शेती : तीन एकरांत पिवळं सोनं पिकवत लाखोंचं उत्पन्न घेणारा शेतकरी

बीड, प्रवीण जगताप, झेंडू, शेती, शेतकरी

फोटो स्रोत, Praveen jagtap

फोटो कॅप्शन, शेतकरी प्रवीण जगताप
    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठीसाठी

झेंडूची फुलं म्हटलं की आपल्याला आठवतो दसऱ्याचा काळ. शेतकरीही याकाळात त्याचं मोठं उत्पन्न घेतात. पण शक्यतो मातीमोल भावानंच या फुलांची विक्री होते. पण केवळ दसऱ्यात नव्हे तर इतर वेळीही झेंडूची शेती लाखोंचं उत्पन्न देणारी ठरू शकते, याचं उदाहरण असलेल्या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा आपण पाहणार आहोत.

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातील सावरगावचे शेतकरी प्रवीण जगताप यांनी झेंडू फुलशेतीच्या माध्यमातून मोठं उत्पन्न मिळवणं शक्य असल्याचं सिद्ध केलं आहे.

माजलगाव रस्त्यावर अगदी महामार्गाला लागूनच प्रवीण यांची जवळपास 7 एकर शेती आहे. त्याठिकाणी 3 एकर शेतीमध्ये त्यांनी झेंडूच्या फुलाची लागवड करत लाखोंचं उत्पन्न मिळवलं आहे.

नैसर्गिक आपत्ती, बाजारात होणारी पिळवणूक यामुळं शेतीपासून दुरावत चालेलल्या शेतकऱ्यांसाठी प्रवीण यांची ही यशोगाथा प्रेरणा देणारी अशी ठरू शकते.

सुरुवातीपासून शेतीचीच आवड

प्रवीण जगताप हे तरुण शेतकरी आहेत. बारावीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. मात्र शेतीची आवड असल्यामुळं त्यांनी बारावीनंतर थेट शेतीच करायची असा निर्णय घेतला.

सात एकर शेतीमध्ये सुरुवातीला प्रवीण यांनी वेगवेगळी पिकं घेऊन पाहिली. त्यात पारंपरिक पिकांचाही समावेश होता. पण नंतर त्यांनी झेंडू फुलशेतीचा प्रयोग केला.

बीड, प्रवीण जगताप, झेंडू, शेती, शेतकरी

फोटो स्रोत, Praveen Jagtap

यावर्षी तर त्यांनी 3 एकरामध्ये झेंडूची ही लागवड केली असून त्यांना त्यातून चागलं उत्पन्न मिळालं आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शेतीमध्ये झेंडुंचं उत्पन्न घेत असल्याचं ते सांगतात. तसंच गट शेतीच्या माध्यमातून काही शेतकरी मिळून अशा प्रकारची पिकं या भागात घेतली जात आहेत, असं प्रवीण जगताप यांनी सांगतलं.

कमी पाणी भरपूर उत्पन्न

झेंडूच्या फुलांना दसऱ्याला प्रचंड महत्त्वं असतं. त्यामुळं या काळात त्याचं मोठं उत्पन्न घेतलं जातं. मात्र झेंडूच्या पिकासाठी सर्वांत चांगला काळ हा सप्टेंबरनंतर असतो, असं प्रवीण जगताप सांगतात.

सप्टेंबर महिन्यात लागवड केल्यास झेंडूंचं उत्पन्न चांगलं मिळतं आणि बाजारातून चांगली मागणीही असते, त्यामुळं झेंडू हे केवळ दसऱ्याचं नव्हे तर वर्षभराचं पिक असल्याचं ते म्हणाले.

बीड, प्रवीण जगताप, झेंडू, शेती, शेतकरी

फोटो स्रोत, Praveen Jagtap

"झेंडूच्या पिकासाठी फार जास्त प्रमाणात पाण्याची आवश्यकता नसते. मध्यम पाणी असेल आणि त्यात ठिबकसारखी व्यवस्था असेल तर चांगलं उत्पन्न घेता येतं."

प्रामुख्यानं फुल फुगवण्यासाठी या पिकाला जास्त पाणी लागतं. म्हणजे तोडा झाल्यानंतर (फुलं तोडल्यानंतर) पुढच्या तोड्यासाठी फुलं तयार होण्यासाठी त्याला पाणी द्यावं लागतं.

झेंडु फुलांच्या पिकाचं नियोजन

प्रवीण जगताप यांनी 15 सप्टेंबरला झेंडूची लागवड केली. हे चार महिन्यांचं पिक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी तीन एकरमध्ये लागवड केली. एका एकरात दहा हजार अशा तीस हजार रोपांची त्यांनी याठिकाणी लागवड केली आहे.

मार्तंड जातीचं रोपं प्रवीण जगताप यांनी याठिकाणी लावले आहेत.

बीड, प्रवीण जगताप, झेंडू, शेती, शेतकरी

फोटो स्रोत, Praveen Jagtap

"झेंडूवर भुरी आणि करप्या अशा रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळं साधारणपणे आठ दिवसांना औषध फवारणी करावी लागते. तसंच तोडा झाल्यानंतरही फवारणी करावी लागते," असं ते सांगतात.

ठिबकच्या माध्यमातूनही झाडाला औषध देत असल्याचं प्रवीण जगताप म्हणाले. साधारणपणे लागवडीनंतर सव्वा महिना म्हणजे 40-45 दिवसांत उत्पन्न मिळायला सुरुवात होते.

दर आठ दिवसांनी फुलांचा तोडा घ्यावा लागतो. अशा प्रकारे आठ ते दहा तोडे निघतात असं जगताप यांनी सांगितलं.

एकरी एक लाख खर्च, तीन लाख उत्पन्न

प्रवीण तीन वर्षांपासून झेंडूची शेती करत आहेत. यापूर्वी दोन वर्ष झेंडूच्या फुलाला सरासरी 40-50 रुपये असा भाव होता. तेव्हाही चार महिन्यांच्या या पिकात एकरी साधारणपणे सर्व खर्च वजा करता एक लाखांचा फायदा झाल्याचं ते सांगतात.

तीन एकरात लागवड असल्याने त्यांना गेली दोन वर्ष साधारणपणे अडीत तीन लाखांचा फायदा होत होता.

मात्र यावर्षी विक्रमी 100-120 रुपये किलो, तर काही तोड्यांना 140 पर्यंत भाव मिळाला. त्यामुळं यावर्षी त्यांच्या उत्पन्नाचा आकडा वाढला आहे.

हैदराबाद आणि कल्याण याठिकाणी झेंडूच्या या फुलांना बाजारपेठ असल्याचं ते सांगतात. मात्र त्यांची फुलं हैदराबादलाच विक्रीसाठी जातात. सध्या या फुलांना 100 ते 120 रुपये प्रति किलो असा सर्वाधिक भाव मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.

बीड, प्रवीण जगताप, झेंडू, शेती, शेतकरी

फोटो स्रोत, Praveen Jagtap

तीन एकरात आतापर्यंत सहा ते सात लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. तर आणखी अंदाजे पाच लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. म्हणजे एकूण 10 ते 12 लाखांच उत्पन्न अपेक्षित असल्याचं जगताप म्हणाले.

लागवड, औषध फवारणी, तोडणी अशा सर्वासाठी झेंडू पिकाला एका एकरला अंदाजे एक लाखापर्यंत खर्च येतो. तर त्यातून सरासरी तीन लाख उत्पन्न मिळतं, असं त्यांचं मत आहे.

त्यातही हे पिक चार महिन्यांत निघतं. त्यामुळं या पिकानंतर या शेतीममध्ये मिरची, खरबूज अशी पिकं घेऊनही ते उत्पन्न काढत असतात.

'शेती बांधावरून करता येत नाही'

प्रवीण जगताप यांनी बारावीनंतर लगेचच शेती सुरू केली कारण त्यांना याची मनापासून आवड होती. मात्र, केवळ आवड असल्यानं काहीही होत नाही, तर त्याबरोबर तुमची शेतीत घाम गाळायची तयारी असायला हवी असं ते सांगतात.

"बांधावर उभं राहून किंवा घरून शेती करणं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष काम करावंच लागतं. तसं करायची तयारी असेल तर, कमी जमीनं किंवा हवामान या गोष्टींवर किंवा समस्यांवरही मात करता येते," असं प्रवीण जगताप म्हणाले.

बीड, प्रवीण जगताप, झेंडू, शेती, शेतकरी

फोटो स्रोत, Praveen Jagtap

तुम्ही शेती करताना विचारपूर्वक आणि नियोजन करून उत्पन्न घेणं गरजेचं आहे. तसं केलं तर शेती ही कधीही शेतकऱ्याचं नुकसान होऊ देत नाही, असा मंत्र हा तरुण शेतकरी सगळ्यांना देत आहे.

'आकड्यांनी हुरळून जाऊ नका'

शेतीमध्ये होत असलेले अशा प्रकारचे प्रयोग हे अत्यंत महत्त्वाचे आणि स्वागतार्ह आहेत. मात्र त्यामध्ये सातत्य असणं अत्यंत गरजेचं आहे, असं मत शेती प्रश्नांचे अभ्यासक दीपक जोशी यांनी बीबीसी मराठीबरोबर बोलताना व्यक्त केलं.

"एक वर्ष उत्पन्न आलं पण त्यात पुढे सातत्य आहे का, अशाप्रकारचे प्रयोग सुरू आहेत का, हे पाहणं कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे," असंही जोशी यांनी म्हटलं.

"अशा प्रकारचे मोठे आकडे पाहून तरुण त्याकडे आकर्षित होतात. सगळ्यांनाच असं यश मिळेलच असं नाही. त्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा अभ्यास करून अशा प्रकारचे प्रयोग करायला हवेत.

"उत्पन्नाला महत्त्वं न देता किंवा आकडे पाहून हुरळून जाण्याऐवजी प्रयोग करत राहणं गरजेचं आहे. त्यातून कृषी श्रेत्राला मोठा फायदा मिळू शकतो," असंही जोशी यांनी म्हटलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)