You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर प्रदेश निवडणूक : दहशत पसरवणारी भटकी गाईगुरं मतं 'खाऊन' टाकतील?
- Author, नितीन श्रीवास्तव,
- Role, बीबीसी प्रतिनिधी
गेल्यावर्षी नोव्हेंबरमधील एक संध्याकाळ. 55 वर्षीय रामराज त्यांच्या शेतातल्या घराच्या पाठीमागे एका प्लास्टिकच्या खुर्चीवर बसले होते आणि पिकाची देखभाल करत होते.
अचानक शेजारच्या उसाच्या शेतातून आलेल्या एका भटक्या वळूनं त्यांच्यावर हल्ला केला.
वळूनं पहिली धडक रामराज यांच्या पाठीवर मारल्यानं ते जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांचा चेहरा आणि पोटाला धडका दिल्या.
रामराज यांची सून अनिता कुमारी सांगतात की, "त्यांचे सर्व दात तुटले होते. पोट आणि हातालाही जखम झाली होती. छातीवरही दुखापत झाली होती. नंतर त्यांना शवविच्छेदनगृहात घेऊन गेले. त्यांचा शरीर पाहवत नव्हतं."
या दुर्दैवी घटनेनंतर रामराज यांच्या पत्नी निर्मला यांनी खाणं-पिणं सोडलं. पलंगावर पडून त्या पतीच्या नावानं हाका मारत असतात.
पतीच्या निधनाचा धक्का बसलेल्या निर्मला आता फार काळ जगणार नसल्याची भीती आता त्यांच्या कुटुंबीयाना सतावत आहे.
उत्तर प्रदेशमधील अयोध्या जिल्ह्यात घडलेली ही घटना काही पहिलीच नाही. उत्तर प्रदेशच्या जवळपास सर्व जिल्ह्यात भाकड आणि भटक्या जनावरांनी शेतकऱ्यांना, विशेषत: छोट्या शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणलंय. ही जनावरं शेतीचं नुकसान करतातच, सोबत माणसांच्या जीवावरही उठलेत.
चिरौंधपूरचे रहिवासी 37 वर्षीय भूपेंद्र दुबे दिल्लीत नोकरी करत होते आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये ते घरी गेले.
23 जून 2020 रोजी संध्याकाळी दीड वर्षांच्या मुलासाठी टॉफी आणण्यासाठी ते गावाजवळील बाजारात गेले होते. तिथं त्यांच्यावर वळूनं हल्ला केला.
या दिवसाची आठवण काढल्यावर त्यांची पत्नी पूनम देवी आजही थरथर कापतात.
"मीच म्हटलं होतं की, घरात सामान संपत आलंय. तर म्हणाले, मुलाला टॉफी आणायचीय, तर सामानही घेऊन येतो. मग मी त्यांना पावणे नऊ वाजता फोन केला, पाच मिनिटात घरी पोहोचतो असं म्हणाले. त्यानंतर त्यांच्याशी माझं बोलणंच झालं नाही," असं सांगत असताना पूनम रडू लागल्या.
काही मिनिटांनंतर मी त्यांना विचारलं, आता घर कसं चालतं?
पूनम दुबेंनी सांगितलं की, "कसं चालतं म्हणजे, माझे वडील आहेत. खाण्या-पिण्याची व्यवस्था तेच करतात. तसंच चाललंय घर. दुसरं कुणी नाहीय आमच्याकडं पाहणारा."
या सर्व घटनांना नीट समजून घेण्यासाठी आपल्याला 2017 मध्ये जावं लागेल.
उत्तर प्रदेशमध्ये 15 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं आणि योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागली.
सत्तेत आल्यानंतर काही महिन्यातच त्यांनी काही मोठे निर्णय घेतले, ज्यात उत्तर प्रदेशातील हजारो अवैध कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेतला.
एका जाहीर सभेत बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, "उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखाने बंद करून, गोवंश तस्करीला राज्यात पूर्णपणे बंद करणारं हे पहिल सरकार आहे. जी व्यक्ती उत्तर प्रदेशात आहे, तिने गोहत्येचा विचार सोडा, गाईशी वाईट वागेल त्याची जागा तुरुंगात असेल."
अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या निर्णयानंतर कथित गोमांस खाणं आणि गाईंच्या तस्करीच्या नावानं अनेक हिंसक घटनाही उत्तर प्रदेशात घडल्या.
पोलीस ठाण्यात गोवंश तस्करीच्या तक्रारी वाढल्या आणि मुजफ्फरनगर, अलिगढ, बलरामपूर, बाराबांकी, हमीरपूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये गोहत्येची प्रकरणंही नोंदवली गेली.
पश्चिम उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात तर 2018 साली कथित गोहत्या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांची एका हिंसक जमावाच्या झटापटीत गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.
त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या रस्त्यांवर भटक्या आणि भाकड जनावरांची संख्या दिवसागणिक वाढत जात होती.
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊपासून काही तासांच्या अंतरावरील मिलकीपूर भागातल्या सिंधौरा मौजामध्ये शिव पूजन यांची भेट झाली. बसमधून ते उतरत होते, त्यांचं एक हात वैद्यकीय पट्ट्यांनी बांधलं होतं आणि त्यातून रक्त बाहेर येतानाही दिसत होतं.
त्यांनी सांगितलं की, "चार दिवसांपूर्वी दुपारी शेतात शिरलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी गेलो होतो. तर ती जनावरंच माझ्यावर धावत आली. मग तिथून मी पळ काढला. तिथं तारेचं कुंपण होतं. मी पळण्याचा प्रयत्न करत होतो. हात तिथल्या तारेत अडकलं. कसंतरी करून तिथून पळून, जीव वाचवला."
राजकारण आणि भाकड जनावरं
भारतात जवळपास 20 कोटी भाकड जनावरं आहेत. यातील सर्वाधिक जनावरं उत्तर प्रदेशात आहेत.
सरकारी आकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं की, देशातील भाकड, भटक्या जनावरांची संख्या कमी होऊन 50 लाखांपर्यंत पोहोचलीय. मात्र, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये भाकड आणि भटक्या जनावरांची संख्या 15 टक्क्यांनी वाढलीय.
उत्तर प्रदेशची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय आणि सर्व राजकीय पक्ष आपापले दावे करत आहेत. या सगळ्यात गाईचा मुद्दाही केंद्रस्थानी आहे.
उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचारादरम्यान भाषणात नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं की, "गाय काही लोकांसाठी गुन्हा ठरू शकतो, पण आमच्यासाठी गाय माता आहे, पूजनीय आहे. गाय-म्हशीची मस्करी करणारे लोक हे विसरतात की, देशातील आठ कोटी कुटुंबं अशाच पशुधनावर चालतात."
दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा दावा आहे की, भाजपच्या धोरणांमुळे उत्तर प्रदेशात लाखो भाकड जनावरांनी शेतकऱ्यांचे स्वप्नं उधळून लावले आहेत.
काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांना वाटतं की, गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारनं केवळ अडचणी वाढवल्या आहेत, काम काहीच केलं नाही.
उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या दृष्टीने भाकड आणि भटक्या जनावरांचा मुद्दा महत्वाचा ठरतो.
सुल्तानपूर-अयोध्या जिल्ह्याच्या सीमेवर राहणारे शेतकरी दीनानाथ यादव यांचं मत आहे की, "याआधी आमच्या शेताचं नुकसान केवळ नीलगाईमुळे होत असे. आता ही समस्या तिप्पट झालीय. कारण ज्या गाईंनी दूध देणं बंद केलंय, ज्या गाई-बैलांचं वय झालंय, त्यांची देखभाल करण्याची शेतकऱ्याची ना क्षमता आहे, ना ताकद."
त्यांनी सांगितलं की, "जर कुणावर मोठं संकट येत असे, कुणी आजारी पडत असे किंवा कुणी मृत्युमुखी पडत असे, तर घरातलं गाई किंवा बैल विकलं जायचं आणि घर चालवलं जायचं. आज स्थिती अशी आहे की, त्या जनावरांना कुणीच विचारत नाहीय. घरात एखादी टाकाऊ वस्तू असावी तसं या जनावरांचं झालंय."
गेल्या काही वर्षात भाकड जनावरांची वाढीमुळे शेतकऱ्यांना दिवसा त्रस्त केलंय. हल्ली रात्रीही भाकड जनावरांची भीती शेतकऱ्यांना सतावते. कारण रात्रीही पिकांमध्ये ही जानावरं शिरण्याची भीती असते.
आम्हाला अशी शेकडो शेतं दिसली, जिथं शेतकऱ्यांनी रात्री पिकांचं देखभाल करण्यासाठी पाच ते आठ फूट उंच माच बांधलेत.
सुल्तानपूर आणि अयोध्येतील दोन गावातल्या शेतकऱ्यांसोबत रात्रीच्या वेळेस आम्ही शेतावर गेलो आणि ही समस्या याची देही याची डोळा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
बहुतांश शेतांवर वीज पोहोचली नाहीय. त्यात साप चावण्याच्या घटना तर नेहमीच्या झाल्यात.
त्यामुळे हातात टॉर्च घेऊन शेताची राखण करणाऱ्या शेतकऱ्यांचे गट जागोजागी दिसतात. काही तास उलटल्यानंतर शेतकऱ्यांचा दुसरा गट राखण करण्यासाठी येतो आणि मग आधीचा गट झोपण्यासाठी परततो. असं आळीपाळीनं रात्रभर हे शेतकरी शेतीची राखण करतात.
या सर्व गोष्टींमुळे बरेच शेतकरी नाराज आहेत. 64 वर्षीय बिमला कुमारी रात्रभर शेतीची राखण करत होत्या.
त्या सांगतात, "आमच्याकडे पर्याय नाही. जी भाकड जनावरं रात्री पीक खायला येतात, ती सर्व जवळपासच्या गावांमधूनच सोडलेली आहेत. या जनावरांना माहीत असतं, शेतात शिरायला कुठून रस्ता आहे आणि पळायला कुठून रस्ता आहे."
मोठं शहर असो वा छोटं गाव असो, उत्तर प्रदेशात भाकड जनावरांची दहशत यापूर्वी क्वचितच कधी पाहायला मिळाली असेल. पाळीव प्राणी रस्त्यावर आल्यानंतर हिंस्र सुद्दा होतात.
उत्तर प्रदेश सरकारनं दीड वर्षांपूर्वी गोहत्या कायदा कठोर करत 10 वर्षांपर्यंत शिक्षा निश्चित केली होती.
सरकारचं म्हणणं आहे की, उत्तर प्रदेशात 5 हजार 300 हून अधिक गो-आश्रय आहेत, ज्यात लाखो गाईगुरांना ठेवण्यात आलंय, यात बहुतांश भाकड जनावरं आहेत.
मात्र, उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजप सरकारचे प्रवक्ते समीर सिंह यांना हे सर्व मान्य नाही.
समीर सिंह म्हणतात की, "तुम्ही त्यांना भटकी जनावरं म्हणून नका. त्यांना गोवंश म्हटलं जाऊ शकतं. जर एखादी गाय काल आपल्याला दूध देत होती आणि आज देत नाहीय, तर आपण तिला हाकलून लावू शखत नाही. सरकारनं यासाठी धोरण तयार केलं आहे. यापुढेही यासाठीची धोरणं तयार केली जातील. आता ही थोडी समस्या दिसतेय, तर त्यावर उपायही शोधले जातील."
मात्र, तळागाळातल्या शेतकऱ्याचं दु:ख काहीतरी वेगळंच आहे.
मिल्कीपूरचे राजेश कुमार हे खरंतर त्यांच्या चायनीज स्टॉलसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, ते शेतीही करतात.
ते आम्हाला सांगत होते की, "आठवड्याला किंवा पंधरा दिवसात एक-दोन दिवस दुकान बंद करून मी शेतात जातो. तिथे तार-दोऱ्या बांधून गाईगुरांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आठवड्याभरानं जाऊन पाहावं लागतं. त्यासाठी दुकान बंद ठेवावं लागतं. याचा फटका बसतो. पण दुसरं काही करूही शकत नाही."
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच आदेश दिले होते की, बाहेर फिरणाऱ्या गाईगुरांसाठी गो-आश्रयाची संख्या वाढवली जावी. मात्र, वाटतं तितकं सोपं नाहीय.
गो-आश्रम आणि सरकारी गोशाळा समजून घेण्यासाठी आम्ही अयोध्येतील हरिंगटनगंच्या शाहाबाद गावातल्या 'बृहद् गो संरक्षण केंद्रा'त गेलो. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आम्ही तिथं पोहोचलो. भल्या मोठ्या या गोशाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप होतं.
तिथं गेल्यावर कळलं की, इथं राहणारी व्यक्ती जेवणाच्या सुट्टीवर गेलाय. थोड्या वेळानं सरपंच शत्रुघ्न तिवारी तिथे आले.
ही गोशाळा सरपंच शत्रुघ्न तिवारी यांच्या देखरेखीत चालते. त्यांच्या माहितीनुसार, "पूर्ण भागात जेवढ्या गोशाळा आहेत, त्या पुरेशा आहेत. या गोशाळेत दोनशे गाई-गुरं आहेत. एवढीच या गोशाळेची क्षमता आहे. मात्र, या भागात सातशे ते हजार गाईगुरं भटकतायेत."
भटक्या गाईगुरांच्या मुद्द्याचा उत्तर प्रदेशात मतांवर किती परिणाम होईल, याचा येत्या निवडणुकीतून कळेलच. मात्र, काही कुटुंब असे आहेत, ज्यांना या समस्येचं समाधान होणं अशक्य वाटतंय.
80 वर्षाच्या राम कली मिश्रा गेल्या दोन वर्षांपासून कोमात आहेत. पलंगावर पडून असतात. त्यांच्यावरही एका भटक्या वळूने हल्ला केला होता. मात्र, राम कली हे कोमात असल्यानं त्यांना हेही माहित नाही की, त्यांच्या मुलाचं कोरोनानं निधन झालंय.
अशा कुटुंबांसाठी निवडणुकीतून काही चांगलं घडू शकतं, यावरचा विश्वासही उडलाय आणि निवडणुकीतला रसही संपलाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)