ST Strike : 'एसटीच्या 80 कर्मचाऱ्यांचा जीव गेलाय, सरकारला अजून किती बळी हवेत?'

एसटी संप

फोटो स्रोत, Nitin nagarkar/bbc

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून

"आंदोलनातल्या ज्या कर्मचाऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे, ते कर्मचारी आता वेगवेगळी कामं करतायेत. कोणी भाजी विकतायेत, कोणी मोलमजुरी करत आहेत. वाढदिवस येतील जातील, पण हा आयुष्याचा लढा आहे. हा शेवटचा लढा आहे. त्यामुळे आजही मी या आंदोलनात आलो."

पुण्यातल्या स्वारगेट एसटी स्थानकात आंदोलनाला बसलेले प्रवीण वणवे सांगत होते. वणवे यांचा वाढदिवस होता. सकाळी औक्षण झाल्यानंतर ते पुन्हा आंदोलनस्थळी येऊन बसले होते.

विलिनीकरण आणि इतर मागण्यांसाठी साधारण गेल्या 3 महिन्यांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. या 3 महिन्यात अनेक घडामोडी घडल्या. सरकारने काही मागण्या मान्य केल्या पण विलनीकरणाच्या मागणीवर तोडगा निघू शकलेला नाही.

विलनीकरणाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं आंदोलक कर्मचाऱ्यांच म्हणणं आहे.

स्वारगेट

फोटो स्रोत, Nitin nagarkar/bbc

सुरुवातीला या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली होती. सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर दोघांनी आंदोलनातून माघार घेतली. त्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची न्यायालयीन लढाई लढवली. असं असलं तरी विलनीकरणाच्या मुद्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही.

आंदोलनाची सध्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही स्वारगेट एसटी स्थानकात गेलो. एसटी स्थानकाच्या गेट बाहेर काही कर्मचारी आंदोलन करत होते. स्वारगेट एसटी आगारातील 380 कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यातील काही कर्मचारी आता कामावर रुजू झाले परंतु साधारण 320 कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत.

या सगळ्या आंदोलनाच्या काळात स्वारगेट आगारातील 28 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं तर 10 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

आंदोलन स्थळी साधारण 50 ते 60 आंदोलक होते. काही आंदोलकांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने काही कर्मचारी भाजी विकतायेत, काही गवंडी काम करतायेत तर काही रिक्षा चालवू लागले आहेत.

एसटी संप

फोटो स्रोत, Nitin nagarkar/bbc

निलेश पोटफोडे गेल्या अनेक वर्षांपासून एसटीमध्ये वाहक म्हणून काम करतात. ते विलनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत.

पोटफोडे म्हणाले, "गेल्या 3 महिन्यात ज्या वाटाघाटी झाल्या त्या फक्त आंदोलन मोडण्यासाठी झाल्या. तुम्ही कामावर या एवढंच सरकार सांगतं, पण विलनीकरण करण्याची सरकारची तयारी नाही. आंदोलन सुरू झालं तेव्हा 22 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. आज ती संख्या ऐंशीवर जाऊन पोहचली आहे. अजून किती बळी गेले की सरकारला जाग येणार आहे? सरकारला जाग येईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही."

"जे कर्मचारी कामावर रुजू झाले त्यांची द्विधा मनस्थिती करून त्यांना रुजू करून घेतलं आहे. वास्तविक त्यांनाही विलनीकरण हवंच आहे," असंही पोटफोडे सांगतात.

"विलनीकरणाची प्रक्रियेला वेळ लागत असेल तर एक जी आर काढून जर विलनीकरणाचं आश्वासन दिलं आणि कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेतली तर कामगार कामावर जायला तयार होईल," असं आंदोलक कर्मचारी युवराज बनसोडे म्हणतात.

एसटी संप

फोटो स्रोत, Nitin Nagarkar/BBC

तर , सरकार संविधानातील आर्टिकल 12 चं उल्लंघन करत आहे. सरकार त्याच्या कर्तव्यापासून दूर जात आहे. आता कर्मचाऱ्यांना सुद्धा कायदे कळत आहेत त्यामुळे त्यांच्या न्याय हक्कासाठी ते स्वतः लढत आहेत. भीती दाखवून सरकार कर्मचाऱ्यांना रुजू करून घेत आहे. पण कर्मचाऱ्यांना संविधान आणि न्यायालयावर विश्वास आहे. त्यामुळे संविधानावर विश्वास ठेवून जोपर्यंत विलनीकरण होत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही." असं एसटी कर्मचारी प्रकाश निंबाळकर यांचं म्हणणं आहे.

एसटी कर्मचारी कामावर रुजू होत नसल्याने खासगी ट्रॅव्हल्स आणि वाहतुकदारांना एसटी स्थानकाच्या आतून प्रवासी घेण्याची परवानगी राज्य सारकरडून देण्यात आली होती. एसटी स्थानकाच्या आतून प्रवासी नेणार असतील तर काही दर ठरवून देण्यात आले होते.

स्वारगेट स्थानकातून एसटी बसेस सोबतच खासगी वाहतूकदार देखील प्रवासी घेत होते. तर दुसरीकडे आंदोलनस्थळी बसून कर्मचारी विलनीकरणाच्या घोषणा देत होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)