ओमिक्रॉन: डॉ. प्रदीप आवटे असं का म्हणतात 'सध्या लॉकडाऊनची आवश्यकता नाही'

डॉ. प्रदीप आवटे

फोटो स्रोत, Facebook/Pradip Awate

फोटो कॅप्शन, डॉ. प्रदीप आवटे
    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.

त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या देखील वाढते आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती किती गंभीर आहे? लॉकडाऊनची होण्याची शक्यता आहे का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.

याच सर्व प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीने महाराष्ट्राचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्याकडून जाणून घेतली.

प्रश्न - ओमिक्रॉन सौम्य आहे, त्याचा फार त्रास होत नाही, असा समज आहे, तुमचं काय मत आहे?

प्रदीप आवटे - ओमिक्रॉन 24 नोव्हेंबरला उदयास आला. या व्हेरियंटबाबतचा आपला दीड एक महिन्याचा अनुभव हा निसंशयपणे असं सांगतोय की, या विषाणूमुळे होणारा संसर्ग अत्यंत सौम्य स्वरूपाचा आहे. अनेक रुग्ण लक्षणे विरहित आहेत. तिसरी लाट आलीच तर ती अत्यंत सौम्य प्रकारची लाट असणार आहे.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

दक्षिण आफ्रिकेत चार-पाच आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. परंतु ती तितक्याच वेगाने कमी देखील झाली. त्याच वाटेने आपण जाऊ असं वाटतं. त्यामुळे लोकांनी पॅनिक होण्याची गरज नाही. परंतु लस घेतली, आता काही होणार नाही, असा समज ठेवून चालणार नाही. कोव्हिड अनुरूप वर्तन करण्याची गरज आहे.

कोरोा

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न - ओमिक्रॉन हे नॅचरल व्हॅक्सिन आहे, असं म्हटलं जातं. ओमिक्रॉनची लागण झाली तर कोव्हिड विरुद्धच्या अॅण्टिबॉडिज तयार होतील असं म्हटलं जातं खरंच असं आहे का?

प्रदीप आवटे - सूक्ष्मजीव हा मनुष्य आणि त्याच्यात नेहमी संतुलन साधण्याचा प्रयत्न असतो. विषाणू जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याला जगण्याकरिता मानवी पेशींची गरज असते.

त्यामुळे ज्या शरीरात हा विषाणू प्रवेश करतो ती व्यक्ती सुद्धा जगेल आणि विषाणू सुद्धा जगेल असा प्रयत्न विषाणू करत असतो. त्यामुळे तो विषाणू प्रसाराचा वेग वाढवतो परंतु घातकता कमी करत जातो. हेच ओमिक्रॉनमध्ये दिसतंय. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग वाढलाय परंतु घातकता कमी झाली आहे.

त्यामुळे ज्यांना ओमिक्रॉनची लागण होईल त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती तयार होईल आणि हर्ड इम्युनिटीची पातळी वाढायला मदत होईल.

त्यामुळे अनेक संशोधकांचे मत आहे की ओमिक्रॉन हे झाकलेलं एक वरदान आहे. पण त्याचवेळी खबरदारी घेणं देखील गरजेचं आहे.

प्रश्न - सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाऊनची गरज वाटते का?

प्रदीप आवटे - मला वाटतं या सगळ्यासाठी लॉकडाऊनची गरज नाही. विषाणू आपलं रूप बदलतोय आपण आपली धोरणं बदलणार आहोत की नाही?

विषाणू जसा बदलला तशी आपली धोरणं बदलणं देखील गरजेचं आहे. आर्थिक क्षेत्रात निर्बंध आणल्याने सर्वसामान्य लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो.

लॉकडाऊनच्या दुष्परिणामांचा देखील विचार करायला हवा. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निर्बंध लावण्यापेक्षा ज्या ठिकाणी गर्दी होते त्यावर निर्बंध आणण्याची गरज आहे.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न - आरोग्य सेवकांना, ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे तरुणांना देखील बूस्टर डोसची गरज पडेल का?

प्रदीप आवटे - लसीकरणामुळे संसर्ग झाला तरी तो सौम्य स्वरूपाचा असतो. रुग्णालयात भरती होण्याची गरज कमी पडते. मृत्यू होण्याची शक्यता कमी असते.

तरुणांमध्ये आणि लहानमुलांमध्ये हा आजार गंभीर स्वरूपाचा दिसत नाही. त्यामुळे सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि इतर व्याधी असणाऱ्यांना बूस्टर डोस देण्याचं धोरण ठरवलं आहे. त्यांच्यासाठी बुस्टर डोस गरजेचा आहे.

परंतु लसीकरण म्हणजे रामबाण उपाय आहे आणि त्यानंतर आपले सर्व प्रश्न सुटतील असा विचार करणे चुकीचे आहे. लसीकरणासोबत कोव्हिड अनुरूप वर्तन देखील गरजेचं आहे.

मास्क लावणारी महिला

फोटो स्रोत, Getty Images /MENAHEM KAHANA

प्रश्न - लहान मुलांना कधी लस मिळू शकते?

प्रदीप आवटे - लहान मुलांमध्ये या आजाराची गंभीर लागण होण्याची शक्यता कमी आहे, असं अनेक बालरोग तज्ज्ञांचे मत आहे.

कारण हा विषाणू मानवी पेशींमध्ये स्थिरावण्याकरिता जे रिसेप्टर असतात ते लहानमुलांमध्ये पुरेसे विकसित झालेले नसतात.

त्यामुळे लहानमुलांना जरी कोरोनाची लागण झाली तरी ती गंभीर स्वरूपाची किंवा हा विषाणू त्यांच्या फुप्फुंसापर्यंत जाण्याची शक्यता कमी असते.

त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण लहानमुलांमध्ये कमी आहे. परंतु इतर व्याधी असणाऱ्या मुलांना तसेच जोखमीच्या लहानमुलांना लस देणे गरजेचे आहे.

प्रश्न - स्पॅनिश फ्लूच्या वेळेस जगात पाच लाटा आल्या होत्या. कोरोनाच्या आणखी किती लाटा येण्याची शक्यता आहे?

प्रदीप आवटे - स्पॅनिश फ्लूची तुलना कोव्हिडशी करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तुम्ही जेव्हा एखादा आजार नियंत्रणात आणण्यासाठी काही लसी वापरत असता, तेव्हा त्या लसी त्या सूक्ष्मजीवावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे विषाणू जगण्याचा प्रयत्न करतो आणि लस त्याला मारण्याचा.

त्यामुळे विषाणूचे जनुकीय बदल होत राहतात. त्यामुळे येत्या दोन तीन महिन्यामध्ये कोरोना एंडेमिक होत जाईल. याचा अर्थ तो तुरळक सापडत जाईल. अधून मधून तो डोकं वर काढेल परंतु काही विशिष्ठ काळात आणि काही लोकांमध्ये तो दिसेल.

प्रश्न - याचा अर्थ वर्षभरात ही साथ संपेल असं वाटतं?

प्रदीप आवटे - अगदी, जागतिक संघटनेच्या अध्यक्षांनी देखील हेच म्हटलंय की 2022 मध्ये कोरोना संपेल. लसीकरण, विषाणूची लागण आणि ओमिक्रॉन यामुळे शंभरातील 90 टक्के लोकांच्या शरीरात अॅण्टिबॉडिज आहेत.

त्यामुळे आजाराच्या प्रसाराला मर्यादा येतात. त्यामुळे या वर्षात हा आजार संपण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)