महाराष्ट्र पाऊस : अवकाळी पावसावर मात करणारी मस्कत द्राक्ष

- Author, सरफराज सनदी
- Role, बीबीसी मराठीसाठी सांगलीहून
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना सध्या अवकाळी पावसाचा फटका बसलाय.
झाडाला फळ धरतंय न धरतंय तोच अवकाळी पाऊस येतो आणि मोठ्या कष्टाने घेतलेली द्राक्ष शेती हाता-तोंडाशी येऊन वाया जाते. अशी गत गेली काही वर्षं शेतकरी अनुभवतायत.
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष शेतीचंही असंच गेल्या डिसेंबरमध्ये कोट्यवधीचं नुकसान झालं. मात्र तासगावच्या मणेराजुरी येथील पोपट कोरे यांची द्राक्ष बाग संकटाला सुद्धा न जुमानता उभी राहिलीय. कोरे यांनी केलेल्या प्रयोगशील शेतीमुळे ते शक्य झालेलं दिसतंय.
एका बाजूला द्राक्ष शेतकरी लाखोंचं नुकसान सोसत असताना कोरे यांना एका वर्षात डबल नफा मिळालाय.
विशेष म्हणजे कोरे यांच्या पाच एकर द्राक्ष बागेला अवकाळी पावसाचा फटका बसला होता त्यात त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. पण बाजूच्याच शेतात अर्धा एकर क्षेत्रावर केलेल्या मस्कत जातीच्या द्राक्ष पिकावर कोणताही परिणाम झाला नव्हता.
तीन वर्षांमध्ये 21 लाखांचं नुकसान
पोपट कोरे यांची वडिलोपार्जित सात एकर शेती आहे. या शेतात गेल्या तीस वर्षांपासून ते द्राक्षाचं पीक घेतायत. सुपर सोनाक, एस एस एन, आर के आणि अनुष्का सिडलेस अशा वेगवेगळ्या द्राक्षांचं उत्पादन घेतायत. पण गेल्या 3 वर्षांपासून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसारखाच कोरेंना देखील अवकाळी पावसाचा फटका बसतोय.

बीबीसी मराठीशी बोलताना कोरे म्हणाले, "आपल्या अर्ध्या एकर मधल्या द्राक्षबाग शेतीचं अजिबात नुकसान झालं नाही. उलट या द्राक्षाच्या बागेतून अधिकचा नफा मिळतोय. सात एकर क्षेत्रावर लावलेल्या पारंपरिक द्राक्षाच्या पिकाला वर्षातून एकदा हंगाम मिळतो.
पण अवकाळी पावसामुळे त्याचं 60 ते 70 टक्के इतके नुकसान होतंय. उर्वरित उत्पादनातून पिकावर झालेला खर्च फक्त हातात येतो. नफा काही मिळत नाही."
कोरे यांना पारंपरिक द्राक्षाच्या बागेतून एकरी दरवर्षी 5 ते 7 लाख उत्पन्न मिळत होतं. पण गेल्या 3 वर्षांपासून हे गणित बिघडल्याने गेल्या तीन वर्षात एकरी 21 लाखांचे नुकसान झाल्याचं ते सांगतात.
तामिळनाडूची 'मस्कत' द्राक्ष
पण मस्कत युरोपिअन जातीची विकसित केलेली द्राक्ष शेती अधिक फायद्याची ठरली आहे, असं त्याचं मत आहे.

"मी तमिळनाडूच्या एका मित्राकडून मस्कत द्राक्षाच्या कांड्या जानेवारी 2020 मध्ये घेऊन आलो. त्या द्राक्ष कांड्या कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील इंडी इथे एका पॉलिहाऊसमध्ये विकसित करायला दिल्या. तामिळनाडूत जास्त पाऊस असताना ही द्राक्ष तग धरून राहतात त्यामुळे आपल्याकडे प्रयोग करून पाहता येईल, म्हणून मी अर्ध्या एकर शेतात त्याची लागवड केली."
मस्कत जातीच्या 'सिडेड' म्हणजे बियांच्या द्राक्ष लागवडीचा हा प्रयोग आहे. कोरे यांनी शेतात पहिल्यांदा मार्च 2020ला लागवड केल्यानंतर त्याच वर्षी मे-जूनच्या दरम्यान छाटणी घेतली.
त्याचं उत्पादन डिसेंबरच्या अखेरीस आलं. त्यावेळी अवकाळी पावसाचा फटका इतर बागायतीला बसला, पण या द्राक्षांच्या बागेवर फारसा परिणाम झाला नाही.
जांभूळ, करवंद, रेडबेरीची चव
पुढे जानेवारी 2021 मध्ये त्यांनी बागेची दुसरी छाटणी घेतली. त्याचं पीक मे-जून दरम्यान मिळालं. त्यानंतर तिसरी छाटणी ऑगस्टमध्ये घेतली. दुसऱ्या हार्वेस्टिंगमध्ये त्यांना 3 टन आणि तिसऱ्या हार्वेस्टिंगमध्ये 3 टन असं आतापर्यंत 6 टन उत्पादन मिळालंय. तेही अर्ध्या एकर मधून.
त्याच वेळी गारपीट आणि पाऊसही झाला. अगदी नगण्य असा पाच टक्के परिणाम या द्राक्ष बागेवर आणि उत्पादनावर झाल्याचं कोरे सांगतात.

या द्राक्षांची खासियत सांगताना पोपट कोरे माहिती देतात की- "या द्राक्षांची चव नेहमीच्या द्राक्षांपेक्षा वेगळी आहेत. पण चवीला चांगली आहेत. एकाच द्राक्षाच्या घडात जांभूळ, करवंद आणि रेडबेरीच्या फळांची चव मिळते. द्राक्षांच्या बिया औषधी समजल्या जातात."
द्राक्षांच्या बागेत कोणत्याही रायायनिक औषधांची फवारणी करत नसल्याने हे फळ विषमुक्त असल्याचा त्यांचा दावा आहे.
द्राक्षबागांवरचं नैसर्गिक संकट
पोपट कोरे यांनी विकसित केलेल्या द्राक्षांच्या नव्या प्रयोगाकडे सांगली जिल्ह्यात उत्सुकतेने पाहिलं जातंय.
तासगाव तालुक्यातील द्राक्ष तज्ज्ञ आणि सांगली द्राक्ष बागायतदार महासंघाचे माजी संचालक परशुराम एरंडोली सांगतात, "भारतामध्ये सर्वाधिक द्राक्ष उत्पादन महाराष्ट्रात घेतलं जातं. नाशिक आणि सांगली जिल्हा त्यात अग्रेसर आहे. द्राक्षांची शेती करताना सर्वांत मोठा धोका अवकाळी पाऊस, गारपीट आणि कडाक्याच्या थंडीचा असतो. थंडीतल्या दवापासून डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. औषध फवारणीने त्यावर मात करता येते."

"अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष बागांना वाचवणं अशक्य आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील द्राक्षबाग शेतकऱ्यांवर ही नैसर्गिक संकटं वारंवार येत आहेत. त्यामुळे द्राक्षाच्या बागेवर मणीगळ, घडकुज, मणी फुटणे (क्रॅकिंग) असे परिणाम होतात.
पण कोरे यांची द्राक्ष बाग या संकटातही वाचलेली दिसते. द्राक्षाची ही जात सिडेट जंगली वाण आहे. शिवाय कोरे यांनी प्रयोग करून वेगळ्या पद्धतीने ती विकसित केलीये."
पोपट कोरे एका वर्षात दोन वेळा द्राक्षांचं उत्पादन घेतात. बाजारात बारमाही मिळणारी द्राक्ष संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नवी संजीवनी देतील असा त्यांना विश्वास आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








