You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Omicron Covid : ओमिक्रॉन कोरोनाचा संसर्ग घरामध्ये एखाद्या व्यक्तीला झाल्यास काय कराल?
देशात कोरोना रुग्णांचे आकडे पुन्हा एकदा वाढतायत. यावेळी लशीचे दोन्ही डोस झालेल्यांनाही संसर्ग झाल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात आणि मुंबईत कोव्हिडची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी देशभरातल्या रुग्णसंख्येत मात्र वाढ होत आहे.
यामुळे ओमिक्रॉनसंदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत असून घरातील एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास काय करावे असा प्रश्न नागरिकांच्या मनात येतो.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास त्याची कशी काळजी घ्यावी याची माहिती येथे घेऊ.
होम क्वारंटाइन की रुग्णालय?
ज्या लोकांना कोरोनाची लक्षणं नाहीत किंवा अत्यंत साधी, कमी लक्षणं आहेत तसेच 60 वर्षाखालील व कोणतीही सहव्याधी नसलेल्या रुग्णांनी साधारणतः होम क्वारंटाईन राहून उपचार घ्यावेत असं सांगण्यात आलं आहेत.
अर्थात होम क्वारंटाईनमध्ये उपचार घ्यायचे की रुग्णालयात दाखल व्हायचे याचा निर्णय डॉक्टरांना घेऊ दिला जावा. त्यांच्या सल्ल्यानंतरच हा निर्णय घ्यावा.
कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीने काय करावं?
कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर घाबरून जाऊ नये. संयम बाळगावा. व्हेरिएंट कुठला यासंदर्भात जिनोम सिक्वेन्सिंगनंतरच कळू शकतं. ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेस लक्षात घेता काळजी घेणं आवश्यक आहे.
1.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने खोलीत आयसोलेट करावं. या खोलीत हवा खेळती असेल याची काळजी घ्यावी.
2. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने व्हेरियंट कोणताही असो, नेहमी मास्क परिधान करावा. अन्य व्यक्तीच्या जवळ जाण्याची वेळ आली तर मास्क असणे आवश्यक आहे.
3.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करावा. ऑक्सिजन पातळी, हृदयाचे ठोके यांची नोंद घ्यावी. श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर डॉक्टरांना गाठा.
4. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार व्हायला हवेत. औषधं डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच घ्यावीत.
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी काय करावं?
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची काळजी घेण्याबरोबरीने या विषाणूचं संक्रमण टाळण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन आवश्यक आहे.
1. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनी 14 दिवस आयसोलेट व्हावं. त्यानंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर दैनंदिन कामकाज सुरु करावं.
2. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मदतीची जबाबदारी एका व्यक्तीवर सोपवावी. रुग्णाला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ही व्यक्ती हजर असली पाहिजे.
3. रुग्णाच्या जवळ जाणाऱ्यांनी तीन स्तरीय मास्क परिधान करणे आवश्यक आहे. N95 मास्क जरुर लावावा. मास्कच्या बाहेरच्या भागाला स्पर्श करू नका. मास्क खराब झाला किंवा जुना झाला किंवा ओला झाला तर ताबडतोब बदला.
4. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सतत हात धुणं आणि साफ ठेवणं आवश्यक आहे. हात साबणाने किंवा हँडवॉशने कमीत कमी 40 सेकंद धुवा. दिवसातून अनेक वेळा हात धुवा. रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर हात नक्कीच धुवा.
5. रुग्णाच्या शरीरातून निघणाऱ्या गोष्टी म्हणजे थुंकी किंवा लाळ याच्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्या. रुग्णाची काळजी घेताना नेहमी ग्लोव्ह्जचा वापर करा. ठराविक तासांनी हे ग्लोव्ह्ज बदला.
6. रुग्ण वापरत असलेल्या वस्तू घरातील अन्य सदस्यांनी वापर करणं टाळा. कोरोनाची लागण झालेली व्यक्ती वापरत असलेली भांडी, अंथरुण, याचा अन्य कुणीही वापर करू नका. कोरोना रुग्णाच्या बरोबरीने खाऊपिऊ नका.
कधी सावध व्हायचं?
होम आयसोलेशनमध्ये रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुटुंबीयांनी त्या व्यक्तीच्या तब्येतीकडे सतत लक्ष दिले पाहिजे.
रुग्णाला सतत काही दिवस 100 अंशापेक्षा जास्त ताप असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, ऑक्सिजन पातळी 93 पेक्षा कमी झाली असेल, छातीत दुखत असेल, थकवा येत असेल तर त्याला तात्काळ वैद्यकीय मदत दिली पाहिजे.
वैद्यक कचरा कसा नष्ट कराल?
होम आयसोलेशनच्या वेळेस घरात भरपूर वैद्यक कचरा निर्माण होतो. त्यात वापरलेले मास्क, सीरिंज, औषधे, खाण्या-पिण्यासंदर्भातील गोष्टींचा समावेश असतो.
या गोष्टी रुग्णासाठी वापरल्या असल्यामुळे त्या कचऱ्यामुळेही संसर्ग पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे हा कचरा इकडेतिकडे न फेकता एका पाकिटात किंवा प्लॅस्टिकमध्ये साठवून त्याचा निचरा करावा.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)