मराठवाडा पाऊस : अतिवृष्टीतही हे शेतकरी लाखो रुपये कमावत आहेत

शेतकरी शहादेव ढाकणे

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, शेतकरी शहादेव ढाकणे
    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

अतिवृष्टीनं मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पण, असेही काही शेतकरी आहेत ज्यांनी शेतीत नवीन प्रयोग करण्याची 'रिस्क' घेतली आणि आता अतिवृष्टीच्या काळातही ते कमाई करत आहेत.

हा नवा प्रयोग या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील देवगावमध्ये माझी भेट शेतकरी शहादेव ढाकणे यांच्याशी झाली.

त्यांच्या शेतात पोहोचलो तेव्हा ते रेशीम कोषासाठी तयार केलेलं शेड साफ करताना दिसले.

पारंपरिक शेती करणारे शहादेव ढाकणे 2018 मध्ये रेशीम शेतीकडे वळाले आणि आता ते वर्षातल्या जवळपास 9 महिने कमाई करत आहेत.

ढाकणे सध्या 3 एकर क्षेत्रावर रेशीमची शेती करत आहेत.

सुरुवातीच्या दिवसांविषयी त्यांनी सांगितलं, "रेशीम शेतीकडे 2018 पासून वळलो. सुरुवातीला आम्ही कपाशी लावायचो, पण कपाशीत खर्च जास्त आणि उत्पन्न कमी व्हायचं. जवळपास 60 टक्के खर्च व्हायचा, उत्पन्न कमी व्हायचं. त्यानंतर कापसावर बोंडअळी आली, त्यामुळे अजून उत्पन्न घटलं. शेजारच्या गावातील एका शेतकऱ्याची रेशीम शेती पाहिली आणि मग मीही ही शेती करायचं ठरवलं."

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीनं शहादेव यांच्या इतर पिकांचं नुकसान केलंय, मात्र रेशीम शेतीनं त्यांना तारलं आहे.

ते सांगतात, "आमची तूर आणि कपाशी गेलेली आहे. जास्त पावसामुळे पिवळी पडलीय. जो कापूस फुटला होता त्यालापण कोंब आलेले आहेत. रेशीम जंगली पीक आहे. जंगली पीक असल्यामुळे त्याच्यावर पावसाचा काही तेवढा परिणाम होत नाही. याच्या मूळ्या पण सडत नाही. जास्त पाणी झालं तर काही अडचण नाही, कमी पाऊस झाला तरी त्याची मर होत नाही."

रेशीम शेती

गावातील इतर शेतकरी पिकांवर जून महिन्यापासून केवळ खर्च करत असताना शहादेव यांनी गेल्या 3 महिन्यांत जवळपास 2 लाखांची कमाई केली आहे. त्यांच्या रेशीम कोशाची तिसरी बॅच 1 ऑक्टोबरला मार्केटला गेलीय.

"यावर्षी तीन बॅच झालेल्या आहेत. चौथ्या बॅचसाठी एक-दोन दिवसांत अळ्या येणार आहेत. या तीन बॅचमध्ये आम्हाला जवळपास 2 लाखाच्या आसपास उत्पन्न झालंय .

"तिसरी बॅच आता म्हणजे 1 ऑक्टोबरला गेली आहे. औरंगाबादमध्ये एमजेएम येथील रेशीम धागा निर्मिती केंद्रात ती गेली आहे. या बॅचमध्ये खराब कोष वगळता 147 किलो रेशीम कोश निघाला आहे आणि त्याला 415 रुपये प्रतीकिलो इतका दर मिळाला आहे. 62 हजार रुपयांच्या आसपास उत्पन्न यातून मिळालं आहे."

रेशीम शेती

नियोजनबद्ध शेती करत यंदा रेशीम कोषाच्या 9 ते 10 बॅच काढण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे.

"माझ्याकडे तीन एकर रेशीम असल्यामुळे एकदा कटिंग झाल्यानंतर पाला यायला 1 ते 2 महिने लागतात. एक एकरची बॅच काढली की, दुसऱ्या एकरची, दुसऱ्या एकरची काढल्यानंतर तिसऱ्या एकरची. तिसऱ्या एकरची काढल्यानंतर सुरुवातीला जो पाला काढलेला असतो, तो परत येतो. त्यामुळे कंटिन्यू बॅच चालू असती माझी."

अशाप्रकारे शहादेव वर्षातून 9 महिने हमखास कमाई करत आहेत.

शहादेव यांचं वाढलेलं उत्पन्न पाहून आता गावातील 6 ते 7 जण रेशीम शेतीकडे वळले आहेत.

यापैकी एक आहेत शेतकरी सदाशिव गिते. त्यांच्याही रेशीम कोषाची बॅच 1 ऑक्टोबरला विक्रीसाठी गेलीय.

सदाशिव गिते सांगतात, "प्रत्येक महिन्याला आमच्याकडे 250 अंडीपुंज असते आणि आम्हाला दीड, पावणे-दोन क्विंटल रेशीम उत्पादन होतं. 60 ते 65 हजार रुपये याचं महिन्याला उत्पन्न आहे आमचं."

रेशीम शेती

रेशीम शेतीसाठी या दोन्ही शेतकऱ्यांना भरघोस अनुदान मिळालंय. रेशीम शेतीसाठी मजुर असो की कीटक संगोपनासाठी शेड उभारणं, या शेतकऱ्यांनी सरकारी अनुदानाचा लाभ घेतला आहे. इतर शेतकऱ्यांनीही याचा लाभ घ्यायला हवं, असं त्यांचं मत आहे.

रेशीम शेतीसाठी शासनाचं अनुदान

या अनुदानाविषयी महाराष्ट्राच्या रेशीम संचालनालयाचे सहाय्यक संचालक एम. बी. ढवळे सांगतात, "महाराष्ट्र सरकारची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तुती लागवड ही 3 लाख 32 हजार रुपयांची योजना आहे त्यामुळे शासनाकडून मिळालेले पैसे हे मजुरीचे असतात आणि पिकातून निघालेले पैसे हे पूर्णपणे बोनस असतात."

ढवळे पुढे सांगतात, "रेशीम शेतीत मुख्य उत्पादन पाला आहे. पाल्यावर पावसाचा जास्त काही विपरित परिणाम होत नाही. गारपीट झाली आणि गारपिटीनं जरी पाला फाटला, तरी तो हिरवा असल्यामुळे अळ्या खाणार असतात. त्यामुळे पारंपरिक पिकांसारखं यात 100 टक्के असा लॉस होत नाही."

रेशीम शेती

2018-19 मध्ये महाराष्ट्रात 20 हजार एकर क्षेत्रावर रेशीम शेती करण्यात येत होती. पण, त्यानंतर आलेल्या कोव्हिड संकटामुळे रेशीम कोषाचे दर घसरले होते. यंदा राज्यातील रेशीम शेतीचं क्षेत्र सध्या 15 हजार 896 एकरवर आलंय.

असं असलं तरी सध्या मात्र रेशीमला चांगले दर मिळत असल्याचं चित्र आहे.

"रेशीम कोशाला कोव्हिडच्या काळात 180 ते 250 रुपये किलो असा भाव होता. आता मात्र 400 ते 600 रुपये इतका दर मिळत आहे," असं शहादेव सांगतात.

यामुळे मग अतिवृष्टीच्या काळातही उत्पन्न सुरू ठेवण्याची क्षमता लक्षात घेता, शेतकऱ्यांकडे रेशीम शेतीचाही पर्याय असल्याचं ढवळे सांगतात.

'नवे प्रयोग अवलंबवण्याची गरज'

शेतीतल्या नवीन प्रयोगांकडे सकारात्मक पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे, असं मत शेती प्रश्नांचे अभ्यासक दीपक जोशी व्यक्त करतात.

ते सांगतात, "आजची मराठवाड्यातील परिस्थिती अशी आहे की, कापूस, तूर, मका, बाजरी यात आमच्या शेतकऱ्यांचा खर्च होऊन बसला आहे आणि आता उत्पन्न येण्याची आशा नाहीये. पण, या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी आजपर्यंत तीन-तीन बॅचेस घेऊन लाखाहून जास्त रुपये कमावले आहेत.

"यातून कमीतकमी बाकी शेतीचा खर्च तरी निघतोय. त्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी शेतीतल्या नवीन प्रयोगांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे."

दीपक जोशी

फोटो स्रोत, SHRIKANT BANGALE/BBC

फोटो कॅप्शन, दीपक जोशी

यासोबतच तरुणांना रेशीम शेती करायची असेल, तर त्यासाठी अंगी शिस्त बाळगणं गरजेचं आहे, असं मत शेतकरी गिते सांगतात.

ते त्यांचा अनुभव सांगतात, "रेशीम शेती करायची असेल तर ती पूर्ण जीव लावूनच केली पाहिजे. अळ्यांचं संगोपन व्यवस्थित करायचं. असं नको व्हायला की अळ्या आणून टाकल्या आणि मी बाहेर हिंडतोय. अळ्यांना वेळेवर पाला भेटायला हवा. सगळं नियोजनबद्ध प्रमाणात करावं लागतं. तेव्हाच उत्पन्न भेटतं."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)