You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटील : 'शरद पवारांच्या आयत्या पिठावर रेघोट्या' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम कळत नाही का?- शरद पवारांना चंद्रकांत पाटलांचा सवाल
"पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार, आमदाराला न कळवता राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. अशाप्रकारे घाईघाईने ट्रायल करण्याचे कारण काय असा माझा प्रश्न आहे. यामधून श्रेयवादाची लढाई सुरु आहे का?" असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (17 जानेवारी) मेट्रोचा प्रवास केला. शरद पवारांनी पिंपरी चिंचवड ते फुगेवाडीदरम्यान मेट्रोनं प्रवास केला, तसंच यावेळी शरद पवारांनी मेट्रो अधिकाऱ्यांकडून मेट्रोच्या कामाची माहिती घेतली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या या पाहणी दौऱ्यावर टीका केली आहे.
"आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम सामान्य जनतेला कळत नाही का? केंद्रात दहा वर्षं आणि महाराष्ट्रात 15 वर्षं राज्य असताना तुम्ही हा प्रकल्प का नाही केला? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला आहे.
त्यामुळे मी सगळ्या आमदारांना आवाहन करतो की त्यांनी मेट्रोच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करावा. शरद पवारांना मला दोष द्यायचा नाही पण मेट्रोवर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार आहोत," असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
2. पीएचडी झालेल्या शिक्षकांना आता मिळणार 'ही' संधी, राज्य सरकारचा निर्णय
राज्यातील शालेय शिक्षण विभागात रिक्त असलेल्या पदांवर बसण्याची संधी शिक्षकांना मिळण्याची शक्यता आहे. विभागतील अनेक पदं वर्षानुवर्ष भरली गेलेली नाहीत. त्यामुळे क्लास वन, क्लास टू, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या पदांवर पीएचडी झालेल्या शिक्षकांची नेमणूक केली जावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली होती.
या दिशेनं राज्य सरकारनं विचार सुरू केलाय. ग्रामविकास खात्यानं सर्व विभागीय आयुक्तांना याबाबतच एक पत्र नुकतंच पाठवलं आहे. अधिकारी होण्यासाठी अर्हतेमध्ये बसणाऱ्या शिक्षकांची माहिती मागवण्यात आली आहे.
शिक्षक संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधले 200पेक्षा जास्त शिक्षक पीएचडी झालेले आहेत. मात्र त्यांना थोडीफार पगारवाढ मिळण्यापलिकडे फारसा फायदा होत नाहीये. त्यामुळे अनेक शिक्षक नावाच्या आधी डॉक्टर लावणंही टाळतात.
त्यामुळे अशा शिक्षकांना अधिकारी होण्याची संधी मिळाली, तर त्याचा फायदा राज्याच्या शिक्षणक्षेत्रालाच होईल, अशी भावना शिक्षक व्यक्त करतायत
झी24 तासनं ही बातमी दिलीये.
3. पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा संघर्ष, वैद्यनाथ महाविद्यालयात प्रशासक येणार?
राज्यात भाजप नेते पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, तसंच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यात सातत्याने संघर्ष आणि वर्चस्वाची लढाई पाहायला मिळत आहे.
आता पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळीतील जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयात प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
वैद्यनाथ महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक महाविद्यालयांमध्ये खासगी क्लासेस घेत आहेत, असे आरोप दोन वर्षांपूर्वी झाला. इतकंच नाही तर या संदर्भात थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही करण्यात आली. त्याचबरोबर महाविद्यालयातील नोकर भरतीत सुद्धा अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र हा सगळा खटाटोप केवळ संस्था धनंजय मुंडे यांना ताब्यात घेण्यासाठी होत असल्याचा आरोप पंकजा मुंडे गटाकडून करण्यात येत आहे.
जवाहर एज्युकेशन संस्थेत सुरु असलेल्या वादामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी चौकशीसाठी 4 जानेवारीला त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून ही समिती आपला अहवाल पंधरा दिवसांत विद्यापीठाकडे सादर करणार आहे.
टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
4. नारायण राणेंकडे कोण जाणार होतं? जितेंद्र आव्हाडांचा शिवसेना महापौरांना सवाल
कळवा-खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेले शाब्दिक युद्ध अजूनही सुरूच आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
महापौर नरेश म्हस्के यांनी फेसबुक पोस्ट टाकून जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं. मग जितेंद्र आव्हाड यांनी जुने प्रकरण काढलं.
'जे एक निष्ठेची भाषा करतात त्यांनी क्षणभर विश्रांती कुठे घेतली होती. जे एकनिष्ठे बद्दल बोलतात त्यांनी स्वतःच्या हृदयात जाऊन तपासावे, नारायण राणेंकडे कोण जाणार होते? कोणाला कोणाच्या गाडीतून उतरवण्यात आले? या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका' असं जितेंद्र आव्हाड यांनी महापौर नरेश म्हस्के यांना सुनावलं.
न्यूज18लोकमतनं ही बातमी दिली आहे.
5. सोनू सूदच्या व्हीडिओने पंजाबमध्ये उठलं नवं वादळ
काँग्रेस पक्षाच्या मुख्य ट्वीटर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या 36 सेकंदाच्या एका व्हीडिओमुळे पंजाबच्या राजकारणात मोठं वादळ उठलं आहे. अभिनेता सोनू सूदचा हा व्हीडिओ असून यातून मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठे संकेत दिले गेले आहेत. यामुळे चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात नेतृत्वाचा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अभिनेता सोनू सूद याची बहीण मालविका सूदला काँग्रेसने पंजाबमध्ये विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्यात सोनू सूदने दिलेला एक संदेश अधोरेखित करत काँग्रेसने आता चन्नी यांना प्रोजेक्ट केले आहे.
'बोल रहा पंजाब, अब पंजे के साथ- मजबूत करेंगे हर हाथ' अशी टॅगलाइन वापरत काँग्रेसने हा व्हीडिओ अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे.
'खरा मुख्यमंत्री वा खरा राजा तोच असतो ज्याला त्या पदावर लोकाग्रहामुळे आणावं लागतं. ज्याला खुर्चीसाठी स्ट्रगल करावं लागत नाही. मी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आहे असा डंका पिटवावा लागत नाही. मलाच ते पद मिळायला हवे असा हट्ट धरावा लागत नाही, तेच खरे नेतृत्व असते असे मला वाटते', अशी भूमिका सोनू सूदने या व्हीडिओत मांडली आहे.
सोनू सूदच्या संदेशानंतर चन्नी यांची काही व्हिज्युअल्स टाकून हा व्हीडिओ बनवण्यात आला आहे. त्यातून चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून समोर केले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)