You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ई-पासपोर्ट म्हणजे काय? त्यासंदर्भात 10 प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर मिळवा
- Author, अभिनव गोयल
- Role, बीबीसी प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट सुरू करण्याची घोषणा केली आहे. या ई पासपोर्टमुळे परदेशात येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा असतील, असं सांगितलं जात आहे.
पण ई-पासपोर्ट म्हणजे काय आहे, तो कसा वापरता येईल? तसंच आगामी दिवसांत सामान्य पासपोर्टची जागा हा पासपोर्ट कसा घेईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसीनं अनेक तज्ज्ञांशी आणि जे आधीपासूनच ई-पासपोर्टचा वापर करत अशा लोकांशी चर्चा केली आहे.
1. ई-पासपोर्ट काय आहे?
ई-पासपोर्ट सामान्य पासपोर्टसारखाच दिसतो. त्यात इलेक्ट्रॉनिक मायक्रोप्रोसेसर चिपचा वापर केला जातो. ती पासपोर्टच्या कव्हर किंवा पानांवर लावली जाते.
"ई-पासपोर्टमध्ये अर्जदारांची माहिती डिजिटल सहीच्या रुपात चिपमध्ये सुरक्षित ठेवली जाईल," असं राज्यसभेत परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितलं होतं. त्यात पासपोर्ट धारकांशी संबंधित सर्व माहिती होती.
या चिपमध्ये असलेल्या माहितीत बदल करता येऊ शकणार नाही. चिपबरोबर छेडछाड केल्यास ई-पासपोर्ट काम करणं बंद करेल.
2. आधीही जारी झाला होता का ई-पासपोर्ट?
2008 मध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रानं ई-पासपोर्ट जारी करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट राबवला होता. त्या प्रकल्पांतर्गत राजदूत आणि अधिकाऱ्यांसाठी सुमारे 20 हजार ई-पासपोर्ट जारी केले होते.
त्या अनुभवाच्या आधारे आधार राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राला सामान्य नागरिक, अधिकारी आणि राजदूत यांच्यासाठी ई-पासपोर्ट तयार करण्याची आणि लागू करण्याची जबाबदारी दिली होती. या ई पासपोर्टमध्ये कव्हरवर इलेक्ट्रॉनिक चिप लावण्यात आली होती.
3. ई-पासपोर्टमध्ये कशाप्रकारची माहिती असेल?
ई-पासपोर्टसाठी बायोमॅट्रिक, आर्टिफिशियल इंटलिजन्स, चॅटबॉट्स, ऑटो-रिस्पॉन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. पासपोर्टमध्ये फिंगरप्रिंटचा वापर आधीच केलेला असतो.
ई-पासपोर्टमध्ये फिंगरप्रिंटशिवाय डोळ्यांच्या स्कॅनचाही समावेश केला जाईल. आधार कार्ड तयार करताना ज्याप्रकारे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचं स्कॅन केलं जातं, त्याचप्रकारे ही सर्व माहिती चिपमध्ये भरली जाईल. त्यामुळं इमिग्रेशनसाठी लावलेल्या यंत्रांना योग्य व्यक्तीला ओळखण्यात मदत मिळेल.
4. सामान्य पासपोर्टच्या तुलनेत ई-पासपोर्ट कसा काम करतो?
सामान्य पासपोर्टसह तुम्ही एखाद्या देशात प्रवेश केला त्यावेळी त्यावर लिहिलं जातं. ई-पासपोर्टमध्ये ती माहिती इलेक्ट्रॉनिक चिपमध्ये स्टोर असेल.
ई-पासपोर्टधारकानं केव्हा कोणत्या देशात प्रवास केला आहे आणि तो किती वेळ त्या देशात होता हे कोणत्याही कागदी कारवाई शिवाय नोंदवलं जाईल.
5. ई-पासपोर्टमध्ये किती सुविधा?
जेव्हा सामान्य पासपोर्टसह एखाद्या देशात प्रवास केला जातो, तेव्हा सर्वात आधी संबंधित देशाचा व्हिसा घ्यावा लागतो. पासपोर्टवर व्हिसाचा शिक्का मारला जातो.
प्रवासापूर्वी विमानतळावर इमिग्रेशन विभागाचे अधिकारी पासपोर्ट आणि व्हिसाची तपासणी करतात. इमिग्रेशनसाठी अनेकदा लांब रांगा लागलेल्या असतात. अनेक तास लोकांना त्यासाठी वाट पाहावी लागते. त्यानंतर त्यांना प्रवासाची परवानगी मिळते.
ई-पासपोर्टमध्ये इमिग्रेशन पास करण्यासाठी अधिकारी व्यक्तीचा पासपोर्ट आणि व्हिसा तपासत नाहीत. उलट अॅटोमॅटिक मशीनद्वारे त्याची तपासणी होत असते.
ज्याप्रकारे मेट्रोमध्ये टोकन लावताच दार उघडलं जातं, त्याचप्रकारे ई-पासपोर्ट इमिग्रेशन गेटवर स्कॅन केल्यास गेट उघडतं.
6. ई-पासपोर्ट मिळाला तर ई व्हिसाही मिळू शकतो का?
काही देशांमध्ये ही सुविधा आहे. तुम्हाला घरबसल्या ई-पासपोर्टच्या मदतीनं ई-व्हिसा मिळू शकतो. मेटाव्हर्स ब्लॉकचेन सोल्यूशनच्या फाऊंडर प्रिती आहुजा यांच्याकडे ई-पासपोर्ट आहे. त्या घरबसल्याचं ई व्हिसा मिळवतात. ॉजेव्हा एखादा देश ई व्हिसा देतो तेव्हा पासपोर्टमध्ये लागलेल्या इलेक्ट्रॉनिक चिपमध्ये ते अपडेट केलं जातं.
ई-पासपोर्ट धारक इमिग्रेशन गेटवर पोहोचतो तेव्हा त्याठिकाणी लावलेलं मशीन आणि कॅमरा, पासपोर्टमध्ये असलेली चिप स्कॅन करतं. स्कॅन केल्यानंतर गेट उघडलं जातं.
पासपोर्ट धारकाच्या प्रवासाची सर्व माहिती चिपमध्ये नोंदवली जाते. त्यामुळे कॉम्प्युटरवर अनेक वर्ष जुनी माहितीही सहज मिळवली जाऊ शकते. भारत सरकार ई व्हिसा द्यायला कधी सुरुवात करेल हे अद्याप स्पष्ट नाही.
7. इतर देशांचा ई-पासपोर्ट भारतात कसं काम करतो?
सध्या भारतात ई-पासपोर्टमध्ये लावलेली चिप स्कॅन करण्यासाठी इमिग्रेशन गेट नाही. पासपोर्टमध्ये लावलेली चिप भारतात काम करत नाही.
पासपोर्टच्या आत जे कागद असतात त्यावर इमिग्रेशन अधिकारी शिक्का मारतात. त्यानंतर भारतात प्रवेश मिळतो. याचा अर्थ म्हणजे ई-पासपोर्टसाठी सोयीसुविधाही तयार कराव्या लागणार आहेत, असं प्रिती आहुजा सांगतात.
8. कोण तयार करणार ई-पासपोर्ट ?
केंद्र सरकारने नाशिकच्या इंडिया सेक्युरिटी प्रेसला ई-पासपोर्टसाठी इलेक्ट्रॉनिक कॉन्टॅक्टलेस इनलेज आणि ऑपरेटिंग सिस्टीम खरेदी करण्याचं टेंडर दिलं आहे.
नाशिकच्या इंडिया सेक्युरिटीज प्रेस जेव्हा खरेदी प्रक्रिया पूर्ण करेल, त्यानंतरच ई-पासपोर्ट जारी केले जातील.
9. ई-पासपोर्ट देणारे देश किती आहेत?
पासपोर्टला मानक देण्याचं काम इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन करते. ही संघटना संयुक्त राष्ट्रांचाच एक भाग आहे. त्याशिवाय देशांकडे त्यांच्या पद्धतीनं मानकं लागू करण्याचा अधिकार असतो.
सर्व पासपोर्ट हे मशीनमध्ये वाचता येतील असे असावेत, असं 2016 साली ठरलं होतं.
जगातील अनेक देश पासपोर्टचं महत्त्वं वाढवण्यासाठी ई-पासपोर्टचा वापर करतात. आयसीएओनं पासपोर्टमध्ये चिप लावणं म्हणजे ई पासपोर्ट अनिवार्य केलेला नाही.
आयसीएओच्या माहितीनुसार सध्या 100 पेक्षा अधिक देश ई-पासपोर्ट देतात. एका अंदाजानुसार जगात सध्या 45 कोटींपेक्षा अधिक लोकांकडे ई पासपोर्ट आहेत. युरोपच्या बहुतांश देशांमध्ये ई-पासपोर्टच चालतात.
10. ई-पासपोर्टमध्ये घुसखोरी शक्य आहे का?
सायबर तज्ज्ञ पवन दुग्गल यांच्या मते, "ई-पासपोर्ट ऐकायला आणि बोलायला चांगलं वाटतं पण प्रत्यक्षात ई-पासपोर्ट आल्यानंतर सरकारला सायबर सुरक्षेची फार काळजी घ्यावी लागेल. सरकारसाठी हे एखाद्या आव्हानासारखं असेल. ई-पासपोर्टमध्ये घुसखोरी करून माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो.
मेटाव्हर्स ब्लॉकचेन सोल्युशनच्या फाऊंडर प्रिती आहुजा यांच्याकडे ई-पासपोर्ट आहे. "माझ्याकडे 20 वर्षांपासून युकेचा पासपोर्ट आहे. पासपोर्टच्या कव्हरवर एक छोटीसी इलेक्ट्रॉनिक चिप लावलेली आहे, ती दिसत नाही. कव्हर पेजशिवाय आतल्या पानांवरही माझी सर्व माहिती आहे, जी सामान्य पासपोर्टसारखी असते," असं त्या म्हणाल्या.
"सामान्य पासपोर्टप्रमाणेच ई पासपोर्टमध्येही 30 किंवा 60 पानं असतात. मी लंडनमध्ये हिथ्रो विमानतळावर जाते त्यावेळी त्याठिकाणी इमिग्रेशनसाठी ई-पासपोर्टची वेगळी आणि सामान्य पासपोर्टची वेगळी रांग असते. ई-पासपोर्टवाल्यांची रांग ही फार छोटी असते आणि वेगानं पुढं सरकत असते. कारण व्हेरिफिकेशनचं काम मशीन करत असते," असं त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)