टिपू सुलतान यांची तलवार भारतात परतणार, कोण होते टिपू सुलतान

फोटो स्रोत, Thinkstock
- Author, इम्रान कुरेशी
- Role, बेंगलुरूहून, बीबीसी मराठीसाठी
ब्रिटनच्या ग्लासगो संग्रहालयात असलेल्या काही मौल्यवान भारतीय वस्तू परत देण्याची तयारी ब्रिटनने दाखवली आहे. यामध्ये टिपू सुल्तान यांची तलवार देखील आहे. टिपू सुल्तान यांची तलवार भारतात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
टिपू सुलतान कोण होते त्यांचं इतिहासात काय स्थान होतं आणि त्यांच्यावरून नेमका काय वाद निर्माण झाला होता याविषयी जानेवारी 2022 मध्ये हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता तो पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
टिपू सुल्तान यांच्यावरून याआधी अनेक वेळा वाद निर्माण झाले आहे. जानेवारीत मुंबईतील एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. पण पेशवे आणि टिपू सुलतान तसंच त्यांचे पिता हैदर अली यांच्यात झालेल्या लढाईच्या इतिहासामुळे, टिपू सुलतान यांच्या मूळ राज्यातील ( कर्नाटक) इतिहासकारांना या वादाबाबत फारसं आश्चर्य वाटत नाही.
18 व्या शतकामध्ये ब्रिटिंशांच्या विरोधात लढताना रणांगणावर मृत्यू स्वीकारलेल्या या भारतीय शासकाला होणारा हा विरोध ऐतिहासक ज्ञानामुळे नव्हे, तर त्यांच्याबाबत लोकांना आवडणारी जी विरोधी माहिती पसरली आहे, त्यामुळे होत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर टिपू सुलतान यांच्या विरोधात निर्माण झालेली वैर भावना पाहता, त्यांचं नाव अधिकृतपणे एखाद्या मैदानाला देणं ही राजकीयदृष्ट्या चुकीची भूमिका आहे, असं किमान एका इतिहासकाराला तरी पटलं आहे.
"महाराष्ट्रातील लोकांना कदाचित टिपू सुलतान राष्ट्रीय नायक होते हे माहिती नसेल, कारण 19 व्या शतकापर्यंत भारतीय अस्मिताच अस्तित्वात नव्हती. त्या काळामध्ये प्रामुख्यानं मराठा, बंगाली किंवा म्हैसूर अशा प्रकारची सर्वांची स्वतंत्र ओळख होती," असं म्हैसूर विद्यापीठातील टिपू अध्यासन केंद्राचे माजी प्राध्यापक सबास्टियन जोसेफ यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

पण इतिहासकारांना सर्वाधिक खटकणारी बाब म्हणजे, दक्षिण भारतातील सर्वांत निर्दयी आक्रमणकर्ता असं टिपू सुलतान यांचं इतिहासातलं वर्णन.
"ते आक्रमणकर्ते नव्हते. ते दुसरे कुठून आलेले नव्हते. भारतातील इतर बहुतांश शासकांपेक्षा अधिक ते या मातीत रुजलेले होते. आक्रमणकर्ते म्हणून त्यांचं वर्णन होणं, म्हणजे त्यांची पूर्णपणे चुकीची ओळख आहे," असं जेएनयूच्या इतिहास विषयाच्या निवृत्त प्राध्यापिका जानकी नायर यांनी म्हटलं.
"टिपू सुलतान हे ब्रिटिश, मराठा आणि निजाम यांच्या संयुक्त सैन्याच्या विरोधात लढलेले देशभक्त होते. ते देशाचे सर्वांत मोठे शत्रू होते, हा त्यांच्या विरोधातील प्रचार केवळ पूर्वग्रहांवर आधारित आहे," असं इतिहासकार प्राध्यापक एनव्ही नरसिंहय्या यांनी म्हटलं.
टिपू आणि पेशवे
"ज्यांना इतिहास माहिती नाही, तेच केवळ टिपू सुलतान यांचा द्वेष करतात. टिपू सुलतान यांच्या विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिश आणि मराठ्यांशी हातमिळवणी करणाऱ्या हैदराबादच्या निजामाबद्दल मात्र तसं बोललं जात नाही," असंही प्राध्यापक नरसिंहय्या म्हणाले.

फोटो स्रोत, BBC World Service
त्यांनी यासाठी शृंगेरी मठाचं उदाहरण दिलं. या मठाच्या स्वामींना पेशवा रघुनाथ राव पटवर्धन यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी करकाला इथं पळून जावं लागलं होतं. "पेशव्यांच्या सैनिकांनी मंदिरावर छापा टाकला. येथील सर्व दागिने घेतले आणि देवाची विटंबना केली," असं ते म्हणाले.
"पेशव्यांच्या सैन्यानं लुटल्यानंतर टिपू सुल्तान यांनी पुन्हा मंदिरातलं सर्वकाही पूर्ववत केलं. त्यांनी आपल्या राज्यातील लोकांना आशीर्वाद द्यावे अशी विनंती करणारी अनेक पत्रंही धार्मिक नेत्यांना लिहिली. इतर अनेक मंदिरांमध्येही त्यांनी अशी कामं केली. त्यात नंजुंदेश्वर मंदिराचा समावेश होता. हकीम नंजुंदा यांच्या डोळ्यावर याठिकाणी उपचार झाले होते म्हणून त्यांनी याचं तसं वर्णन केलं," असं प्राध्यापक नरसिंहय्या म्हणाले.
टिपू सुलतान यांनी मेल्कोट, कोल्लूर मुकांबिका या मंदिरांसह इतर मंदिरांना संरक्षण दिलं याच्या नोंदी सरकारी दस्तऐवजांमध्येही आहेत.

फोटो स्रोत, CHRISTIES
"युद्धांचा विचार करता मराठेही मागे नव्हते. आजही मराठा बंगालला पोहोचले होते, त्याच्या आठवणी भीतीदायक आहेत. पण हे सर्व 18 व्या शतकातील शासक होते, ते सर्वच स्वैर होते," असं प्राध्यापिका नायर म्हणाल्या.
"पण सध्या भूतकाळाचा वापर हा इतिहास समजून घेण्यासाठी न करता पूर्वग्रह निर्माण करण्यासाठी केला जात आहे," असं त्या म्हणाल्या.
टिपू सुलतान 'हिंदूविरोधी' होते?
"त्यांच्याबाबत आता छळ आणि बळजबरी धर्मांतर करणारे ही प्रतिमा आहे. पण 18 व्या शतकातील संबंध हे अशाच प्रकारचे होते. त्यांच्या व्यक्तीमत्तवाबद्दच्या माहितीत अनेक बदल झाले आहेत," असं जानकी नायर यांनी म्हटलं.
सर्वप्रथम ब्रिटिशांनी त्यांचं वर्णन जुलमी असं केलं. पण ते ब्रिटिशांशी लढले आणि रणांगणावर त्यांना मृत्यू आला. पण नंतर ही सर्व माहिती मिटवण्यात आली.
"याचं कारण म्हणजे ते मुस्लीम होते आणि इतर राज्यकर्त्यांप्रमाणेच तेही शत्रूला निर्दयीपणे संपवत होते. शिवाय आकडेवारी वाढवून सांगितली जात असली तरी, त्यांनी धर्मांतरही करायला लावलं होतं. पण हिंदुबहुल असलेल्या देशात मोठया प्रमाणावर धर्मांतर करून त्यांना राज्य चालवता आलं नसतं," असंही नायर म्हणाल्या.

फोटो स्रोत, BONHAMS
उलट टिपू सुलतान यांच्या सैन्यात सहा वेगवेगळ्या तुकड्या होत्या. त्यांच्या सैन्यात मराठा आणि राजपूत यांच्याही दोन तुकड्या होत्या. त्यांनी वेगवेगळ्या समाजांमध्ये भेद न करता सर्वांना समान मोबदला दिला, असं प्राध्यापिका नायर सांगतात.
1960-70 च्या दशकामध्ये इतिहासकार टिपू सुलतान यांच्या आर्थिक, कृषीविषयक विकास कार्यक्रम, रेशीम उद्योग याचा अभ्यास करत होते. ते प्रचंड नावीन्यपूर्ण होतं, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
आधीच्या एका मुलाखतीत बेंगळुरू येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडिजचे प्राध्यापक नरेंदर पानी यांनी त्यांच्या कर्नाटकातील भूमी कायद्याबाबत 'रिफॉर्म्स टू प्री-एम्प्ट चेंजेस' चा दाखला देत माहिती दिली आहे.

"टिपू यांच्या काळात जमीन थेट शेतकऱ्याला भाडे तत्वावर दिली जात होती. वंशपरंपरागत पद्धतीनं ती दिली जात होती आणि सर्वांना जमीन मिळायची. पण मलबारमध्ये यात अपयश आलं कारण मोठ्या जमीनदारांची वेगळी पद्धत होती," असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं.
टिपू सुलतान यांच्यानंतर ब्रिटिशांनीही टिपू सुलतान यांचं कृषीधोरण स्वीकारलं आणि रयतवारी पद्धत सुरू केली. लॉर्ड कॉर्नवालिस यांची जमीनदारी पद्धत म्हैसूरमध्ये टिकली नाही, कारण टिपू सुलतान यांनी इथं वेगळी पद्धत आधीच विकसित केली होती.
प्राध्यापिका नायर यांच्या मते, 1980च्या अखेरीस टिपू सुलतान यांच्या विरोधात संतापाची लाट उसळण्यास सुरुवात झाली.
"प्रामुख्यानं दोन प्रकारच्या कथा समोर आल्या. त्यातली एक म्हणजे तथाकथित धर्मांतराची आणि कन्नड भाषेला प्रोत्साहन न देण्याची. मंदिरांची नासधूस हादेखील मुद्दा होता. हे संपूर्ण संमिश्र असं चित्र आहे. कारण त्यांनी मंदिरांना मदत केल्याचे अनेक पुरावे आहेत."
"अगदी उजव्या विचारसरणीचे इतिहासकार म्हणून ओळखले जाणारे सूर्यकांत कामत यांनीही त्यांच्या ऐतिहासिक लिखाणामध्ये टिपू सुलतान यांना योग्य स्थान दिलं आहे. पण गेल्या दोन दशकांत बरंच काही बदललं आहे," असं नायर सांगतात.
नेमकं काय बदललं?
इतिहासकारांच्या मते गेल्या काही दशकांत झालेल्या संशोधनानुसार नेमका इतिहास आणि लोकांचा याबाबतचा सार्वजनिक समज यात स्पष्टपणे विसंगती आहे. त्याची विविध कारण असल्याचं ते सांगतात.

फोटो स्रोत, DD NEWS
"टिपू सुलतान यांचं व्यक्तीमत्त्वं संमिश्र प्रकारचं आणि गुंतागुंतीचं आहे. दुर्दैवानं ऐतिहासिक दृष्टीकोनातून त्यांच्याबद्दल चांगल्या बाबी सांगणं म्हणजे देशच्या विरोधातील आहे असा दृष्टीकोन निर्माण होत असल्याच्या परिस्थितीत आपण सध्या आहोत. मात्र, त्याचवेळी नासाकडे टिपू सुलतान याचं एक छायाचित्र आहे. कारण रॉकेट क्षेत्रात त्यांनी मोलाचं काम केलं असून ते जे तंत्रज्ञान विकसित करत होते, तेच नंतर ब्रिटिशांनी चोरलं," असं जानकी नायर यांनी सांगितलं.
प्राध्यापक सबास्टियन जोसेफ यांच्या मते, "नवीन राजकीय परिस्थितीत टिपू सुलतान यांच्या देशाचे नायक या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या नव्या नायकांच्या प्रतिमांची निर्मिती करण्यासाठी हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. खऱ्या राष्ट्रीय नायकांना खाली खेचण्याचा हा प्रयत्न आहे."
"मुंबईतील खेळाचं मैदान किंवा बागेच्या वादाचा इतिहासात नेमकं काय घडलं याच्याशी काहीही संबंध नाही. माझ्या मते टिपू सुल्तान हे सध्या मुस्लीमांच्या काही विचारांना विरोध करण्याचं प्रतिक बनले आहेत. तर दुसरीकडे मुस्लीम हे टिपू सुलतानला अभिमानाचं प्रतिक मानू लागले आहेत," असं जानकी नायर यांनी म्हटलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








