळेत शिक्षिका आहेत. ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक अडचणी येतात असं त्या सांगतात.

सुनीता म्हणाल्या, "दोन वर्षांत ऑनलाईन शिक्षणाचा विद्यार्थ्यांना फारसा उपयोग होत नाहीये. विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत परंतु मनाने ते दुसरीकडे कुठेतरी आहेत. ऑनलाईनमध्ये एकतर्फी शिक्षण होतंय, विद्यार्थ्यांना कळतंय की नाही हे शिक्षकांना माहिती पडत नाही. आज अशी परिस्थिती आहे की दहावीच्या विद्यार्थ्यांना स्वतःच नाव देखील नीट लिहीता येत नाहीये. विद्यार्थ्यांच्या बेसिक कॉन्सेप्ट्स क्लिअर नाहीयेत. काळजी घेऊन शाळा सुरु करायला काहीच हरकत नाही. संस्कार रुजविण्यासाठी शाळा सुरु व्हायला हव्यात. इतर गोष्टी सुरु असताना शाळा का बंद ठेवायच्या, असा प्रश्न आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)