You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विराट कोहलीनंतर 'हे' खेळाडू आहेत कसोटी कर्णधारपदाचे दावेदार
- Author, मनोज चतुर्वेदी
- Role, क्रीडा पत्रकार
विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता सर्वांत मोठा प्रश्न पुढचा कसोटी कर्णधार कोण असेल? हा आहे.
बीसीसीआय आणि निवड समितीने ज्यापद्धतीने रोहित शर्माला एकदिवसीय सामन्यांसाठी कर्णधार आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या कसोटी संघाचा उपकर्णधार बनवलं, त्यावरुन बीसीसीआयच्या भविष्यातील योजनांमध्ये रोहितचा विचार होऊ शकतो, हे वाटतंय.
रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवल्यानंतर कोणाला हा अंदाज नव्हता की, विराट तडकाफडकी कर्णधारपदावरुन पायउतार होईल. त्यामुळे आता परिस्थिती बदलली आहे. नवीन परिस्थितीत केएल राहुल आणि ऋषभ पंत कर्णधारपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.
बीसीसीआयला कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 सामन्यांसाठी वेगवेगळे कर्णधार नेमायचे आहेत की विराट कोहलीप्रमाणे तिन्ही प्रकारांसाठी एकच कर्णधार नेमायचा आहे, यावरही खूप गोष्टी अवलंबून आहेत. शिवाय बीसीसीआय या समस्येवर तात्कालिक तोडगा काढू इच्छिते की भविष्याचा विचार करून निर्णय घेणार हाही प्रश्न आहे.
रोहित शर्माला मिळू शकते पहिली पसंती
रोहित शर्माकडे कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. त्याने पाच वेळा मुंबई इंडियन्सला चँपियन बनवलं आहे. त्याशिवाय विराटच्या अनुपस्थितीत त्याने टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचंही यशस्वी नेतृत्व केलं आहे.
रोहितनं 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं आहे. त्यांपैकी आठ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 22 टी-20 सामने खेळले असून 18 सामन्यात विजय मिळवला आहे, तर केवळ चार सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.
2019 मध्ये कसोटी संघात सलामीच्या फलंदाजाची भूमिका निभावताना रोहितनं उत्तम कामगिरी केली होती. ही बाब त्याच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात त्यानं 58.48च्या सरासरीनं धावा केल्या होत्या.
अर्थात, दुखापती आणि तिन्ही प्रकारच्या सामन्यांचं कर्णधारपद दिल्यांनतर वाढणारा ताण या गोष्टी रोहितसाठी थोड्या अडचणीच्या ठरू शकतात.
दुखापतीच्या कारणामुळेच रोहित दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नव्हता. याआधीही त्याला दुखापतींमुळे काही सामन्यांना मुकावं लागलं होतं.
त्यामुळेच जर बीसीसीआय तत्कालिक निर्णय न घेता भविष्याचा विचार करत असेल तर कसोटी कर्णधारपदासाठी रोहित शर्मा हा त्यांच्या योजनांचा भाग असण्याची शक्यता कमी आहे.
अजून एक कारण म्हणजे सध्या रोहित शर्मा 35 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याची कारकीर्द आता फार मोठी नसेल. अशापरिस्थितीत संघाचं नेतृत्व एखाद्या युवा खेळाडूकडे दिलं जाऊ शकतं.
राहुलला मिळू शकते नेतृत्वाची संधी?
केएल राहुलला 2019 मध्ये कसोटी संघातून वगळण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये संघात पुनरागमन झाल्यानंतर त्याने मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं आहे. त्यामुळेच राहुलकडेही कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात आहे.
राहुलने इंग्लंड दौऱ्यावर असताना लॉर्ड्स कसोटीत तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सेंचुरियन कसोटीमध्ये शतक झळकवून आपलं स्थान अधिक मजबूत केलं होतं. कदाचित त्यामुळे विराट अनफिट असताना जोहान्सबर्ग कसोटीत राहुलला नेतृत्वाची संधी मिळाली.
केएल राहुलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळण्याचा अधिक अनुभव नाहीये. मात्र त्याने आयपीएलमध्ये किंग्ज 11 पंजाबचं नेतृत्व केलं आहे. रोहितच्या अनुपस्थिती तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचंही नेतृत्व करणार आहे.
अर्थात, जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात नेतृत्व करताना त्याच्याकडून काही चुकाही झाल्या, ज्यामुळे भारताला विजय मिळू शकला नाही.
ऋषभ पंतला गावस्कर यांचा पाठिंबा
सुनील गावस्कर ऋषभ पंतला कसोटी कर्णधार बनविण्यासाठी अनुकूल आहेत. त्यांच्या मते जबाबदारीच्या जाणीवेमुळे पंत अधिक चांगला क्रिकेटपटू बनू शकतो.
ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीमध्ये कठीण परिस्थितीत शतक ठोकत आपल्यात संघर्ष करण्याची क्षमता असल्याचं दाखवून दिलं. त्याची हीच क्षमता कर्णधारपदासाठी उपयुक्त ठरू शकते.
गेल्या आयपीएलच्या सीझनमध्ये ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचं यशस्वी नेतृत्व केलं होतं. त्यावेळी त्याला प्रशिक्षक रिकी पाँटिंगकडून खूप काही शिकायला मिळालं होतं.
ऋषभ पंतला याशिवाय नेतृत्वाचा अनुभव नाहीये आणि हीच त्याच्यादृष्टिने कमकुवत बाजू असू शकते.
सध्या तो 24 वर्षांचा आहे. मात्र भारतात इतक्या कमी वयात कोणाला कर्णधारपदाची जबाबदारीच दिली नाही, असं नव्हतं. मन्सूर अली खान पटौदी हे वयाच्या 21 व्या वर्षी कर्णधार झाले होते आणि सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक होते.
कधीकाळी अजिंक्य रहाणे हा विराटला पर्याय होता...
टीम इंडियाच्या मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अजिंक्य रहाणेनी एक कर्णधार म्हणून ब्रिस्बेन कसोटी जिंकत भारताला मालिकेत विजय मिळवून दिला होता. त्यानंतर रहाणेची प्रतिमा उंचावली होती.
या मालिकेतला विजय महत्त्वाचा होता कारण अडलेडमधल्या पहिल्या कसोटीत भारताचा केवळ पराभव झाला नव्हता, तर भारतीय संघाचा डाव अवघ्या 36 धावांवर गुंडाळला गेला होता. ही नामुष्की जास्त जिव्हारी लागणारी होती.
या पराभवानंतर विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर भारतात परतला आणि संघाची सूत्र रहाणेकडे आली. त्यानंतर संघाचं चित्रच पालटलं.
पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजनंतर रहाणेची कामगिरी खालावली. 13 कसोटी सामन्यात त्याला केवळ 20च्या सरासरीनं धावा करता आल्या.
त्यामुळेच दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आधी बीसीसीआयनं रहाणेचा कर्णधारपदासाठी विचार नाही केला आणि त्याला उपकर्णधारपदावरून हटवत रोहित शर्माला उपकर्णधार बनवलं.
रहाणेनं जर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात फलंदाजीत चमकदार कामगिरी केली असती, तर विराटनंतर तोच कसोटी कर्णधार झाला असता.
रहाणेप्रमाणे रविचंद्रन अश्विनही अतिशय अनुभवी आहे आणि त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याकडेही कर्णधारपदाचा अनुभव आहे.
मात्र, आपल्याकडे गोलंदाजांना कर्णधार केलं तर ते टीमच्या गोलंदाजीला योग्य न्याय देऊ शकत नाहीत, अशी काहीशी समजूत आहे. त्यामुळे अश्विनला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
'हा' फॉर्म्युला वापरला जाऊ शकतो
बीसीसीआय विचार करून यासंबंधी निर्णय घेईल असं दिसतंय. त्यामुळे श्रीलंकेसोबत होणाऱ्या कसोटी मालिकेआधी कर्णधाराची घोषणा केली जाऊ शकते.
पुढच्या दोन वर्षांत वर्ल्ड कप आहे. त्याशिवाय इतरही आंतरराष्ट्रीय सामने आहेत. त्यामुळे अशापरिस्थितीत रोहित शर्माकडे कसोटी कर्णधारपद देऊन केएल राहुलला उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं.
सध्या खेळाडूंवर होणाऱ्या ताणाबद्दलही बोललं जातं. त्यावर तोडगा म्हणून काही सामन्यांत रोहित शर्माला विश्रांती देत राहुलकडे नेतृत्व दिलं जाऊ शकतं. त्यामुळे रोहितवर अतिताण येणार नाही आणि राहुललाही नेतृत्वाचा अनुभव मिळेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)