महाराष्ट्रात गाढवं चोरीला का जात आहेत?

    • Author, शाहीद शेख
    • Role, बीबीसी मराठीसाठी

बीडच्या परळी भागातून जवळपास सव्वाशे गाढवं चोरीला गेली. या घटनेला 3 महिने उलटून गेले आहेत. पण अजूनही हरवलेल्या गाढवांचा तपास लागलेला नाही. याचा मोठा फटका वीटभट्टी कामगारांच्या जगण्याला बसलाय. वीटभट्ट्यांवर गाढवांचा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

अमोल मोरे गेली 15 वर्षं परळीत वेगवेगळ्या वीटभट्ट्यांवर संपूर्ण कुटुंबासह काम करतात. त्यांच्या कुटुंबाचं पोट या गाढवांवर अवलंबून असल्याने त्यांना आता वीटभट्टीचं काम करणं जड जातंय.

अमोल यांनी गाढवांसाठी वीटभट्टी मालकाकडून 2 लाख रुपये उचल घेतली होती. "माझ्याकडे 13 गाढवं होती त्यातली 10 गाढवं चोरीला गेली. आता तीन गाढवांवर काम करणं शक्य नाही. आणि नवीन गाढवं घेणंही शक्य नाही. मालकाकडून अ‍ॅडव्हान्स घेतला तोही आता संपलाय."

अमोल सांगतात, "जून ते ऑक्टोबरच्या दरम्यान गाढवांची जवळपासच्या भागात भटकंती सुरू असते. त्यांची रात्रंदिवस देखरेख करणं शक्य नसतं".

जेव्हा हंगामाच्या आधी गाढवांना गोळा करून वीटभट्टीवर आणायला सुरुवात झाली तेव्हा आपली गाढवं हरवली आहेत असं अमोल यांच्यासारख्या कामगारांच्या लक्षात आलं.

अमोल मोरे यांनी गाढवांच्या चोरीची तक्रार परळी पोलीस ठाण्यात ऑक्टोबरमध्ये दाखल केली.

गाढवांसाठी 2 लाखांचं कर्ज

वीटभट्टीवरचं काम दिवाळीपासून साधारण जूनपर्यंत सात ते आठ महिने चालतं. विटा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो.

"जिथे ट्रॅक्टर किंवा कोणतंही वाहन जात नाही तिथे गाढवं रेती-खडी उचलायला उपयोगी पडतात. पण आम्ही भट्टीवर कामाला लावतो."

एका गाढवाची किंमत 20 ते 25 हजार सांगितली जाते. अमोल यांनी 2 लाखाचं कर्ज घेऊन गाढवं खरेदी केली होती. गाढवांच्या चोरीनंतर अमोल यांच्या सहा जणांच्या कुटुंबाचं रोजचं आयुष्य पार बदलून गेलंय. आई-वडील, पत्नी दोन लहान मुली सगळेजण वीटभट्टीवरच राहतायत.

आता वीटभट्टीतलं काम पाच पटीने वाढलंय आणि कामाची गती मंदावलीये असं ते सांगतात.

"पूर्वी 15-16 हजार माल उचलला जायता तो आता गाढवांच्या अभावी केवळ 5-6 हजार उचलला जातोय. आता तर घरातल्यांनाच माल डोक्यावर उचलून वाहावा लागतो."

'चोरीमुळे वर्षाची कमाईच गेली'

अमोल यांनी आधीच कर्ज घेतलं होतं त्यामुळे नवी गाढवं घेणं त्यांना परवडणारं नाही. पण सोलापूरहून हंगामी स्थलांतर करणाऱ्या सुनील जाधव यांनी नव्या गाढवांसाठी 60 हजाराचं कर्ज काढलं. "आम्ही लोकांकडून व्याजाने 60 हजाराचं कर्ज घेतलं. महिन्याला जमेल तसे हफ्ते द्यावे लागतात. वर्षभरात नाही फेडले तर त्याचं व्याज वाढेल. गाढवं चोरीला गेली तरी कसंही करून ती नवी विकत घ्यावीच लागतात."

वीटभट्टयांवर काम करणाऱ्या सहा जणांच्या संपूर्ण कुटुंबाची वर्षभराची कमाई साधारण 5 लाख असते. ही रक्कम त्यांना उचल वगळून रोज जसं काम भरेल त्यानुसार मिळते. त्यावरच त्यांचा दैनंदिन खर्च अवलंबून असतो. "पुढल्या वर्षी वीटभट्टी मालकाकडून उचल घेतली की लोकांचं उरलेलं कर्ज फेडून टाकायचं. त्यामुळे हे वर्ष फुकट काम केल्यासारखंच आहे. काहीच कमाई होणार नाही."

गाढवांचं मालकीपत्र असतं?

परळी शहराचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे यांनी लोकांच्या तक्रारी दाखल करून घेत गाढवांचा तपास चालू असल्याचं म्हटलंय. पण तक्रारदारांकडे गाढवांचं मालकीपत्र नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय.

गाढवांच्या मालकीपत्राविषयी काहीच माहित नसल्याचं अमोल यांच्यासारख्या कामगारांचं म्हणणं आहे. अमोल निरक्षर आहेत. ते सांगतात- "आम्ही जेव्हा पोलीस स्टेशन ला गेलो तेव्हा कळलं कि आम्हाला गाढवाचा दाखला लागेल, याआधी गाढव खरेदीला कधीच कुणी दाखल दिला नाही आणि कोणी मागितलाही नाही. दाखला हा प्रकार कळल्यानंतर आता आम्ही गाढव खरेदी केल्यावर त्याच्यासोबत फोटो काढून घेत आहोत. आम्ही अशिक्षित आहोत. त्यामुळे दाखला काय असतो ते समजत नाही. म्हणून आम्ही आता फोटो काढून घेतो."

भारतात अनेक ठिकाणी गाढवांची चोरी होण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काही ठराविक जातीच्या गाढविणीचं दूध गुणकारक असल्याने जास्त किंमतीला विकलं जातं. त्यामुळे या गाढवांची तस्करी केली गेली का असा संशय व्यक्त करण्यात आला होता. पण परळीतून चोरीला गेलेल्या या गाढवांचा दूधासाठी फारसा उपयोग नसल्याचं गाढवांच्या मालकांचं म्हणणं आहे.

कामाचा ऐन हंगाम सुरू होत असताना दिमतीला असणारी गाढवं हरवली आणि ही गरीब कुटुंब हवालदिल झाली. आधीच हातावर पोट असलेली ही माणसं आता कर्जाच्या नव्या ओझ्यामुळे पुरती वाकली जातायत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)